Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, August 23 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पाच लाख कोटींची ‘दहीहंडी’ कशी फोडणार?
‘भारत उद्दिष्ट गाठेल का?’ हा १७ ऑगस्टच्या अंकातील लेख वाचला. अर्थव्यवस्थेने ५ लाख कोटी डॉलर्सपर्यंत उंची गाठायची असेल तर सरकार, प्रशासन, उद्योजक आणि जनता अशा सर्वांनाच स्वतःमध्ये बरेच बदल करावे लागतील असे वाटते. उंची गाठण्याकरता न डुगडुगणारा भक्कम पाया असावा (आणि तसा दिसावाही) लागतो. त्यासाठी सरकारने फक्त वरिष्ठ पातळीवर भ्रष्टाचार कमी करून चालणार नाही, तर चहूकडे कायद्याचेच राज्य आहे, हा विश्वास घराबाहेर पडल्यावर वातावरणात जाणवेल असे पाहावे लागेल. आपल्या रस्त्यांवर पराकोटीची बेशिस्त वागणूक असणारे नागरिक अमेरिकेत गेले की शिस्तीत का वागतात याचा सखोल विचार करावा लागेल. हेल्मेटची सक्ती करू, पण रस्त्यावर जीवघेणे खड्डे चालतील आणि रस्त्याच्या उलट बाजूने SMS वाचत वाहन चालवले तरी चालेल, असा व्यवस्थेतील भोंगळपणा चालणार नाही. सर्वांना मनोमन पटणारी नियमावली व प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. उद्योजकांना ‘जुगाड’ करण्याची मानसिकता बदलावी लागेल. हितसंबंध जोपासण्यापेक्षा नियम पाळून व्यवसाय वाढवण्यात आपलाच दीर्घकालीन फायदा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. उत्पन्नावर कराची मागणी करण्याला ‘कर-दहशतवाद’ म्हणून चालणार नाही. विनोबांनी आणीबाणीचे वर्णन ‘अनुशासन पर्व’ असे केले होते. त्यानंतर विविध पुलांखालून इतके पाणी वाहून गेले आहे की आज शासनाने साध्यासुध्या नागरी नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली तर त्यालाच आणीबाणी वा असहिष्णुता म्हटले जाईल! ‘नियम इतरांनी पाळायचे असतात, मी नाही’ अशी मानसिकता जनतेलाही त्यागावी लागेल. शासन, प्रशासन, उद्योगपती, सामान्य जनता या साऱ्यांची असे ‘थर’ अत्यंत शिस्तीत लावण्याची तयारी असेल, तरच ही पाच लाख कोटींची दहीहंडी फोडता येईल आणि त्यातला ‘गोपाळकाला’ सर्वांना चाखायला मिळू शकेल! यातील एक थर डगमगला तरी सारेच जायबंदी होतील, हे निश्चित!
- प्रसाद दीक्षित, ठाणे
------------------------------------------------------

खड्डेच खड्डे चोहीकडे!
लागोपाठ सुट्ट्या आल्याने गावी ओझर मालवणला जाणे झाले आणि त्याचबरोबर गावी गेलो की न चुकता कांदळगाव येथील श्रीरामेश्वरमंदिराला दर्शन घेण्यासाठी आम्ही जातोच. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी सुरुवात केली तेव्हा स्वतः छत्रपती शिवाजीमहाराजांनी या मंदिरात श्रीरामेश्वराचे दर्शन घेतले होते आणि मग किल्ल्याचे काम पूर्ण झाल्यावर श्रीरामेश्वराच्या घुमटाचे काम केले होते. मंदिरासमोर लावलेल्या छोट्याशा वडाच्या झाडाचा आज वटवृक्ष झाला आहे. साक्षात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी इतके ऐतिहासिक महत्त्व त्यास आहे. या गावात कायम भाविकांची, पर्यटकांची गर्दी असते. मालवणला आलेले बहुतेक पर्यटक आंगणेवाडीआई, भराडीदेवी आणि कांदळगाव श्रीरामेश्वर व आजूबाजूच्या मंदिरांना भेट देतात. आम्हीही दिली परंतु इथल्या कांदळगावमंदिर ते कांदळगाव हडी या रस्त्यावर येईपर्यंत खड्ड्यांतून प्रवास करावा लागला.  त्या रस्त्याची अवस्था पाहून मनात प्रश्न आला की याला काय म्हणावे, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता? नुसते खड्डेच खड्डे म्हणता येईल. भाविकांना आणि पर्यटकांना, तसेच आजुबाजूच्या गावांतील शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास जाणून घेऊन प्रशासनाने लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करावी ही अपेक्षा आहे.
 - मयूर प्रकाश ढोलम, ओझर, मालवण
------------------------------------------------------

‘पक्षांतरबंदीसाठी’कडक कायद्याची गरज
‘पक्षांतराची साथ’ हा ३ ऑगस्टच्या अंकातील संपादकीय लेख वाचला. एखाद्या आजाराची साथ एवढ्या वेगाने फैलावत नाही; एवढी गती पक्षांतरवाद्यांनी घेतली होती. या पक्षांतराच्या कारणमीमांसेवर या लेखात चांगलाच प्रकाश टाकण्यात आला आहे. पक्षात येणे, पक्ष सोडणे ही आयाराम-गयारामांची रीत जुनीच आहे. या आयारामांना नवीन पक्षात मोठी पदे मिळतात, निवडणुकीसाठी तिकिटे मिळतात हे योग्य नाही. नवागताना २ ते ५ वर्षे  कार्यकर्ता म्हणूनच पक्षाचे काम द्यावे. असे घडत नसल्याने जुन्या व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्यांची क्रयशक्ती कमी होते. विश्वास ढळतो, वाद वाढतात आणि  पक्षाची प्रगती खुंटते. स्वपक्षाबद्दल निष्ठा नसलेले आयाराम दुसऱ्या पक्षात उडी मारायला तयार असल्याने तेही निष्क्रिय असतात. पर्यायाने पक्षाची, देशाची प्रगती कशी होणार? म्हणून ‘पक्षांतरबंदीसाठी’कडक कायदा करावा.
- सुप्रिया सावंत,  डोंबिवली (पूर्व)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link