Next
धावांच्या पावसाला स्टार्कचा ब्रेक
सतीश स. कुलकर्णी
Friday, May 31 | 02:30 PM
15 0 0
Share this story

पत्रकार-समीक्षकांना नवल वाटत होतं. त्यात कौतुकाचाच भाग होता. अकराव्या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क निवडला गेला. त्याच्या क्षमतेबद्दल कुणाला शंका नव्हती. त्याची कामगिरी पारितोषिकाला साजेशी होती. आठ सामन्यांमध्ये २२ बळी, १०.१८ची सरासरी, षटकामागे दिलेल्या धावा ३.५. साधारण दर साडेसतरा चेंडूंनंतर बळी!
असं असताना कौतुकमिश्रित आश्चर्याचं कारण काय? ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी दुसऱ्यांदा संयुक्तपणे आयोजित केलेली ही विश्वचषकस्पर्धा (१४ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१५) खरं तर फलंदाजांची होती. स्पर्धेतील ४९ सामन्यांमध्ये (त्यातला एक पावसामुळे रद्द) ३८ शतकं झाली. प्रत्येक अडीच डावांमागे एक शतक. तीन डावांमध्ये धावसंख्या चारशेच्या पलीकडे गेली. एकूण २८ डावांमध्ये संघाची धावसंख्या तीनशेचा टप्पा ओलांडून गेलेली. स्पर्धेत एकही विजय न मिळवलेल्या दुबळ्या स्कॉटलंडनंही एकदा तीनशेचा उंबरठा ओलांडला. ही आकडेवारी सांगते, की स्पर्धा फलंदाजांची, फलंदाजांसाठी होती. उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं गोलंदाजांबद्दल व्यक्त केलेली सहानुभूती योग्यच होती.
फलंदाजांना थोडी जास्तच संधी देणाऱ्या आणि गोलंदाज सापत्न वाटावेत, अशा या स्पर्धेत एक गोलंदाज सर्वोत्तम ठरला. त्याबद्दल त्याला सगळे सलाम करत होते. मायदेशात चषक जिंकण्याची संधी भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही साधली. त्यात मोठा वाटा होता स्टार्कच्या गोलंदाजीचा आणि स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फलंदाजीचा. रिव्हर्स स्विंग व यॉर्कर असे बाण भात्यात बाळगणाऱ्या स्टार्कनं प्रत्येक सामन्यात किमान दोन बळी मिळवले. त्यानं धावांना खीळ घातली आणि महत्त्वाचे बळी मिळवले. त्याचा सर्वाधिक भेदक मारा होता गटातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात. त्यानं २८ धावा देऊन ६ गडी बाद केले. त्यात रॉस टेलर व ग्रँट एलियट यांच्यासह तळातल्या दोन फलंदाजांचा त्रिफळा उडवला. न्यूझीलंडनं एका धावेनं जिंकलं! स्पर्धेत स्टार्कएवढेच बळी मिळवणाऱ्या ट्रेंट बोल्टनं (५-२७) तिथं तरी बाजी मारली होती.
तीनवेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या कांगारूंना २०११च्या स्पर्धेत उपांत्य फेरी काही गाठता आली नव्हती. त्याचा वचपा काढण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती. सलामीला इंग्लंडला १११ धावांनी हरवून त्यांनी इरादा स्पष्ट केला. या सामन्यात स्टार्कनं सलामीचा मोईन अली व तळाचा स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद केलं. त्याच्याहून प्रभावी ठरला तो पाच बळी घेणारा मिचेल मार्श. बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि ऑस्ट्रेलियाचे दोन गुण व स्टार्कचे काही बळी हुकले.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील लढत कमी धावांची, चुरशीची झाली. स्टार्क व बोल्ट या डावखुऱ्या गोलंदाजांची छाप त्यावर स्पष्ट उमटली. ऑस्ट्रेलियानं जेमतेम १५१ धावा केल्या. ते लक्ष्य गाठताना दमछाक झालेल्या न्यूझीलंडनंही नऊ गडी गमावले. खरं तर संघानं चांगली सुरुवात केली होती. कर्णधार ब्रेंडन मॅकलम व केन विल्यम्सन यांची जोडी फुटल्यावर स्टार्कनं धुमाकूळ घातला होता.
एक विजय, एक पराभव व एक सामना रद्द अशी परिस्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियावर काहीसं दडपण आलं होतं. पुढच्या सामन्यातला प्रतिस्पर्धी अगदीच नवखा होता. डेव्हिड वॉर्नरच्या (१७८) तुफानी फटकेबाजीमुळं त्यांनी ४१७ धावांचा डोंगर रचला. मिचेल जॉन्सन (४ बळी), स्टार्क व जोश हेझलवूड (प्रत्येकी २ बळी) यांच्यापुढे अफगाणिस्तानचा निभाव लागला नाही. श्रीलंकेविरुद्ध स्टार्कच्या नावापुढे बळी दिसतात ते तळाच्या सीक्कुगे प्रसन्न व सचित्र सेनानायके यांचे. त्याच्याच धारदार माऱ्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांवर सुरुवातीला काहीसं दडपण राहिलं दडपण होतं. स्कॉटलंडच्या फलंदाजांची मात्र स्टार्कपुढे भंबेरी उडाली. त्यानं फक्त चार षटकं चार चेंडूंमध्ये १४ धावा देऊन चार बळी घेतले. स्पर्धेत पहिल्यांदाच तो सामन्याचा मानकरी बनला.
उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ होती पाकिस्तानशी. सर्फराझ अहमदला शेन वॉटसनकडे झेल द्यायला लावून स्टार्कनं सलामीची जोडी फोडली. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण होतं : १०-१-४०-२. त्याची गोलंदाजी जपून खेळताना पाकिस्तानचे फलंदाज हेझलवूडला शरण गेले. त्यानं ३५ धावांमध्ये चार विकेट घेतल्या स्मिथ व वॉटसन यांच्या अर्धशतकांमुळे यजमान संघानं सहा विकेट राखून विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
एकाही सामन्यात पराभूत न होता उपांत्य फेरी गाठलेल्या भारताचं आव्हान कांगारूंपुढे होतं. एरॉन फिंच व शतकवीर स्टीव्ह स्मिथ यांच्यामुळे त्यांनी सात विकेट गमावून ३२८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी पाऊण शतकी सलामी दिल्यानंतर भारताचा डाव गडगडला. कोहली बाद झाल्यावर मैदानात आलेला अजिंक्य रहाणे जबाबदारीनं खेळत होता. त्याची धोनीशी जमलेली जोडी फोडण्यासाठी कर्णधारानं चेंडू स्टार्कच्या हातात दिला. पहिल्या टप्प्यातील पाच षटकांत फक्त १५ धावा दिलेला स्टार्क पावला. त्यानं रहाणेला हॅडिनकडे झेल द्यायला लावला. रहाणेचं अर्धशतक हुकलं आणि भारताच्या आशा मावळल्या. उमेश यादवचा त्रिफळा उडवून स्टार्कनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानं ८.५ षटकांत फक्त २८ धावा देऊन २ विकेट घेतल्या जेम्स फॉकनरची (३ बळी) त्याला चांगली साथ मिळाली.
न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम सामन्याचं तिकीट निश्चित केलं. पाठोपाठच्या दुसऱ्या स्पर्धेत दोन यजमानांमध्ये विजेतेपदाची लढत होणार होती. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टीन गुप्टिल व मॅकलम भरात होते. सामन्याची सुरुवातच सनसनाटी झाली. पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर गुप्टीलनं एक धाव घेतल्यावर मॅकलम खेळायला आला. त्याला स्टार्कनं सलग दोन चेंडूंवर चकवलं. नंतरचा चेंडू इनस्विंगर होता. तो मॅकलमला कळायला थोडा उशीरच झाला. त्याची बॅट खाली येईपर्यंत ऑफ स्टंप उखडला होता! अंतिम सामन्यातला हा महत्त्वाचा बळी. स्टार्कनं आठ षटकांत फक्त २० धावा देऊन दोन विकेट खिशात टाकलं होतं.
अंतिम सामन्यानंतर कांगारूंच्या कर्णधारानं स्टार्कचं व अन्य गोलंदाजांचं मनापासून कौतुक केलं. तो म्हणाला, “गोलंदाजांनी आम्हाला विश्वचषक जिंकून दिला! स्टार्कची कामगिरी अफलातून होती. त्यामुळं सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक निःसंशयपणे त्याचंच आहे.” खुद्द स्टार्कला ही स्पर्धा अभूतपूर्व अशी वाटली, ते स्वाभाविकच! विश्वचषकस्पर्धेच्या आधी झालेल्या ऑस्ट्रेलिया-भारत-इंग्लंड तिरंगी स्पर्धेतही त्यानं पाच सामन्यांत डझनभर बळी मिळवले होते. तीच लय पुढचा दीड महिना टिकवून ठेवली. क्रेग मॅकडरमॉटच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी स्पर्धेसाठी योजना आखली होती. त्यावर काही महिने कसून मेहनत घेतली आणि त्याचं फळ विश्वचषकात मिळालं, असं स्टार्क म्हणाला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वोत्तम ठरलेला तो दुसरा खेळाडू. (समाप्त)

