Next
नवे पर्व, नवा विचार
शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी
Friday, August 23 | 02:45 PM
15 0 0
Share this story


नमस्कार,  मागच्या भागात मी माझ्या करिअरच्या त्या कालखंडाविषयी लिहिलं होतं, ज्यानं मला कथानायिका किंवा ‘हिरोईन’ म्हणून ओळख मिळवून दिली. ही मुलगी कोणतीही भूमिका एकटीनं पेलू शकते हा विश्वास निर्मात्यांना दिला. मात्र मध्यवर्ती भूमिका ते कथानायिका यामधला जो काळ होता त्या काळात या क्षेत्राचा मला जवळून अभ्यास करता आला  आणि तो नक्कीच पुढे फायदेशीर ठरला. व्यावसायिक गणिताचा अंदाज यायला लागला, निर्मितीची प्रक्रिया कळू लागली आणि मग तिथून निर्माती होण्याची माझी वाटचाल सुरू झाली. तिथेच करिअरनं एक नवीन वळण घेतलं.
वेगवेगळ्या नाटकांमधून काम करताना माझं नेहमी म्हणणं असायचं की सेट चांगला असला पाहिजे, म्युझिक सिस्टिम चांगली असली पाहिजे, प्रेक्षकांनी नाटकांकडे वळावं असं वाटत असेल तर त्याची गुणवत्ता, दर्जा चांगला असला पाहिजे वगैरे. ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिनू पेडणेकर मला एकदा म्हणाले, की ‘तुला एवढं कळतंय, नाटकाविषयी एवढं वाटतंय, तर तूच निर्माती का होत नाहीस?’ मला ठाऊक होतं की ते वाटतं तेवढं सोपं काम नाहीये. दिनूकाका म्हणाले, ‘निर्माती झालीस तर तुला हवं ते नाटक, हव्या त्या पद्धतीनं करता येईल. मी मदत करतो, चल.’ आणि मग एका क्षणी मलाही वाटलं की हे म्हणताहेत ते बरोबर आहे. आपल्याला नेहमी बऱ्याच शंका असतात, हेच पाहिजे, ते नको. प्रयोगाच्या दर्जाच्या बाबतीत तक्रारीही असतात, तर मग आपण यात उडी मारून बघायला काय हरकत आहे? असा विचार केला आणि दिनूकाकांच्या मदतीनं निर्मितीक्षेत्रात उतरले. माझी पहिली निर्मिती होती ‘छापा काटा’ हे नाटक. ते वर्ष होतं २०१३. तिथून खऱ्या अर्थानं निर्मितीच्या प्रवासाला सुरुवात झाली. ते नाटक फारच सुंदर चाललं. त्याचे पहिले सव्वाशे प्रयोग रीमाताईनं केले आणि नंतरचे सुमारे दीडशे प्रयोग नीनाताईनं केले. एक निर्माती म्हणून तांत्रिक बाबींची मला जी पूर्तता करायची होती ती मी केली. निर्मितीमागची वेगळी गणितं कळू लागली. त्यानंतर निर्माती म्हणून मी ‘लव्हबर्ड्स’ नाटक केलं. मिलिंद जोशीबरोबर ‘रंग नवा’ हा कवितांचा आगळावेगळा कार्यक्रम केला, मग ‘इंदिरा’ नाटकाचे काही प्रयोग केले. हे सगळं करत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे कळत गेलं. नाटकाला बुकिंग नसेल आणि नाटक चालवायचं असेल तर मग काय केलं पाहिजे हे स्वतः शोधत गेले. कधी कधी असंही व्हायचं, की मी स्टेजवर एन्ट्री घेतली आणि फारसे प्रेक्षक दिसले नाहीत, तर माझ्या पोटात गोळा यायचा. माझ्यातली निर्माती जागी व्हायची आणि मग डोक्यात नाटक चालू व्हायला किंवा मी त्या प्रयोगाशी एकरूप व्हायला वेळ लागायचा. द्विधा मन:स्थिती व्हायची. तेव्हा माझे बाबा म्हणाले, ‘एकदा एन्ट्री घेतलीस की तुझ्यातल्या निर्मातीवर तू अंकुश ठेवला पाहिजेस. बुकिंग किती आहे हे तू त्यावेळी विसरून गेलं पाहिजेस. ज्यावेळी जिथे असशील, तिथे त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत जा आणि हे तुला सहज जमेल.’ मग मी बाबांच्या सांगण्यानुसार करण्याचा प्रयत्न केला आणि सरावानं तेही जमून गेलं. त्यानंतर माझ्यातली निर्माती व माझ्यातील अभिनेत्री यांचा कधी संघर्ष झाला नाही.
