Next
‘घराण्याची प्रतिष्ठा’ क्रूर वास्तव
मंगला गोखले
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

भारतातील, पंजाबमधील काही कुटुंबं इंग्लंडमध्ये स्थायिक झाली होती. आपल्या मातृभूमीपासून दूर गेलेल्या, कुटुंबाविना एकट्या पडलेल्यांसाठी जवळची, वेळप्रसंगी आधार देऊ शकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा ज्ञातिसमाज. पंजाबमधून इंग्लंडला येऊन स्थायिक झालेले त्यांच्या जातीचे लोक.
इंग्लंडमध्ये डर्बी येथे स्थायिक झालेल्या अशाच एका पंजाबी कुटुंबातील मुलीची - जसविंदर संघेराची - ही सत्यकहाणी आहे. ‘शेम’ हे तिचं पुस्तक वाचलं की तिच्या संघर्षाची कल्पना येते.
चौदा वर्षांची असताना जसविंदरला, तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवण्यात आला. ती घाबरली. ठरवून केलेल्या लग्नानंतर थोरल्या बहिणीचा झालेला छळ तिनं प्रत्यक्ष पाहिला होता. म्हणून ती घरातून पळून गेली. तेव्हापासून तिच्या आईवडिलांनी तिचं नावच टाकलं. ती पळून गेली नसती तर सासरी छळ सोसत जगावं लागलं असतं आणि लग्न मान्य केलं नसतं तर तिला श्वास कोंडून मारून टाकलं असतं. श्वास कोंडून मारून टाकणाऱ्या क्रूर कुटुंबव्यवस्थेपासून तिनं पळून जाऊन स्वत:ची कशी सुटका करून घेतली, त्याची ही विलक्षण सत्यकहाणी आहे.
‘घराण्याची प्रतिष्ठा, म्हणजे नेमकं काय? ती इतकी मोठी असते का, की आपल्याच माणसांचा जीवही त्यासाठी पणाला लावला जातो? ‘माणूस’ म्हणून जगणंही असह्य, अशक्य होऊन जातं? पाकिस्तानची मुख्तारमाई आणि जसविंदर संघेरासारख्यांच्या हृदद्रावक कहाण्या वाचल्यावर तर हे मानदंड फक्त स्त्रियांसाठीच का, असा प्रश्नही मनाला सतावत राहतो. बाकी काही नाही करू शकलो तरी त्यांनी मांडलेली कैफियत- आत्मकथन- वाचून, आपण त्यांच्या पाठीशी आहोत; त्या एकट्या, एकाकी नाहीत हा दिलासाही देऊ शकतो आणि अशा ‘माणूस’ नावाच्या हिंस्र प्राण्याला वाळीतही टाकू शकतो.
आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचं अमान्य करून जसविंदरनं तिची मैत्रीण अवतार हिच्या भावाशी, जस्सीशी, एका चांभार मुलाशी लग्न केल्यानं घराण्याच्या प्रतिष्ठेला चिखल फासला म्हणून तिच्या कुटुंबानं तिला वाळीत टाकलं होतं. जमीनदार समजली जाणारी जाट घराण्यातील ही माणसं चांभारांना अस्पृश्य समजतात. अशाच एका हीन कुळातील मुलाशी जसविंदरनं लग्न केलं म्हणून आईवडील खूप संतापले होते.
खरं तर तिचा नवरा जस्सी अतिशय समंजस, कनवाळू होता. जसविंदर आणि त्यांच्या मुलीची अगदी व्यवस्थित काळजी घेणारा होता. त्याचे आईवडीलही प्रेमळ होते. तरीही या विवाहाला शेवटपर्यंत नाकारलं गेलं. आई तर शिव्याशाप द्यायची. म्हणायची, ‘या डर्बीच्या रस्त्यावरून आम्ही चालू शकत नाही. तू पळून गेल्यामुळेच हे घडत आहे. गुरुद्वारात जाणंही बंद झालंय. लोक उघड बोलतात, तोंडावर थुंकतात. वेश्येत आणि तुझ्यात काय फरक राहिला? मेलेऽऽ, घराण्याचा नाश केलास. तू आणि तुझा चांभारडा यार गटारात लोळाल. तीच लायकी आहे तुमची.’
