Next
आधी शोध लग्नस्थळाचा
आदित्य बिवलकर
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story


लग्नाची लगबग सुरू झाल्यानंतर सर्वात आधी हॉलच्या बुकिंगची मागणी सुरू होते. अनेकदा चांगले मुहूर्त असूनसुद्धा केवळ हॉलची उपलब्धता नसल्यानं लग्नाच्या तारखा बदलल्या जातात. ठाण्यातील टिप टॉप हॉल किंवा मुलुंडमधील अग्रवाल हॉल, शहनाई हॉल यांसारखे हॉल एक ते दीड वर्ष आधीच लग्नाच्या तारखेसाठी बुकं केले जातात. सर्व हॉलमालकांद्वारे पंचांगानुसार मुहूर्ताची यादी तयार केली जाते. याचबरोबर काही चांगल्या ‘काढीव मुहूर्तां’चा पर्यायसुद्धा तयार करून ठेवलेला असतो. त्यानुसार हॉलची निवड केली जाते. साधारणपणे डिसेंबर, फेब्रुवारी आणि मे महिन्यामधील लग्नाच्या बुकिंगसाठी वर्षभर आधी गर्दी होते. त्यामुळे निश्चित असल्यास त्वरित बुकिंग करण्याचा सल्ला हॉलमालक देतात.

लग्नाचा मुहूर्त हॉलच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. स्पर्धेमुळे हॉलवालेही आता वेगवेगळे पर्याय, निरनिराळी आकर्षक पॅकेज देऊ लागले आहेत.

सेवांमध्ये वाढती मक्तेदारी
पूर्वी लग्न म्हटलं, की हॉलची निवड झाल्यानंतर केटरिंग, सजावट, संगीत, मेहंदी यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या माणसांची निवड करावी लागत असे. वाढलेल्या स्पर्धेमुळे आता हॉलमालकांनी त्यांचे नियम बदलले असून फक्त हॉलचं बुकिंग देण्याऐवजी संपूर्ण पॅकेजच उपलब्ध करून दिलं जातं. मेहंदी, संगीतपासून रिसेप्शनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये असतो. याशिवाय बजेटनुसार फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, फटाक्यांची आतषबाजी, डेकोरेशन्स, लाईटशो असे अनेक पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील काही बड्या सभागृहांमध्ये तर चक्क रिसेप्शनच्या एन्ट्रीसाठी हेलिकॉप्टर राइडचा पर्यायही उपलब्ध आहे. अर्थात त्यासाठी साडेचार लाख रुपये मोजण्याची तयारीसुद्धा हवी.

एकीकडे एकाच छताखाली या सगळ्या सुविधा मिळत असल्या तरीही हॉलमालकांच्या मक्तेदारीमुळे आणि त्यांच्या अटींमुळे काहीवेळा त्याचा त्राससुद्धा सहन करावा लागतो. पॅकेजमधल्या गोष्टींसाठी बऱ्याचदा हॉलमालक चढे दर आकारतात. स्वस्त दरासाठी एखादी गोष्ट बाहेरून घेतल्यास त्यासाठी हॉलला जादा पैसे देऊन मगच परवानगी दिली जाते. साधारणपणे पाच ते सहा लाखांच्या घरामध्ये हे पॅकेज असतं. काही छोट्या सभागृहांमध्ये दीड ते दोन लाखांमध्ये संपूर्ण लग्नसोहळा करून दिला जातो. मात्र त्यासाठी असणाऱ्या सेवा, माणसांची संख्या मर्यादित असतात.

लग्नाची खरेदी, मेहंदी, हळद, सीमांतपूजन यानुसार कपड्यांची थीम, त्याचबरोबर लग्नस्थळी रोशणाई, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत आदींद्वारे हा सोहळा दिमाखदार बनवण्याकडे कल वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे वेडिंग प्लानर अथवा पॅकेज सिस्टिम देण्यावर लग्नाळू कुटुंबांचा भर असतो. नवरीसाठी डोली, नवरदेवासाठी घोडा, बॅन्ड, बग्गी यांचीही मागणी पॅकेजमध्ये केली जात असल्यानं कोणतीही धावपळ न करता शाहीविवाहसोहळ्याचं स्वप्न पालक या माध्यमातून पूर्ण करतात.

