Next
'ज्येष्ठ' संशोधक
डॉ. अनुराधा हरकरे डॉ. अंजली कुलकर्णी
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

नव्वद विद्यार्थ्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक, पाचशेच्या वर शोधनिबंध प्रसिद्ध, पाच पेटंट्स (ज्यावर आधारित शेकडो यंत्रणा ठिकठिकाणी यशस्वीपणे चालू आहेत) आणि अनेक वर्षांपासून अविरत सुरू  असलेलं ज्ञानप्रसाराचं कार्य! नुसतं वाचूनसुद्धा अचंबित व्हायला होतं. हे साध्य केलं आहे ते आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘आयसीटी’ (पूर्वीचे यूडीसीटी) ह्या रसायनतंत्रज्ञान संस्थेचे संचालक, व संशोधक डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी. रासायनिक अभियांत्रिकी विषयातील ह्या विद्वान शिक्षकाचा जन्म १९४९ साली सातारा जिल्ह्यातील मसूर ह्या खेड्यात झाला. जेमतेम पाच हजार लोकवस्ती असलेलं गाव. गावातील जोशी कुटुंब स्वातंत्रप्राप्तीच्या ध्येयानं भारावलेलं. कुटुंबातील जवळजवळ सगळे पुरुष व काही स्त्रिया इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात तुरुंगात गेले होते. ज्येष्ठराज यांचे वडील भालचंद्र यांनी, भारताची भावी पिढी असलेल्या गावातल्या लहान मुलांचं शरीर आणि मन सुदृढ करायचं हा ध्यास घेतला होता. सूर्यनमस्काराचा प्रसार हे त्यांचं ध्येय होतं.  वडिलांसोबत ज्येष्ठराज भल्यापहाटे गावातल्या ओढ्यावर जायचे. त्यांच्यासोबत गावातील ६-१५ वर्षें वयाची सगळी मुलं असायची. ओढ्यावर अंघोळी झाल्या की वडील व्यायामाबरोबर सूर्यनमस्कार घालायला शिकवायचे. १२ सूर्यनमस्कार झाले की कधी मारुतीरायाचा फोटो देऊन कौतुकाची थाप तर कधी १२० सूर्यनमस्कारानंतर बक्षिसादाखल दासबोध-ज्ञानेश्वरी भेट मिळे. मुलांना चांगलं शिकायला मिळतं म्हणून गावातली वडीलधारी मंडळी आपल्या मुलांना आनंदानं पाठवायची. त्यानंतर वडिलांबरोबर गीतापाठांतराचा वर्ग व्हायचा. तेव्हा शिकलेली गीता डॉ. जोशींना अद्यापही पाठ आहे.
  साधसरळ आयुष्य. आईनं स्वतःच्या हातानं शिवलेले कपड्यांचे दोन जोड वर्षातून एकदा मिळत. त्यांच्या गावात १६ वर्षेपर्यंत मुलं पायात चप्पल घालत नसत, पावसाळ्यात चिखलानं माखलेले पाय धुऊन लख्ख करण्यात डॉ. जोशी ह्यांना खूप मजा येई. “इतके स्वच्छ पाय शहरात होत नाहीत” असं ते म्हणतात.   
मोठ्या भावाबाबत त्यांना विशेष ममत्व! त्याच्यासोबत रुसवेफुगवे, भांडण चुकूनही कधी झालं नाही. पण धाकट्या बहिणीबरोबर मात्र दंगा चालायचा. तिच्यासोबत अगदी जेवताना हातानं फोडलेल्या कांद्याच्या आतली लहानशी कळी कोणी खायची एवढ्यावरसुद्धा भांडण रंगत असे.

लहानपणी मित्रमंडळींसोबत सूरपारंब्या, आट्यापाट्या, हुतूतू, विटीदांडू खेळत छान वेळ जाई. कधी मित्रांचा रात्रभरही घरी मुक्काम असे. आईसुद्धा साऱ्यांचं जेवण-खाण बघत असे. मग डॉ. जोशी मित्रांना गणित शिकवीत. ते त्यांना मनापासून आवडे. मोठं झाल्यावर शिक्षक व्हायचं हे त्यांनी तेव्हाच नक्की केलं.
अभ्यासातील प्रगती बघून मसूरच्या शाळेत इयत्ता दुसरीनंतर त्यांना ‘डबल प्रमोशन’ देऊन थेट चौथीच्या वर्गातच प्रवेश दिला. आठवीत ते परीक्षेच्या वेळेस आजारी पडले, चक्क धनुर्वात झाला. त्यामुळे वार्षिक परीक्षेला जाताच येईना. पण डॉ. जोशींचा शाळेत नेहमीच पहिला नंबर ! ते बघता शाळेनं नववीत प्रवेश दिला.
एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात डॉ. जोशींनी नाटक बसवायचं ठरवलं. सात-आठ मित्रांकडून नाटकाचा भरपूर सरावही करून घेतला. पण गंमत अशी की त्या सगळ्यांच्या एकत्र सरावाला, रंगीत तालमीला एकदाही मुहूर्त लागला नाही. मात्र आत्मविश्वास दांडगा, सर्व कलाकार मंडळींना घेऊन नाटक सादर करायचंच असं डॉ. जोशींनी ठरवलं. हे शिक्षकांच्या लक्षात आलं. शेवटी सगळ्यांसमोर फजिती नको म्हणून साऱ्यांना नाटक सादर न करताच परत पाठवलं. अशातऱ्हेने स्टेजवर उभं राहण्याआधीच वेगळ्या अर्थानं नाटक बसलं!
डॉ. जोशीं शाळेतल्या स्काऊट, एनसीसी, हस्तलिखित अश्या सर्व उपक्रमांमध्ये हिरिरीनं भाग घेत. स्काऊटचं काम करताना वेगळीच शक्ती संचारत असे. त्यांनी एनसीसीच्या शिबिरासाठी सातारा ते पाचगणी पायी प्रवासदेखील आनंदानं केला. आगीच्या गोल रिंगणातून धावत येऊन उडी मारण्याचं कसबही आत्मसात केलं.
कऱ्हाडच्या कॉलेजमधून त्यांनी इंटरची परीक्षा उत्तम रितीनं पूर्ण केली. मित्राच्या भावाकडून त्यावेळच्या ‘यूडीसीटी’ ह्या मुंबईतील संस्थेचं नाव ऐकलं होतं. उत्तम गुण होतेच, तिथं प्रवेश घेतला. कालांतरानं आपल्या कर्तृत्वानं ह्या संस्थेचं नाव जगात पोहोचवलं, संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवून दिला. लोकप्रिय शिक्षक असलेल्या डॉ. जे. बी. जोशी यांची ‘अमेरिकन केमिकल असोसिएशन’नं जगातल्या प्रमुख १०० संशोधकांमध्ये गणना केली आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मभूषण असे अत्यंत मानाचे सन्मान त्यांना मिळाले आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link