काही वर्षांनंतर एक दिवस जसविंदर डॅडना विचारते, ‘डॅड, कधीतरी मला घेऊन जाल तुमच्याबरोबर भारतात? सगळ्यांना भेटावंसं वाटतंय.’ त्यावर ते म्हणाले, ‘आपल्याआधीच आपल्यावरचा कलंक प्रवास करत असतो जसविंदर! तू माझ्या घरच्या माणसांना जाऊन भेटलीस तर तुझ्यामुळे त्यांच्याही नावाला बट्टा लागेल. मला या पापात सहभागी व्हायचं नाहीये.’ शेवटपर्यंत तिच्या आईवडिलांनी तिला स्वीकारलं नाही. आशियाई समाजामध्ये आजही कुटुंबाच्या इच्छेलाच प्राधान्य दिलं जातं.
आपल्याच जातीतील मुलाशी लग्न करून दिल्यानं आपली बहीण किती छळ सोसते, हेही ती पाहत होती. रोबिनाचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालं. मुलाला घेऊन ती परत माहेरी आली. पुढे काही वर्षांनी आईवडिलांनी रोबिनाचं पुन्हा लग्न करून दिलं. तेही प्रेमविवाहाला मान्यता देऊन. जसविंदरनं तिला विचारलं, ‘मग लग्न कधी आहे तुझं?’
‘ते अजून नक्की नाही. तो सध्या तुरुंगात आहे. तसा काही विशेष मोठा गुन्हा वगैरे नव्हता ग केलेला त्यानं.’ ऐकून जसविंदर थक्क झाली आणि अशा लग्नाला मान्यता देऊनही आई-वडिलांनी रोबिनाच्या या लग्नाला जसविंदरला बोलावलंही नाही. तुरुंगातील जावई चालतो, मात्र प्रेमळ चांभार जस्सी चालत नाही... कारण घराण्याची प्रतिष्ठा!
परदेशाचं आकर्षण असलेल्या या समाजात कशाप्रकारे व्यवहार चालतात तेही यानिमित्तानं लक्षात घेण्यासारखं आहे. धक्कादायक आहे. इंग्लंडला जाण्यासाठी पासपोर्ट मिळवायचा आहे म्हणून शाझियाची इच्छा नसताना, तिचं लग्न लावण्यात आलं. त्याचं इंग्लंडला येणं मी स्पॉन्सर करेन, अशा फॉर्मवर तिची सक्तीनं सही घेण्यात आली. ‘या पासपोर्टसाठीच तुझ्याशी संबंध ठेवतो आहे’ असं सांगून शाझियाचं लग्न झालं आणि आश्चर्य म्हणजे आईवडीलही तिला सोडून निघून गेले. नवऱ्यानं तिची मन:स्थिती कधी समजूनच घेतली नाही. जेव्हा तिनं वचन दिलं की नवऱ्याला इंग्लंडला आणण्यासाठी जी काही प्रक्रिया करायची असेल ती करायला मी तयार आहे, विनातक्रार करीन, तेव्हा कुठे तिला इंग्लंडला परत पाठवण्यात आलं. भारत, पाकिस्तानातील कितीतरी मुलींच्या बाबतीत हे घडताना जसविंदर पाहत होती.
पुढे शाझियानं ब्रिटिश एम्बसीला पत्र लिहून, आपल्याला पासपोर्टसाठी कशाप्रकारे वापरलं गेलं; कसे जुलूम सहन करावे लागले ते सविस्तर लिहून तिनं त्यांची मदत मागितली. परंतु त्याचं काहीही उत्तर आलं नाही. जसविंदरची बहीण रोबिनाबाबतही हे असंच घडलं होतं. रोबिनाच्या नवऱ्याला इंग्लंडला यायला मिळावं म्हणून रोबिनाला भारतात पाठवून त्याच्याशी लग्न करण्यात आलं. शेवटपर्यंत त्याला इंग्लंडला आणण्यात तिला यश आलं नाही, तेव्हा नशीब अजमावण्यासाठी तो कॅनडाला त्याच्या कुटुंबीयांकडे परत गेला, परंतु त्याची कायदेशीर नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे घटस्फोट झालाच नाही. अखेर मुलाला घेऊन ती डर्बीला माहेरी परत आली. अशा अनेकांच्या जीवनकथा जसविंदरला माहीत होत्या.
