Next
घन घन माला नभी दाटल्या
अनिल गोविलकर
Friday, May 10 | 03:15 PM
15 0 0
Share this story

मराठी ललित संगीताच्या वैभवशाली इतिहासात आजपर्यंत अनेक अमराठी गायक-गायिकांनी आपली कला सादर केली आहे. त्यामुळे आवाजाचे नावीन्य, नवीन गायकीचे बंध इत्यादी अनेक सौंदर्यस्थळे उघडकीस आली, मराठी ललित संगीत श्रीमंत झाले. अमराठी गायक जेव्हा मराठी गीते गातात तेव्हा बऱ्याचवेळा सर्वात आधी खटकतो, तो त्यांचा शब्दोच्चार. विशेषतः उर्दूतील नाजूक लहेजा मराठी भाषेत येतो तेव्हा मराठी शब्दांतील सौंदर्य डागाळते. उदाहरणार्थ, ‘च’, ‘ख’ या अक्षरांचा उच्चार उर्दू भाषेत आणि मराठी भाषेत संपूर्ण वेगळा आहे आणि गाताना तो उच्चार तसाच येणे अपेक्षित असते परंतु काही वेळा निराशा पदरी पडते. आजच्या आपल्या मराठी गाण्यात मात्र असा प्रकार ऐकायला अजिबात मिळत नाही.
हिंदी-उर्दूतील सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी गायलेले ‘घन घन माला नभी दाटल्या’ हे गाणे या दृष्टीने समाधान देणारे आहे. वास्तविक तंत्राच्या दृष्टीने मल्हार रागावर आधारित गाणे आहे. तरीही रागाच्या पलिकडील भावना दर्शविणारे गाणे आहे. संगीतकार वसंत पवार यांनी गाण्याला चाल लावली आहे. मी मागेदेखील एका लेखात या संगीतकाराबद्दल एक विधान केले होते-संगीतकार वसंत पवार यांना ‘लावणीचे सम्राट’ अशी बिरुदावली दिली आहे. वास्तविक अशा पदव्या देण्याची काही गरज नसते. कलाकार असे एकाच साच्यात बसणारे नसतात, तरीही आपली खोड काही जात नाही.
कवितेच्या पहिल्याच  वाचनाने, आपल्याला आशय आकळतो. पावसाळी ऋतूचे वर्णन केले असून, त्यावेळच्या सगळ्या प्रतिमांचा यथेच्छ वापर कवी ग.दि.माडगूळकर यांनी केलेला आहे. पावसाळा आणि मोराचे नाते तसे चिरंतन आहे तसेच मोराचा केकारव, ही पंतकवी मोरोपंतांची आवडती प्रतिमा, पावसाळ्यातील यमुना नदी, नदी काठच्या गवळणी इत्यादी प्रतीके कवीने या शब्दरचनेत योजिली आहेत. यमुनेला ‘कालिंदी’ म्हणणे ही ज्ञानेश्वरांची आवडती प्रतिमा.

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
केकारव करी मोर काननी, उभवुनी उंच पिसारा


अर्थात आपल्याच संस्कृतीतील प्रतीके सुयोग्यपणे वापरणे आणि त्यातून अचूक आशय दृग्गोचर करणे, कवीच्या प्रतिभेच्या संदर्भात महत्त्वाचे लक्षण मानावे लागेल. गाण्याची चाल तशी परिचित आणि सरळ सरळ मल्हार रागाच्या प्राथमिक स्वरांची मांडणी ध्यानात घेऊन केलेली आहे. परंतु तिला चित्रपटगीताचे स्वरूप प्रदान करताना, त्यात आवश्यक तितके बदल आणि स्वातंत्र्य घेतलेले आहे. एक संगीतकार म्हणून स्वतःला इतकी मोकळीक घेणे हे नेहमीच अपेक्षित असते, अन्यथा कलासंगीताची कार्बन कॉपी, असा ठपका येण्याची शक्यता असते. चालीचे कुलशील जाणून घेताना, संगीतकाराच्या कलासंगीताचा पायाभूत अभ्यास नेमका झाल्याचे समजून घेता येते.

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारात


वास्तविक गायक मन्ना डे हे हिंदी/उर्दू/बंगाली भाषक गायक. संपूर्ण कारकीर्द याच भाषांतील गाणी गाण्यात गेलेली, तरीही असले अस्सल गायकी ढंगाचे गाणे आणि खास मराठी शब्द असलेली कविता गाताना, भाषेचा अचूक अभ्यास केल्याचे दिसते. ‘उंच’, ‘सायंकाळी’, ‘घुमवी’ असा शब्द गाताना, शब्दोच्चार अतिशय अचूक आणि नेमके केले आहेत. गायक म्हणून मूल्यमापन करायचे झाल्यास, आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचच पल्ला विस्तृत आहे व त्यात सर्वत्र खुलेपणा आणि ताकद राखणे त्यांना जमले. त्यांचा आवाज हलका आहे आणि सर्व प्रकारच्या ताना हा आवाज लीलया घेऊ शकतो. शास्त्रोक्त संगीताच्या संदर्भात हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात स्वच्छ ‘आ’काराने गायन करण्यावर अधिक भर असतो आणि हेदेखील मन्ना डे सहज करू शकतात (अनेकदा व्यावसायिक शास्त्रोक्त गायकांनासुद्धा हे जमत नाही, ही बाब इथे महत्त्वाची ठरावी!) आकाराने शक्य होणारा विशेष गुण सहकंपन वा गुंजन हा परिणामत: त्यांच्या गायनात भरपूर पसरलेला आहे.

वर्षाकालीन सायंकाळी
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा


ललित गायनात तुम्हाला कधी तिन्ही सप्तकांत गाता आलेच पाहिजे, अशी सक्ती नसते, नसावी. अर्थात गरजेनुसार अपेक्षा ठेवणे योग्य आहे. इथे भावनापरिपोष याला अधिक महत्त्व. या गाण्यातील मुखडा संपताना मन्ना डे यांनी ‘खंडित’ असा ‘आ’कार घेतलेला आहे, तो मुद्दामून ऐकण्यासारखा आहे. त्यांच्या गळ्याची ताकद दर्शवून देणारा आहे.

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा


याव्यतिरिक्त मन्ना डे यांचा विशेष सांगायचा झाल्यास, प्रत्येक संगीतप्रकारानुसार जी एक भावस्थिती ढोबळ मानाने परंपरेत निश्चित झालेली असते ती सुचवणारा आवश्यक तो लगाव ते सहज देऊ शकतात आणि त्यात कुठेही चाचपडलेपणाची भावना नसते. मुळात, चित्रपटसंगीतात सांगीत बढत करायची नसते तर एक संबंधित मूड निर्माण करून बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणूनच ‘सुरेलपणा’,‘भरीवपणा’ आणि ‘यथायोग्य’ उच्चार या बाबी फार महत्त्वाच्या ठरतात आणि मन्ना डे इथे पुरेपूर उतरतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link