Next
विश्वगुरू भारतासाठी...
डॉ. सागर देशपांडे
Friday, September 20 | 01:00 PM
15 0 0
Share this story

‘कोणतंही धोरण चांगलंच असतं, अंमलबजावणीचं काय;’ इथपासून ‘आता शिक्षणाचं भगवेकरण होणार’ इथपर्यंतच्या अनेक प्रतिक्रिया, आक्षेप, सूचना, टीका, प्रतिसाद यांसह भारताचं नवं ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ आता मसुद्याच्या पातळीवर तरी अंतिम टप्प्यात आलं आहे. देशभरातून गेल्या काही महिन्यांमध्ये सुमारे दोन लाख जणांनी या धोरणाबाबत दिलेला प्रतिसाद आणि त्यांपैकी सुमारे ७५% इतक्या लोकांनी दिलेला सकारात्मक अभिप्राय (संदर्भ : या धोरणसमितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांनी स्वतः एका चर्चासत्रात दिलेली माहिती) लक्षात घेता बऱ्याच वर्षांनी नवे शैक्षणिक धोरण आकाराला येऊ लागलं आहे असं निश्चित म्हणता येईल. शिक्षणक्षेत्रातील आणि त्याच्याशी संबंधित सर्वच घटकांनी या धोरणासाठी प्रस्तावित केलेल्या मुसद्यातील तरतुदी पाहिल्या तर लक्षात येईल, की हे धोरण गुणवत्तेच्या पातळीवर अत्यंत प्रामाणिकपणे अंमलात आणण्याचे प्रयत्न झाल्यास तो केवळ शिक्षणक्षेत्राच्याच नव्हे तर नवभारताच्या उभारणीसाठीही एक कृतिशील आराखडा बनेल.
“I have travelled across the length and breadth of INDIA and I have not seen one person a beggar, who is thief. Such a wealth I have seen in this country, such high moral values, people of such calibre, that we do not think we would even conquer this country, unless we break the very backbone of this nation which is her spiritual and cultural heritage and I propose her old and ancient educational system, her culture for if the INDIANS, think that all that is foreign and English is good than their own, they lose their self-esteem, their native and they will become what we want them, a truly dominated nation.”
ब्रिटनच्या संसदेत २ फेब्रुवारी १८३५ रोजी केलेल्या भाषणात लॉर्ड मेकॉले यांनी भारताच्या संदर्भात केलेलं निवेदन आपल्या देशाच्या पारतंत्र्यामागील कारणं स्पष्ट करण्यास पुरेसं आहे. इतकंच नाही तर ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीची सवय झाल्यामुळं असेल कदाचित, परंतु गोऱ्या सरकारसाठी काळे कारकून तयार करण्याची मानसिकता तयार करणाऱ्या शिक्षणात आपण भारतीय म्हणून जेवढे आणि जितके बदल करायला हवे होते, तेवढे दुर्दैवाने करू शकलो नाही हे अनेकांना कटू वाटलं तरी वास्तव आहे. याचा अर्थ गेल्या ७० वर्षांत फारसं काही सकारात्मक घडलंच नाही असंही म्हणता येणार नाही.
भारताच्या हजारो वर्षांच्या विश्वव्यापी, सहिष्णु, सर्वसमावेशक, कृतिशील परंपरेतील ज्या चांगल्या गोष्टी सिद्ध झाल्या होत्या, ज्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांमुळे भारत हे जगभरातील ज्ञानार्थी लोकांचं शिक्षणकेंद्र बनलं होतं, या साऱ्या पूर्वसंचिताचा फारसा विचार न करता स्वातंत्र्योत्तर काळात अंमलात आलेल्या धोरणांमुळे भारत हे ‘विश्वगुरू’ बनण्याच्या क्षमतेचं राष्ट्र असूनही तसं ते कधीच जगाच्या नकाशावर येऊ शकलं नाही. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर भारतातील शैक्षणिक धोरणं आणि तत्पूर्वीपासून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, गोखले, चिपळूणकर, न्या. रानडे, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. जे.पी. नाईक अशा दिग्गजांनी मांडलेले आणि शिक्षणातून समाजपरिवर्तनासंबंधीचे कृतीत आणलेले विचार या साऱ्याचं प्रतिबिंब आपल्या देशाच्या शिक्षणविषयक धोरणांमध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये किती दिसून येतं याचा गंभीरपणे विचार करायला हवा. त्या पार्श्वभूमीवर कोणताही पूर्वग्रह न ठेवता या नव्या शैक्षणिक धोरणाच्या मुसद्याचा विचार करायला हवा. थोडक्यात, मोदीभक्त आणि मोदीविरोधकांनी आपापले चष्मे थोडे बाजूला ठेवून भविष्यकाळातील भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या दूरदृष्टीनं त्याकडे पाहायला हवं, असं वाटतं.
