Next
स्वकष्टातून अन्नसंस्कार
अनुजा हर्डीकर
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

“आज आमच्या शाळेत डॉक्टर येणार आहेत. सगळ्यांचं चेक-अप होणार. मग आमचे वजन, उंची, दात, नख सगळं चेक करणार.”
“हो तर. आणि दोन दिवसांनी आम्हा पॅरेन्ट्सना मीटिंगला बोलावणर.” असं म्हणून मायलेक दोघेही एकमेकांकडे बघून हसले. कारण डॉक्टर काय सांगणार, रोजच्या रोज व्यायाम करा, मुलांना फिट राहू द्या, त्यांच्या गोड खाण्यावर कंट्रोल ठेवा, हे सगळे सल्ले दोघांनाही माहीत होते. दरवर्षीचेच झालेले ते!
एकीकडे स्थूलपणाकडे कल वाढणारी मुले. त्यांचे प्रश्न वेगळे. डोळ्यांसमोर टीव्ही किंवा मोबाइल आणि हातात एखादे वेफर्सचे पाकीट,चॉकलेट्स, कोणत्यातरी प्रकारचे जंक फूड. आई जिल्हा परिषदेसारख्या शाळांमधल्या मुलांसोबत काम करणारी असल्यामुळे तिच्या पाहण्यात येत असत असंख्य कुपोषित मुले. वयाच्या तुलनेने फार लहान चणीची, डोळ्यांत तेज नसलेली. तरीही त्यांच्याकडे क्वचितप्रसंगी आईला वेळ नाही म्हणून वेफर्सचे पाकीट दिसायचे किंवा चहासोबत पोट भरायला खारी.
थोडक्यात काय, आर्थिक परिस्थिती चांगली असो वा टंचाईची, फास्ट फूड किंवा जंकच्या फूडच्या विळख्यातून कोणी सुटलेले नाही! डॉक्टरांनी मुलांना समजावले तरी प्रश्न सुटायचा कसा?
जरा विचार केल्यावर जाणवते की अनेकदा मुलांना जंक फूडच्या सवयी लावण्यात पालकच कारणीभूत असतात. “तू एकदम शांत बसून राहा, मला काम करताना अजिबात त्रास देऊ नकोस, मी तुला नंतर चिप्स आणून देईन.” “आज छान अभ्यास केलास तर रात्री पिझ्झा पार्टी.”
“डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला इंजेक्शन घ्यायचे आहे, तिथे त्रास दिला नाहीस तर चायनीज देईन!”
...छोट्याशा चॉकलेटपासून मोठ्या पार्टीपर्यंत आपण खायची-प्यायची किती प्रलोभने मुलांना दाखवत असतो.
“मी ही भाजी खाणार नाही म्हणजे नाहीच! मला सॉस किंवा जाम दिल्याशिवाय मी नाही जेवणार!” ’
“ह्या पोळीला जास्त डाग दिसतात, मला नको.”
“ह्या भाजीत हे केवढी पानं घालून ठेवली आहेस, मला अशी नाही आवडत.” अशी वाक्ये घरोघरी मुलांच्या तोंडी ऐकू येतात. मग मुलांच्या पोटात भाज्या जायला हव्यात म्हणून तऱ्हेतऱ्हेच्या रेसिपी कराव्या लागतात. आईच्या मनात सतत विचारचक्र सुरूच असते, मुलांना पौष्टिक काय काय आणि कसे द्यावे, याचे.
एका आईने एक क्लृप्ती शोधली. तिने आजूबाजूच्या मुलामुलांची स्पर्धा घ्यायची ठरवली. एका रविवारी सकाळी मुलांची धावणे, उंच उडी, अडथळा शर्यत अशा स्पर्धा घेतल्या. शारीरिक श्रम होतील असे सारे खेळ! मुले उत्साहाने सहभागी झाली, खेळून खेळून मुले खूप थकून गेली. एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले. भुकेमुळे कोणालाच काही सुचत नव्हते. सगळेजण भूक लागली म्हणाले तेव्हा त्यांना काही पदार्थांची नावे सांगितली गेली– मॅगी, वेफर्स, ब्रेड रोल की पोहे, व्हेजिटेबल रोल्स? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चक्क व्हेजिटेबल रोल आणि पोह्यांचा बहुमतांनी विजय झाला.
म्हणजे आपल्याला ताकद मिळवण्यासाठी, मुलांच्या भाषेत सांगायचे तर जास्त एनर्जीसाठी, पौष्टिक अन्नाची गरज असते, हे मुलांनीच सिद्ध केले होते. ही भावना कायमस्वरूपी टिकवायची कशी? तात्पुरते तर पटले, पण ताटातले जेवण आवडले नाही तरी संपवयाचे कसे, हे सांगणेही गरजेचे होते. म्हणून मुलांनी कोणतातरी पदार्थ स्वतः करायचा, असे ठरले. सुरुवातीला मुलांनी थोडी कटकट केली म्हणून त्यांचा आवडता पिझ्झा आणि पास्ता करण्यापासून सुरुवात झाली. हळूहळू आईने त्यांना न आवडणारे पदार्थ करायला सांगितले. सुटीच्या दिवशी आईला मदत करण्यापासून सुरुवात झाली. एखादा पदार्थ बनवताना किती प्लॅनिंग करावे लागते,किती कष्ट करावे लागतात, या सगळ्याचा विचार सुरू झाला. दर रविवारचा दिवस मुलांनी जेवण करण्याचा ठरला. जेवणात काय बनवायचे आणि काय नाही हे सगळे मिळून ठरवत होते. त्यानुसार आखणी व्हायची आणि आई-मुले मिळून जेवण बनवायला सुरुवात झाली. मुलांनी केलेला एखादा पदार्थ आईबाबांनी, भावंडानी खाल्ला नाही की मुलांना वाईट वाटायचे. त्यामुळे सगळे पदार्थ सगळ्यांनी खायचे असे ठरले. जेवणाच्या सवयीत हळूहळू बदल होत होते.
“बस्स... दो मिनिट...” अशी जाहिरात असली तरी इतके काहीच सोपे नसते हे मुलांना पक्के कळले! कोणताही पदार्थ करण्यासाठी किती तयारी लागते, वेळ व कष्ट द्यावे लागतात, हे समजले. ताटातील पदार्थांचे मोल कळले. त्यांचे पोषणमूल्य चांगले असते, उगाच अरबट काहीतरी पोटात ढकलून पोट भरणे योग्य नाही, हेही कळत गेले. स्वकष्टातून अन्नसंस्कार रुजला!
जंक फूडच्या विळख्यातून मुलांना सोडवायचे तर अशा क्लृप्त्या, असे प्रयत्न करण्याला पर्याय नाही!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link