Next
पुन्हा भेटूच!
पुष्कर श्रोत्री
Friday, May 31 | 01:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार, सुरुवातीच्या काळातील माझी नोकरी, मग छोकरी (म्हणजे लग्न) आणि नाट्यक्षेत्रात स्थिरावणं इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला मागच्या भागात सांगितला होता. या लेखमालेच्या माध्यमातून मी तुमच्याशी खूप गोष्टी शेअर केल्या. आता लेखमालेच्या समारोपाकडे आलो आहे. या टप्प्यावर आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगव्याशा वाटताहेत. 

‘दामिनी’ मालिकेतील ‘मॉन्टी’च्या भूमिकेपासून माझ्या चेहऱ्याला ओळख मिळू लागली. त्या भूमिकेपासून ते ‘अरे हा तर पुष्कर श्रोत्री’ इथपर्यंतचा प्रवास हा थोडाथोडका नव्हे तर पंचवीस वर्षांचा होता. काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो. एकदा मी पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहसमोरील गंधर्व हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे एक जोडपं त्यांच्या तेरा-चौदा वर्षांच्या मुलीबरोबर बसलं होतं. त्या मुलीच्या पालकांनी माझ्याजवळ येऊन विचारलं, की आमच्या मुलीला भेटाल का? मी ‘हो’ म्हटलं आणि त्या मुलीला भेटलो. ती म्हणाली, “पुष्करदादा, मला तुझं काम खूप आवडतं. मी ऐकते तुझे सगळे कार्यक्रम.” ‘ऐकते’म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं की ती मुलगी दृष्टीहीन होती. वेटरला ऑर्डर देताना तिनं माझा आवाज ऐकून मला ओळखलं होतं. मला एकदम भरून आलं. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद मलाही आनंद देऊन गेला. असे प्रसंग, वेगवेगळ्या वयोगटांतल्या, देशांतल्या मराठी प्रेक्षकांकडून मिळणारे अभिप्राय यामुळे माझ्यातला नट कायम जागरूक राहिला. ‘हसवाफसवी’चे प्रयोग करू लागलो तेव्हा त्यामागे उद्दिष्ट होतं की आपल्यातील नटाला स्वस्थ बसू द्यायचं नाही. करिअरच्या या टप्प्यावर काहीतरी वेगळं करायचं. परंतु मी थोडा साशंक होतो. चंद्रकांत कुलकर्णींनी मला विचारलं तेव्हा मी म्हटलं, की करायला आवडेल परंतु दिलीपकाकांनी एवढे प्रयोग केले आहेत, लोकांकडे डीव्हीडी आहेत मग मी कसं करू? त्यावर चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, की ‘खुद्द दिलीप प्रभावळकरांनी तुझ्या नावाला होकार दिला आहे.’ मग मी त्यांना फोन केल्यावर ते म्हणाले, “हे नाटक परत करायचं असेल तर ते तू करावंस आणि मला फॉलो न करता तुझ्या पद्धतीनं करावंस असं मला वाटतं.” मी त्यांना विचारलं, की त्यातील पात्रं मी आजच्या काळाच्या संदर्भात सादर करू शकतो का? तर दिलीपकाका म्हणाले, “खुशाल कर.” त्यांच्याकडून हा आशीर्वाद मिळाल्यावर मी अभ्यास सुरू केला. जवळपास दीड वर्ष त्यातील पात्रांचा अभ्यास केला. त्यातील चिमणरावांचं पात्र मी दिलीपकाकांना अभिवादन म्हणून तसंच ठेवलं आणि बाकीची पात्रं आजच्या काळाशी जोडली. पात्रं तीच, परंतु संदर्भ आजचे. आता मोबाइल आहेत, आताचा चायनीज माणूस वेगळा आहे, आताचा बॉबी मॉड कसा असेल, माझी जुळी बहीण कशी असेल याचा अभ्यास करून ती पात्रं उभी केली. प्रेक्षक नाटक पाहिल्यावर मला भेटतात तेव्हा मी केलेला प्रयत्न आवडल्याची पोचपावती देतात. एका वृद्ध प्रेक्षकानं तर मला नमस्कार केला आणि म्हणाले, “हे वंदन तुमच्यातील कृष्णराव हेरंबकरांना आहे.”  आम्ही एक छोटा संदेशही देतो की तुमच्या आजूबाजूच्या वृद्ध माणसांशी घरातल्यांनी दोन मिनिटं प्रेमानं बोला. हा संदेश ऐकल्यावर वृद्ध प्रेक्षक खूप भावूक होऊन माझ्याशी बोलतात. खरं तर ‘हसवाफसवी’ हे नाटक प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. पण जेव्हा ते पाहतात की पात्रं तीच असली तरी संदर्भ आजचे आहेत तेव्हा त्यांना ते फार आवडतं. हा अभिप्राय आम्हाला परदेशातील प्रेक्षकांकडूनही मिळतो.