Next
वैवाहिक नात्याचा आधार
मंगला मराठे
Friday, October 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story


लैंगिक शिक्षण हा आपल्याकडे कायम चर्चेचा विषय राहिला आहे. लैंगिक शिक्षणाची व्याख्या काय करायची इथूनच शंका आणि मतमतांतरे दिसतात. स्त्रीपुरुषाच्या शारीरिक संबंधांचा तपशील इतका सीमित अर्थ लैंगिक शिक्षणाला नाही. लैंगिक शिक्षण म्हणजे स्त्रीपुरुष दोघांनीही आपले आणि भिन्नलिंगी व्यक्तीचे लिंगभाव-शारीरिक-मानसिक- दोन्ही समजून घेणे, लैंगिक जीवनाचे आपल्या आयुष्यातले महत्त्व समजून घेणे, आणि जबाबदार वर्तनाची जाणीव करून घेणे. लैंगिक जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. म्हणून योग्य पद्धतीचे लैंगिक शिक्षण वयात येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीला मिळायला हवे. विवाहेच्छुक तरुणतरुणींना तर हे ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण लैंगिक जीवन हा लग्नाचा पाया आहे.

पूर्वी लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेत अमक्याच्या मुलाचा शरीरसंबंध तमक्याच्या मुलीशी योजला आहे, असा स्पष्ट उल्लेख असायचा. त्याकाळी मुले झाली, घर खातेपिते राहिले आणि मुलगा होऊन वंशाला दिवा मिळाला की संसार सफल झाला असे वाटत होते. हळूहळू पत्रिकेतला मजकूर बदलला. आपणही ‘वंशाला दिवा मिळण्यासाठी लग्न’पासून ‘प्रत्येक पावलाला सहजीवन’ या कल्पनेपर्यंत आलो. तरी आजही लग्नाचा मुख्य अर्थ एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या लैंगिक संबंधांना समाजाने दिलेली मान्यता असाच आहे. 

कामजीवन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्याचा माणसाच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम होत असतो, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तरीही या विषयाबाबत कडक मौन पाळले जाते. ‘कुणातरी माहीतगाराला विचारून नीट माहिती घे’ असे बाकी प्रत्येक बाबतीत मुलांना सांगितले जाते, पण या बाबतीत कुणीही असे म्हणत नाही. कारणे अनेक आहेत. त्यातले एक म्हणजे लैंगिक संबंध हे नैसर्गिक आहेत. त्यामुळे त्याची माहिती वगैरे करून घेण्याची काही गरज नसते आणि मुलींना नसले तरी मुलग्यांना सगळे माहीत असते, अशी समजूत समाजात आहे. खरे म्हणजे अनेकदा खरी शास्त्रीय माहिती दोघांनाही नसते. त्यांच्याकडे असते ती कुतूहलापायी इकडूनतिकडून मिळवलेली आणि मित्रमैत्रिणींनी सांगितलेली अर्धवट माहिती. यात काही अवास्तव कल्पना आणि चुकीच्या समजुती असण्याची शक्यता खूप असते. यामुळे नाते बिघडू शकते.

अनेकवेळा असे म्हणतात, ‘नवराबायकोचे भांडण ना! ते बेडरूमच्या दारापर्यंतच टिकणार.’ काही वेळा ते खरे ठरते. काही वेळा मात्र उलट परिस्थिती असते. भांडणाची सुरुवात बेडरूममध्येच झालेली असते. अनेक विसंवादांचे मूळ लैंगिक जीवनातील विसंवादात असते आणि ते तसे आहे हे बहुतेकांना उमगत नाही. उमगले तरी हा विषय बोलायची सोय नाही. मग इतर दुसऱ्याच गोष्टींवर चिडचिड धुसफूस होते. परिणामत: नाते बिघडते. असे होऊ नये म्हणून लैंगिक शिक्षण गरजेचे आहे. 

