Next
आणि ऑल दि बेस्टचा जन्म झाला...
अरुण घाडीगावकर
Friday, May 17 | 04:00 PM
15 0 0
Share this story

ज्या नाटकांची काटेकोर समीक्षा संभवत नाही, किंबहुना त्याची प्रचलित समीक्षानिकषांवर चिरफाड करण्याऐवजी त्याचा निव्वळ, निर्व्याज आस्वाद घ्यावा अशा नाटकांमध्ये ‘वाऱ्यावरची वरात’, ‘वस्त्रहरण’, ‘वऱ्हाड निघालं लंडनला’, ‘यदा कदाचित’... अशा नाटकांचा समावेश होतो. यातच देवेंद्र प्रेम लिखित- दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकही अंतर्भूत आहे.
‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येण्यापूर्वीपर्यंतची विनोदी, फार्सिकल प्रहसनं ही त्या त्या नाट्यप्रकाराच्या वैशिष्ट्यांनुसार होती. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकानं प्रथमच विनोदी नाटकाची सादरीकरणातील, मांडणीतील शैली बदलली. नाटक हे प्रसंगांतून, संवाद, व्यक्तिचित्रण यातून प्रवाही राहायला हवं. देवेंद्र प्रेम यांच्या लेखनातून आणि दिग्दर्शकीय कौशल्यातून ही पठडी मोडली गेली. ‘हे नाटक तिथल्या तिथंच रेंगाळत राहतं. त्याचं कथानक पुढे सरकतच नाही.’ आपल्याच नाटकाविषयी तटस्थपणे विचार कराना पेम म्हणाले होते, ‘बारा भाषांतून हे नाटक केलं गेलं, कधी स्टार कलावंत घेऊन, तर कधी अनोळखी कलावंतांना घेऊन. तरीही प्रत्येक भाषेत हे नाटक हाऊसफुल्ल कसं काय झालं? आजवरच्या रंगभूमीच्या इतिहासात नाटकात पात्रं येतात, संवाद बोलतात आणि नाटक पुढे जातं. हे पहिलंच असं नाटक आहे, की ज्यात पात्रं संवाद बोलतात... पण नाटक पुढे न जाता अडकत राहतं. मुका आंधळ्याशी बोलतो, ते त्याला कळत नाही. आंधळा बहिऱ्याशी बोलतो ते त्याला कळत नाही, नाटक तिथंच रेंगाळत राहतं...पुढे जातच नाही. त्याचीच ही कॉमेडी आहे.’ कॉमेडीमधील हा नवा फॉर्म नाट्यरसिकांना नवा वाटला, मनोरंजक आणि हवाहवासा वाटला. म्हणूनच त्यांनी त्याची चिकित्सा करण्याऐवजी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
असं हे अभूतपूर्व नाटक ‘ऑल दि बेस्ट’यानं मराठी रंगभूनीवर इतिहास रचला. हा इतिहास घडण्यापूर्वी त्याच्या जन्माचाही इतिहास तितकाच रंजक आहे. ‘ऑल दि बेस्ट’लाही पंचवीस वर्षं झाली. त्यावेळी देवेंद्र पेम हे ऐन तारुण्यात होते. तारुणसुलभ प्रेमभावनेनं त्यांनाही झपाटलं होतं. आपल्या प्रेयसीला फिरायला घेऊन जाण्यासाठी... आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यासाठी परवानगी मिळवायची असेल, तर तिच्या आईवडिलांना पटवायला हवं. त्यासाठी धाडस हवं. ते तर देवेंद्रपाशी मुबलक. त्या धाडसानंच त्यांनी आपल्या प्रेयसीच्या आईला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. ...पण... इथंच दैवानं त्यांच्यासमोर अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नपत्रिका ठेवली. त्यांच्या प्रेयसीची आई मुकी आणि बहिरी. मग संवाद होणार कसा? मुळातच आव्हान स्वीकारणारा स्वभाव आणि ‘प्रेमासाठी काय पण’करायची तयारी ठेवणारे देवेंद्र यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवायचं ठरवलं. त्याच्या यशस्वितेवरच त्यांची लग्नपत्रिका ठरायची होती.
