Next
माणूस
संदेश कुलकर्णी
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this story

आम्ही दोघं बराच वेळ नुसते बसून होतो. ती एवढं पोटतिडकीनं पुरुषाचं वर्तन सांगत होती आणि मला मात्र तिला मिठीत घेऊन किस करावं असं वाटत होतं. मला माझीच लाज वाटायला लागली. आपणसुद्धा बहुधा ‘तसेच’ पुरुष आहोत, भावना माहीत नसल्यानं जनावरासारखे वागणारे! तिला माझ्या मनात काय चाललं आहे हे कळू नये म्हणून मी अचानक गॉगल काढून तो डोळ्यांवर लावला. प्राजक्ता हसून म्हणाली, “काय रे? एकदम हिरोगिरी?” मी– “नाही नाही, तुझ्या मागे पांढऱ्या भिंतीवरून रिफ्लेक्ट होणारा प्रकाश त्रास देतोय.” ती हसून म्हणाली, “अरे, मागून नाही माझ्यातून येतोय हा प्रकाश. ती माझी प्रभावळ आहे. वा! कित्ती दिवसांनी हा शब्द आठवला- प्रभावळ! अनेक शब्द आपण वापरत नसल्यानं गळून पडतात नाही?” मी- “हो ना. असं म्हणतात की रोजच्या जगण्यात आपण फक्त हजार शब्द वापरतो. मी परवा एका साइटवर वाचत होतो- कुठल्याही देशात जायचं असेल आणि तिथल्या भाषेतले हजार शब्द आपण लक्षात ठेवले तर आपल्याला तिथे कुणाशीही बोलायला अडचण येत नाही.” ती आश्चर्यानं पाहत असताना पीजेचा फोन आला. ‘नंतर घेतो’ म्हणत मी कट केला तर हा पठ्ठ्या थांबायलाच तयार नाही. शेवटी प्राजक्ता म्हणाली, “काहीतरी इमर्जन्सी असेल,” म्हणून मी तो घेतला.
“पीजे, आग लागल्यासारखं सारखा काय फोन करतो आहेस?” तर तो म्हणे- “आग लागली नाही आरक्या. आग बुझ गयी!” मी– “काय?? काय बरळतो आहेस?” पीजे- “अरे आरक्या, दिलरुबा. मी केलं.” तरी माझी काही पेटली नाही. “काय केलंस?” पीजे– “अरे. मी केलं. मी ओक्के आहे. मला जमतं.” त्याच्या बोलण्याचा अर्थ मला जसा कळला तसा माझा चेहरा काळाठिक्कर पडला. ह्यानं माझ्या आधी पोरगी पटवली आणि आता माझ्या आधी अनुभव घेऊनही मोकळा झाला होता! आणि हा माझा पराभव ऐकताना मी प्राजक्तासमोर असावं ह्याहून मोठा दैवदुर्विलास तो कोणता? पीजे त्याच्या अत्यल्प भाषासंपदेचा वापर करून त्याच्या अनुभवाचं माहात्म्य मला कथन करायला लागला. “आरक्या.. भारी. म्हणजे लयच भारी. म्हणजे फुल दिलरुबा. म्हणजे– खट्याक. काय सांगू तुला? शब्दात नाही सांगता येणार. तू भेट मला लगेच.” मी वैतागून म्हणालो, “अरे, तुझ्याकडे पुरेसे शब्द नसतील तर भेटून तरी काय बोलणार तू?” पीजे– “अरे, मी तुझ्यासारखा रायटर नाही पण भापो- भावना पोहोचल्या ना?” मी– “हो पोहोचल्या. मी कामात आहे. नंतर बोलतो. बाय.” मी खजील होऊन फोन कट केला.
प्राजक्तानं विचारलं– “काय केलं त्यानं?” नशिबानं माझ्या चेहऱ्यावर गॉगल होता म्हणून मी वाचलो. मी– “काही नाही गं. उगाच फालतू गोष्टींचं कौतुक. एका कबुतराला त्यानं वाचवलं म्हणून उडत होता.” ती- “पण म्हणजे कसं? काय केलं त्यानं?” मग मी कल्पनाशक्ती वापरून कबुतर कसं घरात घुसून पंख्यात अडकलं आणि त्यानं आणि नम्रतानं कशी त्याची काळजी घेतली हे सांगितलं. प्राजक्ताने “कित्ती गोssड” असं म्हणून तिनं आणि बोकाबाई धनश्रीनं एका मांजराला कसं वाचवलं, ह्याची सविस्तर हकीकत सांगितली आणि फोटोही दाखवले. त्या मरतुकड्या मांजराला पाहून मीही उगाच कौतुकाचे चार उद्गार काढले. पण प्राजक्ता मात्र डोळ्यात प्राण आणून ते फोटो पाहत होती. मग मी विषय बदलायला धनश्रीची चौकशी केली. प्राजक्ता वेगवेगळे फोटो पाहत म्हणाली, “अरे, गेल्या काही दिवसांत आमची भेटच नाही. मी म्हणाले ना तुला मी खूप अडकले होते ह्या जॉब चेंजमध्ये.” मग काही काळ ती आपल्याच फोनमध्ये हरवली. त्या शांततेत मला पुन्हा पीजे आठवायला लागला. मला आता त्याचा विषय डोक्यात नको होता, म्हणून मी काहीतरी बोलणार एवढ्यात प्राजक्तानं अचानक विचारलं- “माणूस ‘माणूस’ कधी झाला माहीत आहे ना?”
