Next
यष्टिरक्षणाच्या दर्जात ‘वृद्धी’
भूषण करंदीकर
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २०१८ साली खेळल्या गेलेल्या मालिकेत वृद्धिमान साहा जखमी झाला होता. त्यामुळे तब्बल दीड वर्ष त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. आता पुन्हा एकदा तो भारतीय संघात खेळताना दिसतोय. ऋषभ पंतच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. त्यातच कर्णधार विराट कोहलीनं तो आताच्या घडीचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक असल्याचं म्हटल्यामुळे त्याच्या जबाबदारीतदेखील वाढ झाली आहे.
जानेवारी २०१८ मध्ये खेळल्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला काही काळ संघाबाहेर जावं लागलं. आयपीएलमध्ये त्यानं पुनरागमन केलं खरं, मात्र पुन्हा त्याला दुखापतीनं ग्रासलं होतं. आता ऋषभ पंतऐवजी वृद्धिमान साहाची निवड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण ऋषभ पंतला याआधी ज्याप्रकारे ग्लॅमर मिळालं किंवा त्याच्याकडून अपेक्षा वाढवून ठेवण्यात आल्या त्यामुळे कदाचित आता अनेकांना आश्चर्य वाटलं असेल.
भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी ज्यावेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यावेळी वृद्धिमान साहा हाच पहिला पर्याय भारतीय संघासमोर होता. त्याला संधी मिळालीही आणि त्यानं त्या संधीचं सोनं केलंही, पण जखमी झाला आणि पुन्हा भारतीय संघासमोर चांगल्या यष्टिरक्षकाचा यक्षप्रश्न उभा ठाकला. त्यावेळी ऋषभ पंतला संधी मिळाली. ऋषभ पंतला इंग्लंडदौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. पाच सामन्यांच्या या मालिकेत तिसऱ्या सामन्यात त्याचं भारतीय संघात पदार्पण झालं. आधीच्या दोन सामन्यांत दिनेश कार्तिकनं यष्टिरक्षण केलं. त्या मालिकेतल्या पाचव्या सामन्यात पंतनं त्याच्या बॅटची जादू दाखवून दिली. दुसऱ्या डावात त्यानं ११४ धावांची खणखणीत खेळी केली. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियादौऱ्यातही संघात होता. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं नाबाद १५९ धावांची खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली होती. त्यानंतर मात्र त्याचा सूर हरवला. पुढे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्याला दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावांत मिळून अवघ्या ५८ धावाच करता आल्या. या दौऱ्यात वृद्धिमान साहा संघासोबत होता. मात्र तो खेळला नाही. त्याच्या पुनरागमनासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका योग्य ठरेल, असं आपल्याला वाटल्याचं कर्णधार कोहलीनं म्हटलं होतं.
भारतीय संघावर यष्टिरक्षक शोधण्याची ही वेळ पहिल्यांदाच आली असं नाही. धोनी संघात येण्याआधीचा काळ पाहिला तर त्यावेळी ‘द वॉल’ राहुल द्रविड भारतीय संघात यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत होता. धोनी आल्यानंतर हा शोध थांबला. एका वर्षापूर्वी साधारण अशीच परिस्थिती होती. यातून एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे जी वेळ द्रविडवर आली ती पुन्हा इतर कोणत्याही क्रिकेटपटूवर येऊ नये याची काळजी निवडसमितीने घेतली आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी आता खरी चुरस निर्माण झाली आहे. यष्टिरक्षणासाठी अनेक पर्याय सध्या भारतीय निवड समितीसमोर आहेत असंच दिसतंय. प्रत्येकाला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे आणि त्यानुसार काही बदल संघात होताना दिसत आहेत. सध्या फक्त यष्टिरक्षकांचा विचार केला तर पंत आणि साहा ही दोन ठळक नावं आहेत. के.एल. राहुल हा वेळप्रसंगी यष्टिरक्षण करू शकतो. त्यामुळे सध्या तरी यष्टिरक्षणाचा फारसा प्रश्न निवड समितीसमोर नाही. साहाला खुद्द कोहलीनं सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षकाचं प्रमाणपत्र दिल्यावर साहाला येत्या काही दिवसांत स्वतःला पुन्हा सिद्ध करावं लागणार हे निश्चित, कारण पंत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात खराब खेळला म्हणून त्याला वगळण्यात आलं असा त्याचा अर्थ निघू शकतो, मात्र पंतला अजून संधी आहे हेही तेवढचं खरं! आता साहा आणि पंत यांच्यात कसोटीसंघात कोण उपयुक्त ठरतयं हे कळेलच. दोघांकडे समसमान संधी आहे. तेव्हा पंतनं निराश होऊ नये आणि साहानं हुरळून जाऊ नये, एवढीच अपेक्षा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link