समाजमाध्यमांमधून काही ठरावीक दृष्टिकोन बाळगून झालेल्या लिखाणातून आणि ठिकठिकाणच्या परिषदांमधून यासंबंधी जे वाचायला/ऐकायला मिळतं त्या पार्श्वभूमीवर तर संपूर्ण देशाच्या पुढच्या २५ वर्षांच्या वाटचालीचं म्हणजेच एक प्रकारे आपल्या देशाच्या भविष्याचंच हे धोरण आहे, इतक्या गांभीर्यानं त्याकडे पाहायला हवं. परंतु शिक्षणक्षेत्राशी संबंधित, विशेषतः सर्व पातळ्यांवरच्या शिक्षकांशी चर्चा केल्यावर प्रामुख्यानं जाणवतं, की त्यातल्या बहुसंख्य मंडळींनी हा मसुदा सहजपणे उपलब्ध असूनही तो नजरेखाली घालण्याचेसुद्धा कष्ट घेतलेले नाहीत.
आपल्या देशात पूर्वप्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणासंबंधीची एक सलग अशी साखळी तयार होणं गरजेचं होतं. दुर्दैवानं तशी ती तयार झाली नाही. एखाद्या रस्त्याचा विकास निरनिराळ्या सरकारी यंत्रणांच्या निधीतून, वेगवेगळ्या अंतराच्या टप्प्यावर, वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून, वेगवेगळ्या वेळी, आपापल्या गुणवत्तेनुसार, वेगवेगळ्या मूल्यमापन करणाऱ्या व्यक्तींच्या देखरेखीखाली व्हावा तसं आपल्या धोरणांचं बऱ्याच वेळा होत जातं. म्हणजे रस्ता तर झालाय, खर्च तर झालेलाच आहे, तरीही तो सलगपणे एकाच चांगल्या गुणवत्तेसह तयार झालेला दिसत नाही. आपल्या शिक्षणविषयक धोरणाचंही तसंच झालं आहे.
या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणा’चा मसुदा आता मंजुरीच्या टप्प्यावर आला आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर जनतेच्या विचारार्थ चर्चेसाठी, सूचनांसाठी ठेवण्यात आला. आता हिवाळी अधिवेशनात हे विधेयक येऊन त्याची अंमलबजावणी सुरू होईल अशी आशा आहे. त्यामुळेच या धोरणाचा सर्वांनी अनेक अंगांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शिक्षणातील बदल हे दूरगामी परिणाम करणारे असतात. ‘वर्गखोल्यांमधून उद्याचे भविष्य घडत आहे’ हे फक्त सुविचार म्हणून लिहिण्याचं वाक्य नाही, तर त्या क्षेत्राशी संबंधित प्रत्येकानं गंभीरपणे विचार करण्याचं वाक्य आहे.
शिक्षणाची वाट ही बिकट आहे. विविधतेनं नटलेल्या, विविध भाषांची, बोलींची, संस्कृतींची परंपरांची समृद्धी मिरवणाऱ्या आपल्या देशात हा वारसा पुढील पिढीला संक्रमित करणं, तो टिकवणं, वाढवणं, त्यामध्ये भर घालणं आणि तंत्रज्ञानामुळे सातत्यानं उलथापालथ होणाऱ्या आजच्या जगात, एकविसाव्या शतकात वावरताना स्पर्धेला सक्षमपणे तोंड देणारी युवापिढी घडवणं असं दुहेरी आव्हान शिक्षणक्षेत्रासमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी कार्यक्षम शिक्षकवर्ग, शिक्षणसंस्था, प्रशासन आणि सरकार सर्व एकाच ध्येयानं प्रेरित होऊन एका दिशेनं, एकदिलानं काम करण्यासाठी ध्येयं-धोरणं आखण्याचं काम या धोरणातून होणार आहे.
धोरण ठरवणं, ते अधिक उत्तम प्रकारे ठरवणं आणि त्याची तितक्याच प्रभावीपणे, गुणवत्तेच्या मार्गानं अंमलबजावणी करणं या दोन्ही बाजू फार महत्त्वाच्या असतात. मग ते धोरण कोणत्याही क्षेत्रातलं आणि विषयातलं असो. धोरणाच्या वैचारिक, भक्कम मांडणीबरोबरच त्याची अपेक्षित सर्व स्तरांवरील परिणामकारक अंमलबजावणीच अखेर त्या धोरणाचं यश-अपयश ठरवत असते.
या लेखमालेच्या पुढील भागांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत या नव्या मसुद्यातील ठळक तरतुदी, त्यासंबंधीचे काही आक्षेप-टीका आणि भविष्यकाळासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बाबी यांचा परामर्ष घेणार आहोत.(क्रमशः)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link