Next
बातम्यांत बायका
वंदना खरे
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

भारतात अनेक राज्यांत चैत्रातल्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते असं मानलं जात असलं तरी गुढीपाडव्याला उन्हातान्हात पारंपरिक वेशात नटूनथटून वाजतगाजत मिरवणुका काढायची पद्धत फक्त महाराष्ट्रातच असावी! ही पद्धत आता गल्लोगल्ली वाढतच गेलेली आहे. जसं दहीहंडीच्या दिवशी सगळ्या चॅनेल्सवर जागोजागच्या हंड्यांची दृश्य दिवसभर दाखवली जातात, तशी आता ह्या मिरवणुकांची दृश्यंदेखील न्यूजचॅनेल्सवर दाखवली जात होती. मला तर प्रत्येक चॅनेलवर गावोगावची तीच ती दृश्यं पाहून फारच वैताग आला होता. यावर एखादी परांपराप्रिय व्यक्ती असंही म्हणेल की - नऊवारी साड्या नेसलेल्या शाळकरी मुली किंवा पारंपरिक दागिने घालून मिरवणाऱ्या महिला, फेटे बांधून आणि गॉगल घालून मोटारसायकलवर स्वार झालेल्या कॉलेजकन्यका आणि मावळ्यांच्या वेशात भगवे झेंडे नाचवणारे, ढोल बडवणारे मुलगे यात नक्की ‘वाईट’ असं काय आहे? त्या निमित्तानं आपल्या परंपरांचं पुनरुज्जीवन होत असेल तर तुमच्या का पोटात दुखतंय? चित्रविचित्र मुखवटे घालून काढलेल्या कार्निव्हलच्या मिरवणुका तुम्ही कौतुकानं पाहताच ना? मग वर्षातून एक दिवस भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी केला ढोलताशांचा गजर तर लगेच तुमच्या कानठळ्या का बसतात?
खरं म्हणजे ‘पारंपरिक’ समजल्या जाणाऱ्या पोषाखात रस्त्यावर दणदणाट करत फिरल्यामुळे संस्कृतीचं संवर्धन होतं की नाही हा अगदी वेगळ्याच संशोधनाचा विषय आहे. ज्यांना असं वागल्यामुळे काही भलं होतंय असं वाटत असेल त्यांनी जरूर तसं करावं...पण प्रसारमाध्यमांनी मात्र अशा मिरवणुकांना प्रत्येक बातमीपत्रात दिवस व्यापून टाकण्याइतकं महत्त्व कशा द्यावं? मला वाटतं, मिरवणुकीत नटलेल्या, सजलेल्या मुली किंवा महिला दाखवत राहण्याने महिलांची एक साचेबंद प्रतिमा जनमानसात रुजवली जाते. मालिकांमधून महिलांचं जे ठोकळेबाज चित्रण केलं जातं त्यावर बऱ्याचदा टीका केली जाते किंवा जाहिरातींच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अंगप्रदर्शनावर आणि गोरेपणाच्या आग्रहावरसुद्धा अनेकदा बोललं जातं; परंतु बातम्यांमध्ये स्त्रियांचं चित्रण कशाप्रकारे केलं जातं - याकडे मात्र फारसं कुणी लक्ष देत नाही. या विषयावर जगभरात आणि भारतातदेखील अनेकदा विश्लेषणात्मक अभ्यास झालेले आहेत. ग्लोबल मीडिया मॉनिटरिंगतर्फे प्रोजेक्ट (GMMP) तर्फे गेल्या २० वर्षांपासून जगातल्या ११४ देशांतल्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचा अभ्यास केला जात आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार जगात सगळीकडेच पुरुषांपेक्षा स्त्रियांना बातम्यांमध्ये कमी प्रमाणात दाखवण्यात येते. जगाच्या लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण जरी निम्मं असलं तरी बातम्यांत मात्र त्यांचा फक्त २५% एवढ्या कमी प्रमाणात उल्लेख केला जातो. त्यातही जास्त वेळा त्यांचा उल्लेख एखाद्या ‘गुन्ह्याला बळी पडलेली व्यक्ती’ या स्वरूपात केलेला असतो. हे प्रमाण पुरुषांच्या दुप्पट आहे आणि गेल्या दहा वर्षांत ते बदललेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून स्त्रिया जरी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात सार्वजनिक जीवनात वावरायला लागल्या असल्या तरी वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या बातम्यांमध्ये त्यांचं चित्रण करण्याचं प्रमाण आणि पद्धत यात त्या मानाने बदल होत नाहीये. डॉ. हरिकृष्ण बेहेरा यांच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की भारतीय वृत्तमाध्यमातल्या ८०% बातम्या पुरुषांविषयी असतात.  अगदी मागच्याच आठवड्यातलं आपल्या महाराष्ट्रातलंच उदाहरण पाहा ना – गुढीपाडव्याच्या दोनच दिवस आधी देशभरात १३१ ठिकाणी महिलांनी निषेधमोर्चे काढले होते. “औरते उठी नहीं तो जुल्म बढता जाएगा” हे मुख्य घोषवाक्य घेऊन देशभरातील २० राज्यांत एकाच दिवशी या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सगळ्या राजकीय पक्षांना महिलांच्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी हे निषेधमोर्चे काढलेले होते. मुंबई आणि पुण्यातदेखील २५-३० संघटनांनी एकत्र येऊन असे मोर्चे आयोजित केले होते.  ह्या मोर्चाबद्दलची बातमी किती वृत्तपत्रांनी किंवा वाहिन्यांनी दिली? खरं तर निवडणुकीच्या वातावरणात महिलांनी एक मतदार म्हणून जागरूकता दर्शवणं ही महत्त्वाची घटना आहे.  
