Next
मी पुलंच्या कुटुंबातीलच!
श्रीकांत मोघे
Friday, November 30 | 05:58 PM
15 0 0
Share this story

माझं आडनाव मोघे असलं तरी मी देशपांडे कुटुंबातील सदस्य आहे. ऐकून हैराण व्हायला होतं ना! पण ते खरं आहे, कारण पु.ल. देशपांडे यांच्याशी माझं नातं इतकं कौटुंबिक होतं. विशेष म्हणजे ‘वाऱ्यावरची वरात’ची पहिली जाहिरातच ‘पु. ल. देशपांडे सहकुटुंब, सहपरिवार सादर करीत आहेत’ अशी होती आणि त्यात एक महत्त्वाचं नाव श्रीकांत मोघे असं होतं. यावरून आमच्या नात्याची कल्पना येईल. उमाकांत आणि रमाकांत ही पुलंची दोन सख्खी भावंडं. त्या दोघांत मी तिसरा, म्हणजे उमाकांत, श्रीकांत आणि रमाकांत असंच म्हणाना! सुनीताबाई आणि पुलंनी अगदी सख्ख्या भावंडासारखंच प्रेम मला दिलं.

वास्तविक पुल आणि माझ्यात १० वर्षांचं अंतर आहे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९चा आणि माझा जन्म ६ नोव्हेंबर १९२९ रोजीचा. पाहा इथंही किती साम्य आहे ते! हे सर्व सांगण्याचं कारण त्यांच्याशी माझी जुळलेली नाळ. ते वर्ष होतं १९४९. मी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये मी शिकायला होतो. त्याच काळात एमए करण्यासाठी पुलदेखील तिथं आले होते. अगोदरच त्यांच्या लेखणीनं मी झपाटलो होतो. आता तर साक्षात पुल समोर आल्यामुळे माझ्यातील कलाकाराला आयतीच संधी मिळाली होती. पुढे, १९५० साली मी शिक्षणासाठी पुण्यात आलो आणि एसपी कॉलेजला प्रवेश घेतला, त्यावेळी आमच्या कॉलेजच्या ग्रुपनं इन्स्पेक्टर जनरल या नाटकावर बेतलेलं पुलंचं गाजलेलं ‘अंमलदार’ हे नाटक सादर केलं होतं. त्यातील सर्जेरावची माझी भूमिका मला नाव देऊन गेली आणि या भूमिकेसाठी वाळवेकर ट्रॉफी मिळाली. या नाटकाचं दिग्दर्शन शरद तळवलकर यांनी केलं होतं. यातील भूमिका पाहून पुलंनी माझ्या नावाची शिफारस ‘अंमलदार’नाटकावरून तयार होणाऱ्या चित्रपटासाठी केली होती. पुलंनी माझी शिफारस करावी, ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर पुलंशी जोडला गेलो तो कायमचाच!

पुलंना मी कधीही दु:खीकष्टी पाहिलं नाही. ते कायम हसतमुख असायचे आणि इतरांनाही हसत हसत जगण्याचा मंत्र द्यायचे. जीवन कसं आहे हे पुलंनी त्यांच्या लिखाणातून, व्यक्तींमधून तसंच सादरीकरणातून कायम मांडलं. त्यांच्यामुळे जीवनाकडे पाहण्याची मराठी माणसाची दृष्टी बदलली, असं मी म्हणेन. एवढी वर्षं त्यांच्यासोबत होतो, पण भाईंनी कधीही खोटी दाद दिल्याचं पाहिलं नाही. त्यांची दाद उत्स्फूर्त असायची. त्यांच्यामुळे कुठल्याही मैफिलीत रंगत यायची. त्यांच्या विनोदबुद्धीची सर्वांनाच माहिती आहे. पुलंना व्यवहार कधी जमला नाही, त्यामुळे सुनीताबाईंना थोडं कडक वागायला लागायचं. त्यावरून पुल सुनीताबाईंना ‘उपदेश-पांडे’ म्हणायचे.

पुलंसोबत ‘वाऱ्यावरची वरात’ केलं तो अनुभव तर अगदी भन्नाट होता. आम्ही सगळे तयारच असायचो आणि रंगभूमीवर कधी एकदा दंगा करायला मिळेल यांची वाट पाहत असायचो. त्यांनी कधीही कुठल्या कलाकाराला रोखलं नाही, की कुणावर ओरडले नाहीत. आमच्या गुणांना चावी देण्याचं काम त्यांनी केलं. एखादा कलाकार उत्तम करतोय म्हणून त्याला त्यांनी रोखला नाही. त्यातील ‘दिल दे के देखो’ आणि ‘चा चा चा’ या गाण्यांसाठी त्यांना मला शम्मी कपूरचा ‘जंगली’ चित्रपट पाहायला सांगितलं होतं. प्रत्येकाचा अभिनय फुलवण्यासाठीच ते प्रयत्नशील असायचे.

आम्ही कलाकारांनी एखादी अॅडिशन घेतली तर पुल त्यांची कशी दखल घेत याचा ‘वाऱ्यावरची वरात’मधला एक किस्सा सांगतो. एकदा मधू कदम आणि माझे संवाद सुरू होते. त्या दिवशी मधू अगदीच सुटला होता. शेवटी मी ‘दम नाही आणि स्वत:ला कदम म्हणतो का रे?’ अशी अॅडिशन घेतली आणि कदम शांत झाला. मात्र पुलंनी त्यांच्या संवादात माझ्या या अॅडिशनची दखल घेतली. “अहो, मघाशी तुम्ही कदम म्हणालात आणि आता म्हणता ऱ्हिदम”, असा प्रश्न पुल विचारतात. त्यावर “तसं नव्हं पावणं, जो वाजवतो तो कदम जे वाजवितो ते ऱ्हिदम” असं उत्तर मी देतो. ही अॅडिशन होती आणि पुलंनी तिला तेवढीच समर्पक दाद दिली होती.
‘वाऱ्यावरची वरात’चे प्रयोग सुरू असताना एकदा मधू कदम मुलगा झाल्याचे सांगत पेढे घेऊन आला होता. सर्वांनी पेढे खाल्ले आणि मधूला शुभेच्छा दिल्या. भाईंनी पेढ्यासाठी हात पुढे करताना ‘कदम कदम बढाये जा’ असं बोलून एकच हशा उडवून दिला होता. पुल हरहुन्नरी होते, हातचं राखणं वगैरे त्यांना जमत नव्हतं. त्यांनी मराठी भाषेचं वैभव फुलवलं होतं, शब्दांत प्राण फुंकले होते. विविध भाषांविषयी त्यांना विलक्षण प्रेम होतं. म्हणूनच अगदी बंगाली भाषादेखील त्यांनी आत्मसात केली होती, तेही गुरुदेवांच्या शांतिनिकेतनमध्ये जाऊन!

भाई आतून-बाहेरून अगदी स्वच्छ होते. आत एक आणि बाहेर एक, असा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे उत्सव असायचा आणि रिहर्सल म्हणजे मैफल असायची. त्यांनी रंगवलेल्या मैफिलीचा आनंद आम्ही आजही घेत आहोत. जसा चार्ली चॅप्लिन तसे पुल, हसवता हसवता अंतर्मुख करणारे होते.
(शब्दांकन : अविनाश चंदने)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link