व्यवसाय म्हटल्यावर चढ-उतार असणारच, हे कळायला थोडासा वेळ गेला. निर्माती म्हणून मी काही गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं, ज्या मला पूर्वी खटकायच्या. पहिली गोष्ट म्हणजे साऊंडची गुणवत्ता उंचावली, नाटकांच्या सेट्सचा मेंटेनन्स सुरू केला, पडद्यामागील कलाकारांनाही रीतसर नाटकाच्या तारखा देण्याची पद्धत आम्ही सुरू केली. कारण नाटकातील कलाकाराइतकाच बॅकस्टेजचा माणूसही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे त्यांना कुणी नाटकाच्या तारखा देत नाहीत. थेट प्रयोगाच्या दिवशी बोलावतात. परंतु आम्ही त्यांच्याही तारखा घ्यायला सुरुवात केली. कारण मला बॅकस्टेजची माणसंही नेहमीचीच लागायची. अमुक एक असं का नाहीये, ते असं असायला हवं किंवा ते तसं व्हायला हवं, या गोष्टी मी स्वतःहून जबाबदारीनं करू लागले. एरवी या तक्रारी वाटल्या असत्या, पण निर्माती झाल्यावर मी त्या जबाबदाऱ्या म्हणून घेऊ लागले. मी हाही धडा घेतला की निर्माती म्हणून स्वतः एक नाटक करत असताना आणि त्यात जर मी भूमिकाही करत असेन तर त्यावेळी दुसरं काम घेणार नाही. कारण माझं काम दुसऱ्यावर सोपवून मी तिसरंच काहीतरी करतेय असं होऊ द्यायचं नाही, हे शिकले. मी असते तेव्हा प्रयोग खूप चांगला होतोय पण एखादवेळेस मी नाहीये म्हणून दुसऱ्या कुणाला व्यवस्थापनाचं काम दिलं तर काहीतरी गडबड होते हे माझ्या लक्षात आलं. काही गोष्टी या अशा असतात की ज्या तुम्ही स्वतः तिथे असल्याशिवाय होत नाहीत हेही मी या अनुभवातून शिकले.  बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी आम्ही ‘सखाराम बाईंडर’चे पाच प्रयोग केले. हे सगळं मी करू शकले कारण मीच निर्माती होते. एकदा तुमची निर्मितीसंस्था स्थिरावली की मग लोकांनाही अंदाज येतो, तुम्ही काय करणार आहात याचा. मग लोकांशी बोलणं, त्यांच्याकडे शब्द टाकणं या गोष्टी करता येतात. बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी आपण प्रयोग करूया, असा शब्द टाकून मी ते जुळवून आणू शकले. प्रयोग चांगला होतो, हा विश्वास लोकांच्या मनात तोपर्यंत निर्माण झाला होता. त्यामुळे मला अनेकांनी मदत केली. राहुल रानडे, प्रसाद वालावलकर, ललित कला केंद्राचे विद्यार्थी, संजय कृष्णाजी पाटील यांनी खूप मदत केली. कारण त्यांना माहीत होतं की हे कुणासाठी आणि का आयोजित केलं जातंय. ‘रसिका–अनामिका’ संस्थेची ही पुण्याई होती. इथे मला आणखी एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे माझ्या संस्थेच्या नावाविषयीचा. आधीपासून माझ्या मनात होतं की नाट्यक्षेत्रात काही चांगलं घडणार असेल तर त्याचं नाव ‘रसिका’ असलं पाहिजे. सुप्रसिद्ध अभिनेत्री रसिका जोशी माझी अत्यंत जवळची मैत्रीण आणि फारच ताकदीची कलाकार. असा एकही दिवस जात नाही की तिची आठवण येत नाही. माझी मैत्रीण इतकी छान होती आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा देणारी व्यक्ती होती तर तिची आठवण काढून रडत बसण्यापेक्षा मी काहीतरी नवीन चांगलं करेन आणि त्यानिमित्तानं तिची आठवण जपेन. आनंद देणाऱ्या गोष्टीला तिचं नाव द्यायचं असं ठरवून मी तेच नाव दिलं. मला खूप छान वाटतंय की त्या नावाखाली जे निर्माण केलं ते चांगलं होतं आणि पुढेही जे माझ्या हातून घडेल तेही चांगलंच असेल, त्यातून तिची आठवण कायम ताजी राहील.
निर्माती म्हणून माझ्यासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि प्रचंड आव्हानात्मक कलाकृती म्हणजे ‘कोडमंत्र’ हे नाटक. पन्नास-साठ जणांचा ताफा असलेलं नाटक उभं करताना मी अक्षरशः घाबरले होते. ते एक शिवधनुष्य होतं. ते कसं पेललं ते नक्की वाचा... पुढच्या भागात.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link