पीजे पुरुष झाला आणि मी मात्र अजून फक्त साधा माणूस आहे, ह्या विदारक जाणिवेत असल्यानं तिच्या प्रश्नाचा विचार करण्याचा उत्साह माझ्याकडे नव्हता. तरी आपलं संभाषणात राहण्यासाठी मी “कधी?” असं विचारलं. हा बहुधा तिच्या आवडीचा विषय होता. ती उत्साहात सांगायला लागली- “फार पूर्वी म्हणजे आपण जेव्हा शिकारी होतो आणि गुहेत राहत होतो, तेव्हा जर एखादा माणूस शिकार करताना किंवा कुठेतरी पडून वगैरे जखमी झाला, तर इतर जण त्याला तिथेच टाकून परत येत. कारण जर त्याला आणलं तर त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल ना? म्हणजे आपल्या शिकारीतला घास त्याला द्यायला लागेल. माणसं हे तेव्हा करत नसत. किंवा असं म्हणू ह्यावेळेपर्यंत आपण माणूस नव्हतो. पुढे कधीतरी हे बदललं, आपल्या भावना इव्हॉल्व्ह झाल्या. आपल्यातला एक जण असा बेवारस सोडू नये असं आपल्याला वाटू लागलं आणि त्याला आणून त्याची काळजी घ्यायला सुरुवात झाली. जुन्या उत्खननात एक सापळा सापडला होता, ज्याचा हात का पाय तुटल्यामुळे आपण आता प्लास्टर लावतो, तसं लाकडाचा सपोर्ट लावला होता. ही माणूसपणाची खूण समजली जाते- आपल्यापेक्षा वीक माणसाची काळजी घेणं!” मला आठवलं, आपल्याकडे अरुण गद्रेंनी ह्यावर ‘फेंगाड्या’ नावाची कादंबरी लिहिली होती. प्राजक्ता ह्या विषयावर भरभरून बोलायला लागली- “आणि फक्त माणूस नाही तर इतर प्राणी, निसर्ग ह्यांची काळजीही घ्यायला पाहिजे ना? आपण जंगलाचा कायदा- ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’नं जगत नाही. आपल्यापेक्षा वीक माणसाची आपण काळजी घेतो, तेव्हा जनावर न राहता माणूस होतो.” मी म्हणालो– “पण बहुतेक जण अजूनही असं माणसासारखं कुठे वागतात? आपलं उखळ पांढरं करतात. दुसऱ्याचा फायदा घेतात.” ती म्हणाली–“हो, कारण माणूस होण्याआधी हजारो वर्षं आपण जनावर होतो. ते इन्सिंक्ट आपल्यामध्ये खूप खोलवर रुजलेलं आहे- आपल्या मेंदूच्या तळातल्या भागात! जसं आपलं इव्होल्युशन होत गेलं, तसा आपला मेंदू प्रगत होत गेला. आपला आताचा मेंदू आणि इतर जनावरांचा मेंदू ह्यात एक बेसिक फरक आहे. आपण इतर जनावरांपेक्षा वेगळे आहोत ते त्यामुळेच. आपल्याला आपण जे करतो आहोत त्याचं भान असतं. प्राणी शरीराला हवं तसं वागतात- त्यांना हे भान नसतं. प्राणीसुद्धा सूर्यास्त पाहतात, पण त्यांना त्याचं भान नसतं, जे माणसाला असतं. सगळे प्राणी ऑटो-मोडवर जगतात. फक्त आपणच आदिम प्रेरणेपेक्षा वेगळं वागू शकतो आणि ह्या ऑटो-मोडमधून बाहेर येऊ शकतो. त्यासाठी ‘माइंड कंट्रोल’ करावं लागतं, जे सोपं नाही. थोडक्यात ‘बिइंग ह्युमन’ म्हणजे भानावर असणं. ऑटो-मोडमधून बाहेर पडून भानावर येणं. सलमान खानला सांगितलं पाहिजे ना हे?... असं म्हणून ती हसायला लागली.
मी बराच वेळ नुसताच बसून होतो. ती म्हणाली– “काय झालं रे?”.
मी –“ तू म्हटलेलं सगळं पचवतो आहे. मागे मंगेशसुद्धा हेच सांगत होता. माईंडफुल राहा. भानावर राहा.”
प्राजक्ता– “येस. ते जर जमलं तर खऱ्या अर्थानं माणूस होऊ आपण, पण बहुतेक वेळा आपण ऑटो-मोडवर प्रतिक्रिया देतो. आपल्या भावनासुद्धा ऑटो-मोडवर असतात. अमुक गोष्टींनी राग येतो, तमुक गोष्टींनी वाईट वाटतं, कारण आपण आपला सगळा मेंदू वापरतच नाही. तो जर वापरला तर आपण खूप वेगळ्या गोष्टी करू शकतो”. मी म्हणलो, “तुला कसं हे सगळं माहीत? तूपण सायकोथेरपी केली आहेस का?” ती म्हणाली– “हो. एकदा बाबा गेल्यावर आणि एकदा बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यावर.” हे ऐकून मी सुन्न बसून राहिलो.

रजनी म्हणे भानावर येण्याचे- नाही मला भान
सूर जुळता जुळता, का ही बिनसते तान?

क्रमश:
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link