प्रेयसीची आई घरात एकटीच असल्यानं देवेंद्र पेम यांना परवानगीसाठी त्यांच्याशीच बोलावं लागायचं. त्यांची भाषा चिन्हांकित...नुसते अॅ..उं...ह्यं... सारखे मुखातून येणारे स्वर. प्रेयसी मात्र आपल्या आईशी चिन्हांकित भाषेत संवाद साधायची. मग देवेंद्र यांनीही ही भाषा अवगत करायचं ठरवलं. त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ‘प्रेम’ माणसाची कशी ताकद ठरतं, त्याचं हे सुंदर उदाहरण. देवेंद्र पेम यांनी त्यांची चिन्हांकित भाषा पूर्णत: आत्मसात केली. इतकी की त्यांच्या मुलीपेक्षाही ते तिच्या आईशी अस्खलित संवाद साधू लागले. आपल्या मुलीची निवड अगदी योग्य आहे, याची खात्रीच या ‘संवादा’तून त्यांना पटली. देवेंद्र पेम यांनी ही प्रश्नपत्रिका यशस्वीरीत्या सोडवली.
या दरम्यानच्या काळात देवेंद्र पेम यांच्या डोक्यात एक मुका आणि एक बहिरा अशी दोन पात्रं ठाण मांडून बसली. ती दोन्ही पात्रं देवेंद्रना अस्वस्थ करीत होती. मग या डोक्यात ठाण मांडलेल्या पात्रांमध्ये अंध पात्राची जोड देऊन एकांकिका लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्यातही बहिरा जो बोलते, ते मुक्याला कळत नाही आणि मुक्याचं बहिऱ्याला. म्हणजे ‘संवादातून विसंवाद आणि विसंवादातून संवाद’ अशा ‘थीमलाइनवर’ मांडणी केली. मूळ ‘ऑल दि बेस्ट’मध्ये ‘मुलगी’ नव्हतीच. मुका, बहिरा, आंधळा आणि एक अर्भक अशी मुख्य पात्रं होती. त्या बाळाचीही एक वेगळी गोष्ट. त्या बाळाच्या आईची असहाय्यता असते म्हणून ते नवजात बालक या तिघांकडे सोपावते. मग त्या तिघांचंही बाळात गुंतणं, मग आईचं परतणं आणि त्यानंरचा त्यांचा आत्यंतिक भावनिक प्रसंग.. असं त्यांनी माडलं.
या एकांकिकेकडे त्रयस्थपणे बघताना त्यांनी विचार केला की हे तीन तरुण. त्यांच्या आयुष्यात जर मुलगी आली तर? त्यांना त्यात ‘प्रेमकहाणी’ दिसू लागली. ते वयच तसं होतं. या ‘प्रेमकहाणी’त त्यांना अधिक रस वाटू लागला. मग ही ‘लव्हस्टोरी’,‘ऑल दि बेस्ट’ या एकांकिकेतून सामोरी आली. तालमींमधून ती  सफाईदार,वेधक केली गेली आणि ‘इंडियन नॅशनल थिएटर’च्या एकांकिकास्पर्धेत ती सादर करण्यात आली.
हा प्रयोग युवा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. मात्र... परीक्षक युवाप्रेक्षकांच्या मताशी थोडं फटकूनच राहिले. आत्माराम भेंडे, सरिता जोशी यांसारखे दिग्गज परीक्षक होते. त्यांनी अंकुश चौधरीला अभिनयाचं प्रथम पारितोषिक दिलं. अभिनय द्वितीय, विकास कदम (बहिरा), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता भरत जाधव (मुका). सर्वोत्कृष्ट लेखन-दिग्दर्शन- देवेंद्र पेम... पण एकांकिकेला तिसरं स्थान.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून फक्त ‘ऑल दि बेस्ट’वर रकानेच्या रकाने भरून लिहिलं गेलं. निकाल वगळता ‘आयएनटी’स्पर्धेतील याच एकांकिकेचं कौतुक करण्यात आलं होतं. या निकालाची बरीच बोंबाबोंब झाली आणि ‘आयएनटी’च्या इतिहासात प्रथमच परीक्षकांना ‘कारणे दाखवा’ म्हणून चर्चेसाठी बोलावण्यात आलं. ‘ऑल दि बेस्ट’नं पदार्पणातच रचलेला इतिहास, पुढे मराठी व्यावसायिक रंगभूमीवरही रचला. त्या ‘इतिहासा’ला ‘रजत’रंग जडलाय.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link