Next
टेनिसच्या क्षितिजावरील नवी चांदणी
नितीन मुजुमदार
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story


अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेनंतर नेहमीप्रमाणे पत्रकारपरिषद झाली. त्यानंतर महिला गटातील विजेती बियांका आंद्रेस्कू हिचे तिच्या प्रशिक्षकाबरोबर ट्रॉफीसह फोटोसेशन सुरू होते. प्रशिक्षक सिल्वेन ब्रुनोने पोज देताना ट्रॉफीचा दर्शनी भाग चुकून स्वतःकडे धरला आणि बाजूला उभ्या असलेल्या बियांकाने हसत हसत कोपरखळी मारण्याची संधी सोडली नाही. ती म्हणाली, “आता तुलासुद्धा या गोष्टींची सवय करायला हवी!” खरे आहे, या दीड वर्षात बियांकाने अविश्वसनीय अशी झेप घेतली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला ही मुलगी अनेक टायर वन व टू स्पर्धांत पात्रताफेरी खेळत होती. तिचे जागतिक रँकिंग दीडशेच्या आसपास रखडलेले होते. पाठदुखी, खांद्यांची दुखापत, स्ट्रेस फ्रॅक्चर्स यांसारख्या दुखण्यांनी तिचा पिच्छा पुरवला होता. त्याच सुमारास टोयोटा येथे एका आय.टी.एफ. स्पर्धेत ती दुसऱ्या फेरीत पराभूत झाली, तेव्हा तिला मिळालेली पुरस्काराची रक्कम होती ३९२ डॉलर! मात्र नियमित सराव, फिटनेसवर लक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योगसाधना व ध्यानधारणेमुळे आलेली मानसिक कणखरता यामुळे ती आज कारकिर्दीत मोठी झेप घेण्यास सज्ज झाली आहे.
बियांकाचे आईवडील मूळचे रुमानियातील. १९९४ साली ते कॅनडात स्थलांतरित झाले. तिची आई फायनान्स एक्झिक्युटिव्ह आहे, तर वडील इंजिनीयर. बियांकाचा जन्म २००० साली कॅनडातच झाला.
बियांका लहानपणी बरेच खेळ खेळली. शेवटी टेनिस हा खेळ तिच्या पसंतीस उतरला. वास्तविक तिचे आईवडील टेनिसचे चाहते होते अशातला भाग नाही, परंतु एकुलत्या एका मुलीने तिचा आवडता खेळ करिअर म्हणून निवडला तेव्हा त्यांनी तिला पाठिंबा देण्याचे कर्तव्य बजावले.
बियांकाच्या कारकिर्दीला दिशा मिळाली ती इंडियाना वेल्स येथे झालेल्या स्पर्धेतील अजिंक्यपदाने. तीन वेळा ग्रँडस्लॅम जिंकलेल्या व काही काळ जागतिक रँकिंग एकवर विराजमान असलेल्या अँजेलिक कर्बरला हरवून तिने या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले तेव्हा तिला मिळालेली साडेतेरा लाख डॉलर ही पारितोषिकाची रक्कम तिच्या तोपर्यंतच्या पारितोषिकाच्या रकमेच्या सुमारे चारपट होती! वाइल्ड कार्डने तिचा या स्पर्धेत प्रवेश झाला होता व अंतिम सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये ती पिछाडीवर होती.
नुकत्याच झालेल्या अमेरिकन ओपन या स्पर्धेत तिची प्रतिस्पर्धी होती सेरेना विल्यम्स. अंतिम फेरीआधी तिने केवळ ३ सर्व्हिस गेम्स गमावले होते, तर बियांकाने अंतिम सामन्यात तब्बल ६ वेळा तिची सर्व्हिस ब्रेक केली! सेरेनाने या पराभवामुळे तिची सलग चौथी ग्रँडस्लॅम फायनल गमावली आहे. ज्या विल्यम्सभगिनींचा खेळ पाहत बियांका मोठी झाली, त्या दोघींनाही तिने या दीड वर्षांत नमवले आहे.
सेरेना विल्यम्सने १९९९ साली अमेरिकन ओपन टेनिसस्पर्धा जिंकली तेव्हा ती १७ वर्षांची होती तर बियांकाचा जन्मदेखील झालेला नव्हता. त्यानंतर वयाच्या १९व्या वर्षी हीच स्पर्धा जिंकणारी बियांका ही सर्वात तरुण महिला टेनिसपटू ठरली. ग्रँडस्लॅम सिंगल्स किताब जिंकणारी ती कॅनडाची पहिलीच टेनिसपटू! बियांकाच्या खेळात आक्रमण व बचाव याचा सुरेख समन्वय आहे. वयाच्या १३व्या वर्षांपासून ती नियमित योगाभ्यास करते, ज्याचा तिला भरपूर फायदा झाला आहे. तिची मानसिक कणखरता यामुळे नक्कीच खूप वाढली आहे. यंदा १ मार्चनंतर पूर्ण खेळलेला एकही सामना बियांकाने गमावलेला नाही, एवढ्या जबरदस्त फॉर्ममध्ये सध्या ती खेळत आहे.
असे असले तरी आपल्या खेळाबद्दल बियांकाचे सतत आत्मपरीक्षण चालू असते. ‘माझ्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत, मात्र अनेक वेळा मी चुकीच्या वेळी चुकीचे फटके मारते. यापुढे मला ते टाळायचा प्रयत्न करायचा आहे,’ ही कबुली बियांकानेच नुकतीच एका मुलाखतीत दिली. बियांकाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत तिच्या आईवडिलांच्या ठाम पाठिंब्याचा फार मोठा वाटा आहे. तिची आई मारिया टोरांटो येथील एका इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर आहे. आईबद्दल बियांका सांगते, ‘मला माहीत असलेली ती सर्वाधिक संयमी व्यक्ती आहे.”
गेल्या काही महिन्यांत बियांकाची कोर्टवरील कामगिरी पाहता टेनिसच्या क्षितिजावर एक ताऱ्याचे आगमन झाल्याचे दिसते. एवढेच नाही तर हा तारा प्रदीर्घ काळ या क्षितिजावर प्रकाशमान राहील, अशी आशा टेनिसरसिकांना वाटत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link