दुसरं असं, की लग्न करून ज्या आशियाई मुली इंग्लंडमध्ये आणल्या जातात त्यांना कोणत्याही प्रकारे सवलती किंवा कायदेशीर मदत मिळवण्याचा हक्क नसतो. त्यांच्या विवाहाची इथे कायदेशीर नोंद झालेली नसल्यानं, त्यांना अधिकृत नागरिकाचा दर्जाही मिळालेला नसतो. त्यामुळे ज्या कुटुंबानं त्यांना इंग्लंडमध्ये आणलं त्यांच्या मेहरबानीवरच त्यांना गुलामासारखं जगावं लागत. अशा उषा, चांदी, झेनिथ, शाझिया, रोबिनासारख्या अनेक दुर्देवी स्त्रिया हे जिणं जगत आहेत.
अनेक आशियाई महिलांचा त्यांच्या कुटुंबीयांकडूनच अशा प्रकारे छळ होत असतो. त्यांना होणाऱ्या यातना बाहेर दिसत नाहीत, कारण घराण्याच्या प्रतिष्ठेपायी होणारा छळ बंद दरवाजाआड केला जातो. ही विकृती छुप्या कॅन्सरप्रमाणे आपल्या समाजाला पोखरत चालली आहे. या सगळ्याची जाणीव होऊन जसविंदरनं पुढे आपल्या मुलांना सांभाळून युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना परीक्षेसाठी एक शोधनिबंध सादर केला. विषय होता- ‘कुटुंबांनी टाकून दिलेल्या शीख स्त्रिया.’ अभ्यास करत असताना तिच्या लक्षात आलं, की ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला असून जातिव्यवस्थेचाही निषेध केलेला आहे. अशा आशियाई स्त्रियांसाठी इथे वेगळी आश्रमघरं असली पाहिजेत, याची जाणीव तिला झाली. तिनं २००१ मध्ये ‘नॅशनल चॅरिटी रेफ्युज’कडे साहाय्यतानिधीसाठी विनंती अर्ज केला आणि निधी मंजूरही झाला. २००२ मध्ये पहिल्याच वर्षी ५२ आशियाई महिलांना आणि त्यांच्या मुलांना राहण्याची सोय त्या आश्रमघरात झाली. सध्या डर्बी शहरात ‘स्टोक ऑन ट्रेन्ट’ इथे आशियाई महिलांसाठी आश्रमघर सुरू आहे.
सध्या जसविंदर तिच्या ‘कर्म निर्माण’ या संस्थेचं कार्य अशाच पद्धतीनं करत आहे. तिच्या कामाचा प्रचार करतेय. त्यासाठी पोलीस अधिकारी, समाजकार्यकर्ते आणि शिक्षक यांच्याशी ती ‘ब्रिटनमधील आशियाई महिलांना भेडसावणारे प्रश्न’ या विषयावर सतत बोलत असते. हा प्रश्न चव्हाट्यावर आणला म्हणून काही जण तिचा तिरस्कार करतात, तिला धमक्यांचे फोन येतात. मात्र पूर्वीइतका हा प्रश्न आता दुर्लक्षित राहिलेला नाही. ‘प्रतिष्ठेपायी खून होतात’ हे आता ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही जाणवू लागलं आहे. हे काम मरेपर्यंत करावं लागणार, याची तिला जाणीव आहे. ‘प्रतिष्ठेपायी केला जाणारा हिंसाचार’ या विषयावर तिनं पीएच.डी. केली. या आश्रमघरात एकट्या पडलेल्या, समाजापासून तुटलेपण आलेल्या स्त्रियांसाठी तिनं ‘नॅशनल फ्रेंडशिप नेटवर्क’च्या प्रकल्पाचं काम सुरू केलं आहे. तसंच, या कामासाठी निधीची गरज असल्यानं देगणी देऊ इच्छिणाऱ्यांसाठी डर्बी येथील ‘कर्म निर्वाण’चा पत्ताही तिनं दिला आहे.
आपल्या अवतीभवती असंही घडत असतं, याची जाणीवही नसलेल्यांनी जसविंदरची ही आत्मकहाणी जरूर वाचावी. ‘घराण्याची प्रतिष्ठा’ ही मुलींच्या जिवापेक्षाही अधिक असते, असं वाटणाऱ्या मनोवृत्तीविरुद्ध लढणारी, आत्मसन्मानासाठी केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. तशीच या परिस्थितीवर मात करून, अशा पीडित स्त्रियांसाठी आधारभूत होण्याचं धाडस दाखवणाऱ्या जसविंदरच्या विजयाची ही कहाणी आहे!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link