Next
तंत्रप्रेमींचा दानशूरतेचा मंत्र
अमृता दुर्वे
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story


अमेरिकन कादंबरीकार आणि अमेझॉन कंपनीच्या बड्या समभागधारक मेकेंझी बेझॉस गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा चर्चेत आल्या. काही महिन्यांपूर्वी चर्चा होती ती त्यांच्या आणि पती जेफ बेझॉस यांच्या घटस्फोटाची, आणि त्यातल्या पोटगीच्या रकमेची. परंतु आता मेकेंझी बेझॉस एका वेगळ्याच कारणानं पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ते कारण म्हणजे त्यांनी संपत्ती दान करण्याची केलेली घोषणा. आपण ‘गिव्हिंग प्लेज’ घेत असून एकूण संपत्तीच्या निम्मी संपत्ती दान करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

काय आहे गिव्हिंग प्लेज?
ऑगस्ट २०१०मध्ये ४० अमेरिकन अति-श्रीमंत व्यक्ती आणि जोडप्यांनी एकत्र येत आपली अर्ध्यापेक्षा जास्त संपत्ती वेगवेगळ्या सत्कार्यासाठी आणि उद्दिष्टांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला, आणि त्याला नाव दिलं - द गिव्हिंग प्लेज. याची सुरुवात करणाऱ्यांमध्ये होते - वॉरन बफे आणि बिल-मेलिंडा गेट्स.
या गिव्हिंग प्लेजचा हेतू सरळ सोपा आहे. अब्जाधीशांनी स्वतःहून समोर येत आपली काही संपत्ती दान करावी. अमेरिकेत सुरू झालेल्या या मोहिमेला जगभरातून प्रतिसाद मिळू लागला आणि फेब्रुवारी २०१३मध्ये ही प्लेज जगभरातील दानशूरांसाठी खुली करण्यात आली. आता यामध्ये जगभरातील २३ देशांमधील दानशूर सहभागी झाले आहेत. यामध्ये व्यक्ती आहेत, जोडपी आहेत आणि कुटुंबंही आहेत.
भारतासह ऑस्ट्रेलिया, मलेशिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन, युक्रेन, युनायटेड किंगडम या देशांतल्या व्यक्तींनी आतापर्यंत ही प्रतिज्ञा घेतली आहे.
मेकेंझी बेझॉस यांनी केलेल्या घोषणेमुळे पुन्हा एकदा ही ‘गिव्हिंग प्लेज’ मोहीम चर्चेत आलीय. मेकेंझी बेझॉस यांची मालमत्ता तब्बल ३७ बिलियन डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. त्यांचा आणि जेफ बेझॉस यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यातून त्यांना अमेझॉनमध्ये ४ टक्क्यांचा हिस्सा मिळाला होता. हळूहळू आणि विचारपूर्वक आपण आपली मालमत्ता दान करणार असल्याचं मेकेंझी यांनी घोषणा करताना म्हटलंय. धनाढ्यांच्या यादीमध्ये बिल गेट्स आणि वॉरन बफे यांच्याही पुढे असणाऱ्या जेफ बेझॉस यांनी मात्र आतापर्यंत अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही.
फक्त बेझॉसच नाहीत तर तंत्रज्ञांच्या विश्वातील अनेक दिग्गजांनी आतापर्यंत असा पुढाकार घेतलेला आहे. त्याची सुरुवातच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांनी केली. त्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनीही २०१५ मध्ये यात सहभागी होत असल्याची घोषणा केली. कंपनीतल्या आपल्या समभागांपैकी ९९ टक्के समभाग हे विधायक कामासाठी आपण दान करणार असल्याचं मार्क आणि प्रिसिलानं जाहीर केलंय. त्यांनी स्थापन केलेल्या चान झकरबर्ग इनिशिएटिव्हद्वारे हे दोघं सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुढच्या काही वर्षांमध्ये टप्याटप्यानं ते ६० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याचे शेअर्स दान करतील.
याशिवाय गुगलचे लॅरी पेज, सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर यांनीही अशाच प्रकारे संपत्ती दान करण्याची घोषणा केलेली आहे. भारतातून अझीम प्रेमजी यांनी असा पुढाकार घेतला आहे. व्हॉट्सअॅपचे संस्थापक ब्रायन अॅक्टन, कॉईनबेसचे सह-संस्थापक आणि सीईओ ब्रायन आर्मस्ट्राँग, बिटकॉईनचे सहसंस्थापक बेन डेलो, पिनट्रेस्टचे सहसंस्थापक पॉल सियारा आणि जेनिफर सियारा यांनीही या गिव्हिंग प्लेजद्वारे आपली संपत्ती दान केली आहे.
लोककल्याणासाठी संपत्ती दान करणाऱ्यांची यादी मोठी असली तरी यामध्ये फार कमी महिला आहेत ज्यांची नावं मोठ्या देणग्यांसाठी घेतली जातात. सध्याच्या घडीला १७ अब्ज डॉलर्स दान करण्याची घोषणा करणाऱ्या मेकेंझी बेझॉस या महिला विधायक दानशूरतेमध्ये आघाडीवर आहेत.
तंत्रज्ञानजगत हे नेहमी त्यातील झपाट्यानं होणाऱ्या घडामोडींसाठी चर्चेत असतं. तंत्रज्ञान वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आपलं आयुष्य पालटून टाकतं. जीवनाचा वेग आणि पोत आमूलाग्र पद्धतीनं बदलण्याची क्षमता त्यात असते. त्यामुळेच तंत्रज्ञानाचे चमत्कार करून दाखवणाऱ्या कल्पक उद्योजकांना अगदी कमी वयात आणि झटपट भरपूर पैसा हाती लागतो. तंत्रज्ञानाचे अविष्कार घडवणारे आणि ते विकणारे हे अत्यंत तरुण वयात जगातील धनाढ्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. आपल्याला मिळालेलं यश आणि पैसा या दोन्हींचा चांगला उपयोग करून ते इतरांचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करताहेत हे विशेष. तंत्रज्ञानावर हुकमत असल्यानं व आपल्या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे आपण भौतिक श्रीमंती आपल्या तंत्रज्ञानकौशल्याच्या जोरावर पुन्हा मिळवू शकू, असा आत्मविश्वास हेही या दानशूरतेला बळकटी देणारं एक कारण असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link