लॉन्सला पसंती
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागांमध्ये लग्नासाठी कार्यालयाऐवजी खुल्या लॉन्सना पसंती देण्याकडे कल आहे. या लॉन्सवर मंडप उभारून, सजावट करून, एक थीम ठरवून लग्नसोहळा आयोजित केला जातो. शिवाय फोटोग्राफीसाठी फोटोग्राफरसुद्धा लॉन्सला प्राधान्य देतात. ठाण्यातील घोडबंदरपट्टा तसंच मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी लॉन्सचे पेव फुटलं आहे. दिल्ली, इंदूर, राजस्थान या भागांमध्ये या प्रकाराची सुरुवात झाली. ती संस्कृती आता आपल्याकडे मोठ्या प्रकारावर रुजू लागली आहे. लॉन्सवर होणाऱ्या लग्नसोहळ्यासाठी साधारणपणे साडेचार लाखांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असतो.
हल्ली थीम वेडिंग हा प्रकार प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. थीमनुसार डेकोरेशन, तसे पेहराव, दागदागिने परिधान करण्यास पसंती दिली जाते. लॉन्सवर थीम वेडिंग करण्यास ऐसपैस जागा गरजेची असते. हवं तसं डेकोरेशन करता येत असल्यानं कार्यालयांपेक्षा लॉन्सवर लग्न करण्याचा हा ट्रेंड हल्ली मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. थीमवर आधारित आकर्षक देखावे, रंगीत कारंजी, फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या साहित्याची सजावट करून लग्नमंडप सजवले जातात. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची चांदी होत आहे.

हायवेलगतचं गाव... नवीन डेस्टिनेशन
शहरातील वाढती गर्दी, हॉलचे चढे दर, पार्किंगची समस्या यामुळे शहरापासून काहीशा दूर अंतरावर लग्न करण्याला अलिकडे पसंती मिळत आहे. यामुळे हॉलचं पेव आता राष्ट्रीय महामार्गांच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यांच्या गावांमध्ये वाढलं आहे. नारायणगाव, मंचर, आळेफाटा, कल्याण-मुरबाडरोड, घोडबंदररोड भागांमध्ये वेगवेगळ्या हॉलची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे या भागांतील स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध होत आहे. हायवेलगतच्या जमीनमालकांनी जमिनीच्या जागेमध्येच हा नवीन व्यवसाय सुरू केला असून त्याला चांगली पसंती मिळत आहे. शिवाय शहरातील लग्नसोहळ्यापेक्षा इथं खर्चसुद्धा कमी होतो. त्यातच पार्किंग आणि इतर सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे या ठिकाणांना पसंती असते.

पार्किंगची अडचण
लग्नसोहळ्यात हॉलची निवड करताना पार्किंग ही महत्त्वाची समस्या ठरते. विशेषतः शहरी भागातील हॉलमध्ये पार्किंग उपलब्ध होत नाही. केवळ वधू-वर आणि कुटुंबीयांच्या गाड्यांनाच मर्यादित पार्किंगमध्ये जागा दिली जाते. अशावेळी बऱ्याचदा निमंत्रितांनी रस्त्यावरच पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवते. त्यामुळेच पार्किंग आणि इतर गोष्टींचा विचार करून काही वेळा शहरापेक्षा लांब असणाऱ्या हॉलला पसंती दिली जाते. काही नव्या गगनचुंबी इमारतींमध्ये बँक्वेट्स हॉल तयार झाले आहेत, त्यात तळघरामध्ये पार्किंग असते. ‘व्हॅले पार्किंग उपलब्ध’ अशी नोट पत्रिकेमध्येच टाकली जाते आणि या व्हॅले पार्किंगच्या कर्मचाऱ्यांचा वेगळा दरही आकारला जातो.

जिमखाना, थ्रीस्टार हॉटेलचा पर्याय

मध्यमवर्गीय, उच्च मध्यवर्गीयांनी एकीकडे हॉल तसंच लॉनचा पर्याय स्वीकारलेला असताना जिमखाने, क्लब, थ्रीस्टार हॉटेलचा पर्यायसुद्धा तेजीत आहे. बॉम्बे जिमखाना, सीसीआय, डेक्कन क्लब याचबरोबर मुंबईतील अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये लग्नसोहळे नियमित पार पाडले जातात. यामध्ये व्हॅले पार्किंग, पिकअप-ड्रॉप सुविधा, रेस्टरूम्स यांसारख्या अनेक सुविधा दिल्या जातात. याचबरोबर जिमखान्यांमधील सोहळ्यांच्या बुकिंगसाठी जिमखाना सदस्यांना प्राधान्य तसंच सवलती दिल्या जातात. मात्र तिथले खाद्यपदार्थांचे दर आणि इतर खर्च यामुळे हा पर्याय महागडा ठरतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link