Next
आइसक्रीमचा फंडा
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

“आइसक्रीमची चव पाहणं हे तुमचं काम आहे? मजा आहे की!” शाश्वत म्हणाला.
“हो,” आइसक्रीमसाठी प्रख्यात असणाऱ्या कंपनीतल्या आइसक्रीमतज्ज्ञ सईताई हसत हसत म्हणाल्या, “लहानपणी मलाही आइसक्रीम खाणं ही मजा वाटायची. पण आता ती मजेऐवजी जबाबदारी वाटते. लहानपणी अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जेवढी आइसक्रीम खायचे, तेवढी आता मला दररोज खावी लागतात. तेव्हा मी आवडणारं आइसक्रीम पुनःपुन्हा खायचे, तर आता बिघडलेलं आइसक्रीम दुरुस्त करण्यासाठी मला ते पुनःपुन्हा चाखावं लागतं. चवीबरोबरच आइसक्रीमचा रंग, गंध, स्वाद, मऊपणा, हलकेपणा, टिकाऊपणा, मिसळलेल्या अन्नघटकांची परस्पर सुसंगती अशा अनेक गोष्टींचं मला काळजीपूर्वक काटेकोर परीक्षण करावं लागतं. त्यात काही अधिक-उणं झालं असेल तर बदल सुचवावे लागतात. शिवाय, आइसक्रीमचे नवनवे प्रकारही कल्पकतेनं शोधणं, त्याची पाककृती बनवणं अशी विविध संशोधनाची कामं करण्याचंही आव्हान असतं. आइसक्रीम खाण्यापेक्षा आता मला या शोधकार्यात जास्त मजा वाटते.”
“दूध डीप फ्रीझरमध्ये ठेवलं तर ते गोठून दगडासारखं कडक बनतं. पण आइसक्रीम मात्र गोठलेलं असलं तरी मऊ आणि हलकं (फ्लफी) कशामुळे बनतं?” मुक्ताने विचारले.
“वैज्ञानिक परिभाषेत गोठलेलं दूध म्हणजे स्फटिकरूप घन आहे. याउलट आइसक्रीम हे हवा, मलई (क्रीम), साखर, रंग, वेगवेगळे अर्क आणि दूध यांचं मिश्रण गोठून बनलेलं पायस (इमल्शन) आहे,” सईताई सांगू लागल्या, “आइसक्रीम मऊ आणि हलकं बनण्यात मलईचा थोडासा उपयोग होतो, पण त्यात मुख्य वाटा असतो ‘विस्तारण’ (ओव्हररन) प्रक्रियेचा. आइसक्रीम गोठवताना त्याचं वेगानं मंथन करत त्यात भरपूर हवा मिसळतात. या हवेमुळे सुमारे एकदशांश मिलीमीटरपेक्षाही लहान आकाराचे भरपूर बुडबुडे आइसक्रीमभर मिसळून ते मऊ आणि हलकं होतं. म्हणूनच कपभर आइसक्रीम रात्री चुकून बाहेर राहिलं तर सकाळी वितळून त्याचं अर्धा कपच दूध बनतं. हल्ली अनेकांना प्रकृतीमुळे मलई कमी खायला सांगतात, त्यांच्यासाठी आइसक्रीम बनवताना त्यात नेहमीच्या निम्मीच मलई घालून ते नेहमीएवढंच मऊ आणि हलकं बनवण्यासाठी त्यात नेहमीच्या दुप्पट हवा मिसळतात. कुल्फी बनवताना मात्र विस्तारण न केल्यानं ती मऊ आणि हलकी नसते. म्हणूनच आइसक्रीमची किंमत आकारावर तर कुल्फीची किंमत वजनावर सांगतात.”
“आपल्याकडच्या कुल्फीतूनच आइसक्रीमचा शोध लागला का?” प्रथमेशने विचारले.
“कुल्फी हा आइसक्रीमचा पूर्वज,” सईताई म्हणाल्या, “कुल्फी आणि तिची भावंडं भारताप्रमाणेच चीन, ग्रीस वगैरे प्राचीन संस्कृतींमध्ये साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी जन्माला आली. तेव्हा दूध गोठवण्यासाठी उंच पर्वतशिखरांवरच्या बर्फावर अवलंबून राहायला लागायचं. बर्फ वितळू नये म्हणून लोकरीसारखे उष्णतारोधक पदार्थ वापरण्याची आणि बर्फाची गोठवणक्षमता वाढवण्यासाठी त्यात मीठ आणि अन्य क्षार मिसळण्याची युक्तीही तेव्हा वापरली जायची. परंतु एवढ्या दुरून आणलेला बर्फ फक्त राजे-रजवाड्यांनाच परवडायचा. गेल्या दोन-तीन शतकांमध्ये गोठवणयंत्रं कमी खर्चात बनवता येऊ लागल्यानंतरच कुल्फी किंवा आइसक्रीम मोठ्या प्रमाणावर मिळायला लागलं.”