इथे एक प्रश्न नक्की येईल, ‘पूर्वी कुठे होते हे? त्यांचे संसार नाही झाले?’ पूर्वी नव्हते हे खरे आहे. पण त्याने काहीच बिघडले नाही असे मात्र नाही. पूर्वीच काय आजही आपल्याला अनेक जोडपी अशी दिसतात की त्यांनी संसार केवळ धकवले. काहींनी ‘पदरी पडलं आणि पवित्र झालं’ म्हणत समस्येचाही स्वीकार केला. काहींना खरी समस्या जाणवलीच नाही. पण जाणवली नाही म्हणून अज्ञानातले सुख मिळाले नाही. या पतीपत्नीत कायम एक ताण, थोडासा दुरावा राहिलेला दिसतो. संसाराचा गाडा त्यांनी लौकिक अर्थाने व्यवस्थित ओढला, पण पतीपत्नी नात्याचा गोडवा आणि एकतानता त्यांना अनुभवता आली नाही. 

आज वरवर सगळं बदललं, पण ह्या बाबतीत परिस्थिती फारशी बदललेली नाही. कारण आजही लैंगिक शिक्षण हा वाळीत टाकलेला विषय आहे. कारणे तीच; जुनीच. एक कारण म्हणजे ‘संस्कृती’बाबतच्या काही चुकीच्या कल्पना आणि दुसरे त्या संस्कृतीतून आलेले पतीपत्नीप्रेमाचे चित्र. या चित्रात पतीपत्नीच्या प्रेमात लैंगिक संबंधांचा भाग सर्वात कमी महत्त्वाचा. अशारीरिक प्रेम, त्याग, समर्पण, सेवा म्हणजे उच्च प्रेम असा एक संकेत आहे. कामजीवनाला फार भाव देऊ नये असा एक चुकीचा संदेश घराघरातल्या वातावरणात सतत तरळत असतो. या सगळ्याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक बाब शारीरिक सुखाच्या आणि उपभोगाच्या परिमाणांवर घासून मोजावी. मनाचे गुंतणे, भावनिक आधार या गोष्टी लाखमोलाच्या आहेतच. पण, पतीपत्नीमधील भावनिक नाते कामजीवनाच्या हातात हात घालून जाते हे विसरून चालणार नाही. कामजीवन म्हणजे पतीपत्नीच्या नात्याला लागलेली सोनेरी झालर आहे. 

आकर्षण आणि कामभावना ह्या निसर्गदत्त असल्या तरी कामजीवन हे एक शास्त्र आहे. त्याला शारीरिक, मानसिक दोन्ही पैलू आहेत. प्रत्येक विवाहेच्छुक तरुणतरुणीने ते समजून घ्यायला हवेत. ते समजून घेतले तर कामजीवन निकोप, निरामय राहील. याउलट इथूनतिथून मिळवलेल्या माहितीतल्या अशास्त्रीय, अवास्तव कल्पना डोक्यात असल्या तर त्यापायी जोडीदारावर शारीरिक, मानसिक अत्याचार होईल. मनाने एकमेकांच्या अधिक जवळ येण्याऐवजी नात्यात अंतर पडेल. 

सुदैवाने आज अनेक सामाजिक संस्था आणि तज्ज्ञ डॉक्टर विवहेच्छूंना कामजीवनाबद्दलची शास्त्रीय माहिती देण्याचे काम करीत आहेत. तज्ज्ञांनी लिहिलेली अनेक उत्तम पुस्तके सहज उपलब्ध आहेत. पालकांनी मुलांशी याबाबतीत बोलले पाहिजे. ‘होईल आपोआप सगळं’ असे म्हणू नये. विवाहेच्छू मुलामुलींनीसुद्धा लग्नात छान दिसण्यासाठी जशी आपण तयारी करतो, तसेच वैवाहिक जीवन छान असावे, यासाठीही तयारी करायला हवी. ह्या विषयातील तज्ज्ञांना भेटावे, पुस्तके वाचावीत; म्हणजे त्यांच्या मनात कुठल्याही शंकाकुशंका राहणार नाहीत, धास्ती राहणार नाही, आयुष्याच्या नव्या दालनात आत्मविश्वासाने पाऊल टाकता येईल. अशाने पतीपत्नीचे नाते लवकर दृढ होईल, बहरेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link