Next
‘कॉमेडी करणं सोपं नाही’
प्रतिनिधी
Friday, May 10 | 03:30 PM
15 0 0
Share this story


कॉमेडी करणार हे कळल्यावर कशा प्रतिक्रिया मिळाल्या?
प्रेक्षकांपेक्षा माझ्यावरच कलाकार म्हणून थोडं दडपण होतं. कारण मी याआधी कधीच कॉमेडी केलेली नाही. त्यामुळे माझ्या चाहत्यांनाही थोडी धाकधूक होती, की मी कॉमेडी कशी करेन. कारण प्रेक्षकांचा एखादा कलाकार जर आवडता असेल तर त्याची कमकुवत बाजू त्यांना बघायला आवडत नाही. त्यामुळे माझ्यावर कलाकार म्हणून खूप मोठी जबाबदारी होती. प्रेक्षकांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी मी साकारलेल्या भूमिकांवरही भरभरून प्रेम केलं आहे. कॉमेडी करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. हे मी प्रेक्षकाचं प्रेम आणि विश्वासामुळेच करू शकते आहे.

कॉमेडी करणं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक आहे?
कॉमेडी करणं हे खूपच आव्हानात्मक आहे. कारण मुळात तुमच्या अंगात ते असावं लागतं. तसंच कॉमेडीचं टायमिंग हे कुठल्याही कार्यशाळेत शिकवलं जात नाही, ते तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि देहबोलीत असलं पाहिजे तरच विनोद हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. कॉमेडी करणं सोपं नाही. पण, सरावामुळे कलाकार परिपूर्ण होतो, त्यामुळे मी सराव करत आहे. त्यामुळे जशी जशी ही स्पर्धा पुढे जाईल तसं हळूहळू माझं कॉमेडीचं कौशल्य अधिक चांगल्यारीतीननं प्रेक्षकांसमोर मांडू शकेन.  

‘कोकणचे हास्यसम्राट’या कुशलच्या टीमची सदस्य आहेस. त्याची किती मदत होते?
कुशल हा एक उत्तम विनोदवीर तर आहेच, शिवाय तो उत्तम कलाकारही आहे. आमच्यात छान संवाद आहे. एकमेकांच्या चुका आढेवेढे न घेता सांगू शकतो. कुशल मला आवडतो कारण तो त्याचे विनोद आणि पंचेस स्वतः एन्जॉय करून सगळ्यांसमोर मांडतो आणि यातच खरी मजा आहे. जर आपण स्वतः आपल्या विनोदाबद्दल खात्री केली तरच आपण प्रेक्षकांना हसवू शकतो. याबाबत कुशल खरंच  पारंगत आहे. म्हणून मला तोच माझा मेंटॉर हवा होता आणि मला तो मिळाला.

स्टेज परफॉर्मन्सची भीती वाटते का?
स्टेज परफॉर्मन्सची मला प्रचंड भीती आहे. याआधी मी कधीच स्टेज परफॉर्मन्स नाही केलेला. तसंच, मी नाटकं किंवा एकांकिकाही कधी केल्या नसल्यानं स्टेज परफॉर्मन्सचा अनुभव नाही. डायलॉग्स जर आठवले नाही तर काय करायचं, एकमेकांना कसं सांभाळायचं याचा अनुभव नाही. आणि त्यात पहिल्यांदाच कॉमेडी करतेय त्यामुळे एक वेगळंच आव्हान आहे.

थुकरटवाडीतील तुझा आवडता विनोदवीर कोण आणि का?

माझे आवडते विनोदवीर म्हणजे श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके. त्याचं एकमेव कारण ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत हे नाही, तर त्यांना विनोदाची उत्तम जाण तर आहेच शिवाय ते प्रभावीपणे सादरही करतात. मी आधी म्हणाले त्याप्रमाणे कुशल त्याचे पंचेस एन्जॉय करून प्रेक्षकांसमोर मांडतो आणि श्रेया उत्तम मिमिक्री करते.  तिची निरीक्षणक्षमता अफाट आहे. देहबोलीतील गोष्टींचं निरीक्षण करू, एखाद्याची मिमिक्री करणं खूप अवघड आहे आणि श्रेया ते अगदी सहज आणि उत्तमरीत्या करते म्हणून ते माझे आवडते विनोदवीर आहेत.

‘शेलिब्रिटी पॅटर्न’मध्ये तुला टक्कर देणारा कलाकार कोण?
‘शेलिब्रिटी पॅटर्न’मध्ये मला असं वाटतं आशुतोष गोखले टक्कर देऊ शकतो कारण त्यानं स्टेज परफॉर्मन्स आधी केले आहेत. त्यामुळे तो खूप तरबेज आहे. तसंच गार्गीताईदेखील खूप टफ कॉम्पिटिशन देईल, कारण तिच्या रक्तातच अभिनय आहे. अद्वैत दादरकरसुद्धा मला तगडा प्रतिस्पर्धी वाटतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link