“विकतचं आइसक्रीम सावकाश वितळतं, पण घरी केलेलं आइसक्रीम खूप पटकन का वितळतं?” अमनाने विचारले.
“आइसक्रीम सावकाश वितळण्याचं रहस्य आहे त्यात घातलेल्या स्थैर्यकामध्ये (स्टॅबिलायझर),” सईताई म्हणाल्या, “स्थैर्यकामुळे आइसक्रीम घट्ट होताना त्यातल्या स्फटिकांचा आकार मर्यादित राहतो. तसंच, स्थैर्यकामुळे आइसक्रीमच्या मिश्रणाची विष्यंदिता (व्हिस्कॉसिटी) वाढते. त्यामुळे आइसक्रीमला मऊशार गुळगुळीतपणा येतो. ते सहज वितळत नाही. म्हणूनच तुमच्या हातातल्या कोनावरच्या आइसक्रीमचा गोलावा बराच वेळ टिकून राहतो.”
“आइसक्रीम आणल्यावर लगेच खाल्लं तर ते जेवढं चांगलं लागतं तेवढं अनेकदा दुसऱ्या दिवशी चांगलं लागत नाही. असं का होतं?” सानियाने विचारले.
“बर्फ शून्य सेल्शियसला वितळतं, पण आइसक्रीममध्ये दूध आणि इतरही अनेक घटक मिसळलेले असल्यामुळे त्याचा वितळबिंदू आणखी दोन ते चार सेल्शियसनी खाली जातो,” सईताई म्हणाल्या, “म्हणून आइसक्रीम नेहमी डीप फ्रीझरमध्येच ठेवायला हवं, कारण तिथलं तापमान सतत आइसक्रीमच्या वितळबिंदूच्या खाली राहतं. आइसक्रीम डीप फ्रीझरमध्ये ठेवण्याऐवजी जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं तापमान काही वेळा त्याच्या वितळबिंदूच्या वर जाऊन ते द्रवरूप होतं. नंतर ते जर डीप फ्रीझरमध्ये ठेवलं तर पुन्हा घट्ट होताना त्याचे तुलनेनं मोठे स्फटिक बनतात. परिणामी ते मुळच्यासारखं चांगलं लागत नाही.”
“तब्येतीच्या दृष्टीनं आइसक्रीम खाणं चांगलं की वाईट?” सोहमने विचारले. “तब्येतीच्या दृष्टीनं आइसक्रीमचे अनेक फायदे आहेत,” सईताई म्हणाल्या, “लंडनच्या मानसोपचार संस्थेमध्ये संशोधकांनी ‘आइसक्रीम खाण्याचा मेंदूवर काय परिणाम होतो,’ याचा अभ्यास केला. त्यात त्यांना असं आढळलं की आइसक्रीम खाताच मेंदूतली आमोदन-केंद्रं (प्लेझर-सेंटर) तत्काळ उत्तेजित झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येऊन आपली चित्तवृत्ती उल्हसित होते. आइसक्रीमच्या प्रचंड लोकप्रियतेचं रहस्य यातच आहे, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. शिवाय, आइसक्रीममधून हाडांना बळकटी देणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक मिळतात. त्यातल्या पोटॅशियमचा उपयोग रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. अ, ब-६, ब-१२, क, ड आणि ई ही जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि भरपूर उर्जाही शरीराला आइसक्रीममधून मिळते”.
“पण आइसक्रीमनं दात दुखायला लागतात, त्याचं काय?” सोहमने विचारले.
“दात किडून पोकळ्या झाल्या असल्या तर आइसक्रीमच्या गारपणामुळे दात दुखतात,” सईताई म्हणाल्या, “यासाठी दंतचिकित्सकांकडे जाऊन उपचार करायला हवेत. तसंच, आइसक्रीम खाल्ल्यावर दात घासायला हवेत. भरमसाट आइसक्रीम खाण्याचे दुष्परिणामही आहेत. साखर किंवा मलईचा अतिरेक झाला तर लठ्ठपणा किंवा चरबीची फाजील वाढ होऊन अनेक विकार मागे लागतात. म्हणून, कितीही आवडत असलं तरी आइसक्रीम प्रमाणातच खावं!”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link