फॉकनरमुळे घसरगुंडी

गटातील सामन्यात एका धावेनं ऑस्ट्रेलियाला चकवणारा न्यूझीलंडचा संघ विजेतेपदाचं स्वप्न पाहत होता. सुरुवातीच्या घसरणीनंतर एलियट व टेलर यांनी चौथ्या जोडीसाठी १११ धावांची भागीदारी केली. टेलरला हॅडिनकरवी झेलबाद करून जेम्स फॉकनरनं ही जोडी फोडली. लगेचच त्यानं कोरी अँडरसनचा त्रिफळा उडवला. एलिटलाही त्यानंच बाद केलं. परिणामी न्यूझीलंडचा डाव १८३ धावांतच संपला. एवढी कमी धावसंख्या असूनही चषक जिंकण्याचा पराक्रम लॉर्ड्सवर ३२ वर्षांपूर्वी झाला होता. न्यूझीलंडला तसाच चमत्कार अपेक्षित होता. परंतु त्याची साधी चाहूलही वॉर्नर, स्मिथ व मायकेल क्लार्क यांनी लागू दिली नाही. ऑस्ट्रेलियानं सात विकेट राखून लढत व चषकही जिंकला. डावखुऱ्या मध्यमगतीनं न्यूझीलंडची मधली फळी कापून काढणाऱ्या फॉकनरची सामन्याचा मानकरी म्हणून निवड झाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link