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो तो म्हणजे माझ्या दिग्दर्शनाच्या अनुभवाचा. शाळा आणि मुलं हे दोन माझे अत्यंत आवडते विषय. म्हणजे मुलांशी तर मी कितीही वेळ गप्पा मारू शकतो. त्यामुळे हा विषय अनेक दिवसांपासून डोक्यात होता. भालचंद्र कुबल आणि अनुराधा इंदुलकर यांनी ‘उबंटू’ चित्रपटाची गोष्ट ऐकवली. मी त्यात आवश्यक तिथे सुधारणा करून त्यांना संहिता परत दिली आणि एखाद्या दिग्दर्शकाकडे जाण्याचं सुचवलं. ते म्हणाले, ‘की तूच हा चित्रपट करावा, असं आमचं मत आहे. कारण तू या कथेवर एवढं काम करू शकतोस तर तूच दिग्दर्शन कर.’ माझ्यासाठी हे पुन्हा एक नवीन आव्हान. मी पुन्हा त्या कथेवर काम करू लागलो. हा चित्रपट आता केला नाही तर त्यातील सत्त्व निघून जाईल, असं वाटल्यानं निर्मात्याची जबाबदारीही मीच घेतली. काही लोकांना भेटलो होतो, परंतु सगळे कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होते. मग मीच निर्माताही बनलो. या चित्रपटासाठी मला, आधी अभिनय केलेली आणि आई-वडिलांच्या सांगण्यावरून अभिनय करणारी मुलं नको होती. मग मी अशी मुलं निवडली की ज्यांच्या पाट्या कोऱ्या होत्या. त्यांची एक छोटीशी कार्यशाळा घेतली. मुलांनी मला खूप छान अनुभव दिला. त्यांनी मलाही खूप शिकवलं. त्यात सुबोध भावेचा मुलगा कान्हासुद्धा होता. सगळ्यात खोडकर तोच होता, असं मी आजही गमतीनं म्हणतो. मुलं रोज मला काहीना काही प्रश्न विचाराची. मीही ठरवलं होतं की त्यांना नाराज करायचं नाही आणि त्यांचा प्रश्न अनुत्तरित ठेवायचा नाही. त्यांच्या प्रश्नांना मी उत्तरं द्यायचो. त्या सगळ्या मुलांनी सेटवर केलेली धमाल नंतर सगळ्यांना पडद्यावरही दिसली. कोकणात आम्ही शूटिंग केलं होतं. पालकांनी मुलांना माझ्यावर सोडलं होतं. अठरा दिवस आम्ही तिथे होतो. मुलं त्यानिमित्तानं मनसोक्त बागडली. त्या चित्रपटातील ‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही प्रार्थना खूप लोकप्रिय झाली. आजही अनेक शाळांमध्ये ती म्हटली जाते. मध्यंतरी एका ख्रिश्चन शाळेच्या वार्षिक समारंभाची सुरुवात या गाण्यानं करण्यात आली होती हे ऐकून मी चकितच झालो. मात्र मला खूप बरंही वाटलं. ‘उबंटू’ चित्रपट खूप लोकप्रिय झाला. जर्मनीत आम्ही चित्रपट दाखवला होता तेव्हा तिथल्या मुलांना शब्द कळले नसले तरी ती प्रार्थना खूप आवडली होती. तिथल्या शिक्षकांनीही माझा हात हातात धरून अभिनंदन केलं होतं. ‘आमच्याकडे फुकट शिक्षण आहे, म्हणून त्याची किंमत नाही. भारतीय शिक्षणाबद्दल आम्ही खूप ऐकलंय. आज तुमच्यामुळे वेगळा चित्रपट बघायला मिळाला याचा आनंद वाटला,’ असा अभिप्राय त्यांनी दिला, तेव्हा मलाही खूप बरं वाटलं. जगभरातील बालपटांच्या महोत्सवात या चित्रपटाला ‘बेस्ट फिक्शन’ गटात पुरस्कार मिळाला तो आनंदाचा क्षण होता. 

जाता जाता माझं प्रेक्षकांना हेच सांगणं आहे, की चांगले चित्रपट येत असतात. तुम्ही ते चित्रपटगृहातच जाऊन बघा आणि आपला मराठी सिनेमा मोठा करा. पायरसीच्या मागे लागू नका किंवा टीव्हीवर बघायला मिळेल याची वाट बघत बसू नका. चित्रपट, नाटक यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. उत्तमोत्तम चित्रपट, नाटकं तुम्हाला बघायला मिळतील हे नक्की. मराठी सिनेमा चालावा यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तेवढं करा हीच विनंती. पुन्हा भेटूच! लोकप्रतिनिधी आणि कलाकार यांना सहज भेटता येईल अशा पद्धतीनं त्यांनी उपलब्ध असावं असं मानणारा मी आहे. तेव्हा आपणही पुन्हा भेटूच. तूर्तास थांबतो. धन्यवाद.                  (समाप्त)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link