आपल्या देशातल्या ‘नेटवर्क ऑफ विमेन इन मीडिया’ (NWIM) ह्या संस्थेनं मागच्या वर्षी आपल्या देशातल्या १२ भाषांतल्या २८ वृत्तवाहिन्यांच्या बातम्या आणि चर्चात्मक कार्यक्रमाचं एक महिनाभर निरीक्षण करून नोंदी केल्या. गेल्या महिन्यातच त्यांचा या संशोधनाविषयीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यांच्या अहवालातली आकडेवारी असं सांगते की ४५% चर्चात्मक कार्यक्रमांचे विषय पक्षीय राजकारणाशी संबंधित असतात. त्याखालोखाल नंबर लागतो गुन्हेगारी आणि शेतीविषयक मुद्द्यांचा! परंतु या तिन्ही विषयांतील चर्चात्मक कार्यक्रमांत महिलांचा सहभाग नगण्य असतो.  राजकारणाशी संबंधित चर्चांच्या विशेषज्ञ मंडळींच्या गटामध्ये जेमतेम ८% महिलांचा समावेश असतो. अगदी प्रियांका गांधीच्या राजकारणप्रवेशासारखा विषय जरी चर्चेला असला तरी अनेकदा वाहिन्यांच्या पॅनलवर एकही महिला नसते! पण जेव्हा महिलांवरचे अत्याचार किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा असे तथाकथित ‘महिलांचे’ विषय चर्चेला येतात तेव्हा मात्र हे प्रमाण ५०% पर्यन्त वाढते, असं संशोधनात आढळलं आहे. सध्या निवडणुकांच्या दिवसांत सर्वसाधारणपणे चर्चेसाठी बोलवण्यात येणाऱ्या विशेषज्ञ मंडळींमध्ये ८६% पुरुष असतात, जेमतेम १४% महिला असतात आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना तर फक्त ०.२ % एवढंच प्रतिनिधित्व मिळतं. NWIM ने निरीक्षण केलेल्या कालावधीत ६५% चर्चांमध्ये एकही महिलेचा समावेश नव्हता. त्यातल्या त्यात हिंदी वृत्तवाहिन्यांवर महिलांचं प्रमाण किंचित जास्त म्हणजे २३% असतं, पण प्रादेशिक भाषांच्या वाहिन्यांवर हे प्रमाण फक्त १०% असतं. मी सहा महिन्यांपूर्वी मराठी वाहिन्यांचा दहा दिवसांपुरता छोटासा अभ्यास केला तेव्हा तर मला हे प्रमाण जेमतेम पाच टक्के इतकंच आढळलं होतं. त्याचबरोबर ह्या चर्चांचं सूत्रसंचालन करणाऱ्या लोकांमध्येदेखील पुरुषांचं प्रमाण ७२% असतं असं NWIM च्या संशोधनात दिसून आलं आहे.
अर्थात, हेही लक्षात घेतले पाहिजे की वृत्तवाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमांत येऊन बोलण्याइतका अभ्यास असलेल्या अनेक महिला त्यात सहभागी होण्यास उत्सुक नसतात. काही महिला या विषयांत तज्ज्ञ असतात, परंतु त्यांना प्रसारमाध्यमांत येऊन प्रतिनिधित्व करण्याची इच्छा नसते. काही जणींचा आत्मविश्वास कमी असू शकतो, तर काही जणींना त्यात स्वारस्य नसतं. विशेषतः पक्षीय राजकरणाशी संबंधित विषयांवर बोलण्यात राज्यशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या महिलांना रुची नसते, असंही आढळून येतं. त्यामुळे साहजिकच त्यांचं प्रतिनिधित्व कमी दिसतं.   त्यामुळे वृत्तवाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व कमी प्रमाणात असतं, म्हणजे त्या विषयांवर त्यांचा अभ्यास नसतो, मत नसतं- असं थेट समीकरण लावता येत नाही, हेही यानिमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे.
एकंदरीत प्रसारमाध्यमांमध्ये महिलांची संख्या पूर्वापार कमीच होती. अलिकडे या क्षेत्रांत महिला येऊ लागल्या आहेत, त्यांचा वावर वाढू लागला आहे.  जगभरातल्या प्रसारमाध्यमांमध्ये सर्वोच्च/निर्णयक्षम पदांवर केवळ २३% महिला आहेत. हे प्रमाण जसजसं वाढत जाईल, तसं महिलांचं बातम्यांतील प्रतिनिधित्व वाढू शकेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link