Next
चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती…
अनिल गोविलकर
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story

मराठी भावगीत संगीतात भक्तिसंगीताला बरेच मोठे स्थान आहे. पारंपरिक स्वररचनांपासून आधुनिक स्वररचनापर्यंत भक्तिसंगीत वैपुल्याने फुललेले आहे. भक्तिसंगीत हे कर्नाटकात भरभराटीस आले, पुढे तो मार्ग महाराष्ट्रात फैलावला. ज्ञानेश्वरांपासून जो भागवत आणि वारकरी संप्रदाय सुरू झाला तो आजतागायत सुरूच आहे. आजच्या गाण्याचे शब्दकार संत नामदेव हे याच परंपरेतील एक ठळक नाव.
संगीतकार कमलाकर भागवत यांची कारकीर्द प्रामुख्याने ‘अॅरेंजर’ म्हणून गाजली, परंतु अशा रचनांमधून त्यांनी संगीतकार म्हणून आपले वेगळेपण सिद्ध केले. सुधीर फडके, यशवंत देव यांसारख्या संगीतकारांच्या रचना सजवण्याचे काम त्यांनी प्रभाकर जोग यांच्यासमवेत बरीच वर्षे केले. या गाण्याची चाल तशी सहज, सोपी आणि गुणगुणता येईल अशीच आहे. हाताशी सुमन कल्याणपूर यांच्यासारखा सुरेल गळा असल्याने, चालीत काही अवघड हरकती घेतल्या आहेत. रचनेचा दुसरा अंतरा हा मुखड्यापासून वेगळा बांधला आहे तसेच चौथा / शेवटचा अंतरा वरच्या सुरांत घेतलेला आहे. खरे तर मुखडा अगदी साधा आहे परंतु अतिशय गोड आहे. लगेच चालीचे वळण ध्यानात येते. वाद्यवृंद फारच मर्यादित असतो, जसे इथे बासरीचा वापर संपूर्ण रचनेत केलेला आहे. तसेच, मुखडा आणि अंतरे गायले जात असताना पार्श्वभागी मंद नादाच्या घंटेचा उपयोग श्रवणीय आहे.
गायिका म्हणून सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीतात उल्लेखनीय अशी कामगिरी निश्चितच केलेली आहे. खरे तर हे नाव चित्रपटबाह्य गीतांसाठीच अधिक लोकप्रिय झाले. गीताची चाल अचूक ओळखून त्यांनी इथे गायन केले आहे. चालीची जातकुळी सोपी आहे, भक्तिसंगीत आहे, तेव्हा शब्दोच्चार त्याच धर्तीवर केले आहेत. ‘वियोगे’ शब्द गाताना त्यातील व्याकुळता सुरेख दर्शवली आहे. तसेच, शेवटचा अंतरा जेव्हा वरच्या सुरांत जातो तिथे स्वर निमुळता करत, एक सुंदर टोक गाठले आहे. ही शैली लताबाईंच्या गायकीच्या जवळपास जाणारी. चालीत आर्तता आहे पण हताशता नाही, विसविशीतपणा नाही. गायन संथपणे परंतु आश्वासक पद्धतीने पुढे चालत असते. ही कामगिरी अजिबात सोपी नाही.
निरांजनाच्या शांत निरंतर तेवत राहणाऱ्या ज्योतीसारखे अप्रतिम सौंदर्य हेच या गाण्याचे खरे वैशिष्ट्य म्हणता येईल.

चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती
झालें मजप्रती तैसें आता

चुकलिया माय बाळकें रडती
झालें मजप्रती तैसें आता

वत्स न देखता गाई हुंबरती
झालें मजप्रती तैसें आता

जीवनावेगळे मत्स्य तळमळती
झालें मजप्रती तैसें आता

नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्ती
करीतसे खंती फार तुझी


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link