Next
गेले द्यायचे राहूनी…
ऑस्कर डायरी- श्वेता प्रधान
Friday, February 08 | 04:15 AM
15 0 0
Share this story

गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर स्वीकारल्यावर फ्रँसेस मॅकडॉरमन्टनं 'इन्क्लुजन रायडर' या दोन शब्दांत हॉलिवूडला सणसणीत चिमटा काढला होता. बड्या स्टार्सनी निर्मितीसंस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या भपकेबाज सोयीसुविधा घेण्याऐवजी स्त्री-कलाकार आणि तंत्रज्ञांची संख्या वाढवण्यासाठी, समान हक्क मिळण्यासाठी शब्द टाकावा, असा 'इन्क्लूजन रायडर'चा उद्देश होता. फ्रँसेसला अशा काही टाळ्या पडल्या होत्या, की त्याचे पडसाद २०१९च्या ऑस्करवर नक्कीच उमटतील, असं वाटलं होतं. परंतु नामांकनं जाहीर झाल्यावर दिग्दर्शन, छायाचित्रण किंवा निर्माती नाही तर एडिटर म्हणून स्त्रियांचं ठळक अस्तित्व न दिसल्याबद्दल अमेरिकेनं नापसंती व्यक्त केली. १९२९ पासून चालत आलेल्या ऑस्करच्या परंपरेत नामांकनात दिसलेल्या दिग्दर्शिका म्हणजे लिना वेर्टमूलर (सेव्हन ब्युटीज् - १९७६), जेन कॅम्पिअन (द पियानो - १९९३), सोफिया कोप्पोला (लॉस्ट इन ट्रान्स्लेशन - २००३), ग्रेटा गेर्विग (लेडी बर्ड - २०१७). त्यांपैकी 'हर्ट लॉकर'च्या (२००९)दिग्दर्शनासाठी ट्रॉफी जिंकलेली कॅथरिन बिगलो ही एकमेव महिला. म्हणजे ऑस्करच्या मते, ९० वर्षांत फक्त पाचच महिला दिग्दर्शकांची कामगिरी उल्लेखनीय होती तर! याही वर्षी ऑस्करला मॅरिएल हेलर, लीन रॅमसी, डेजिरी आखवन, कारन कुसामा, क्लोई झाओ या दिग्दर्शिका दिसल्याच नाहीत.
स्कॉटलंडच्या राणीच्या जीवनावर आधारित 'मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स'ला वेशभूषा, मेकअपची नामांकनं असली, तरी दिग्दर्शिका जोसी रॉर्क त्यापासून वंचित आहे. मॅरिएल हेलरचंही तसंच. तिच्याकडे 'कॅन यू एव्हर फर्गिव्ह मी'साठी ऑस्करवगळता इतर पुरस्कार आहेत. क्लोई झाओच्या 'द रायडर'ची गतही काहीशी अशीच. ऑस्करमध्ये समावेश नसला, तरी या सिनेमाची स्तुती करताना टीकाकार आजही थकत नाहीत.
लीन रॅमसीचा सायको-थ्रिलर 'यू वेअर नेव्हर रिअली हिअर', कारन कुसामाचा 'डिस्ट्रॉयर' हा क्राइम ड्रामा, डेजिरी आखवनचा 'द मिसएज्युकेशन ऑफ कॅमेरून पोस्ट', डेब्रा गार्निकचा 'लिव्ह नो ट्रेस' यांचीही ऑस्करनं दखल घेतली नाही.

यांचीही अनुपस्थिती

गुन्हेगार नवऱ्यांच्या हत्येनंतर पैशांची परतफेड करण्याकरता एकत्र आलेल्या त्यांच्या बायकांचा गेम प्लॅन ('विडोज्'), टेली-मार्केटिंग करणाऱ्या आफ्रिकन-अमेरिकन तरुणाची डार्क-कॉमेडी ('सॉरी टू बॉदर यू'), दिवंगत युद्ध-पत्रकार मरी कोलविनच्या विलक्षण जीवनातील घटना ('अ प्रायव्हेट वॉर'), विनाशानंतर जगण्याचा संघर्ष करणाऱ्या कुटुंबाची कहाणी दाखवणारा काल्पनिक विज्ञानपट ('अ क्वाएट प्लेस') इत्यादी कलाकृती नामांकनात सामील नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.   
'क्रेझी रिच एशियन्स' या विनोदी ढंगाच्या प्रेमकथेनं लोकांचं मनोरंजन केलं, टीकाकारांना हसवलं आणि बॉक्स ऑफिसवर २०० मिलियन डॉलर्सहून अधिक नफा कमावला. मात्र इतक्या बहुचर्चित सिनेमाकडे ऑस्करचं लक्ष गेलं नाहीच.  
सुप्रसिद्ध कलाकार फ्रेड रॉजर्स यांच्यावर आधारित 'वोन्ट यू बी माय नेबर' ही डॉक्युमेंटरी २२ मिलियन डॉलर्सची कमाई (चरित्रात्मक डॉक्युमेंटरीनं इतका नफा मिळवून देण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असेल) आणि प्रशंसा कमावूनही ऑस्करची मोहोर उमटवू शकली नाही.  

मंजिलें अभी दूर हैं
'मॅडलिन्स मॅडलिन'मधली मध्यवर्ती भूमिका करणारी हेलेना हावर्ड, 'ब्लॅक्लॅन्समॅन'मधल्या धमाल डिटेक्टिव्ह रॉन स्टॉलवर्टची भूमिका जगलेला जॉन वॉशिंग्टन, 'एट्थ ग्रेड'या कॉमेडी सिनेमातल्या सहजसुंदर अभिनयासाठी प्रशंसेला पात्र ठरलेली एल्सी फिशर यांना प्रेक्षकांची मनं जिंकूनही ऑस्कर गाठता आलं नाही. एमिली ब्लण्टचा 'अ क्वाएट प्लेस'मधला गंभीर अभिनय किंवा 'मेरी पॉपिन्स रिटर्न्स'ची हलकीफुलकी भूमिका दोन्हीकडे ऑस्करनं काणाडोळा केला.   
एका धर्मोपदेशकाच्या मनातली घालमेल, अस्वस्थ करणारं वैचारिक मंथन 'फस्ट रिफॉर्म्ड'मध्ये इथन हॉकनं जिवंत केलं. समीक्षकांपासून चित्रपट महोत्सवांपर्यंत सर्वत्र त्याची विशेष दखल घेऊनही त्याला ऑस्करचा पल्ला गाठता आला नाही. 'यू वेअर नेव्हर रिअली हिअर'मधल्या भूमिकेसाठी 'कान्स'नं सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरवलेला वाकीन फिनिक्स ऑस्कर नामांकनात दिसला नाही.

हे सगळं कोण ठरवतं?

कधी जुन्या मतांच्या सदस्यांचा भरणा अधिक असल्याबद्दल, कधी कृष्णवर्णीयांना डावलून गोऱ्यांची संख्या वाढल्याबद्दल, तर कधी स्त्री-सभासदांची गणती कमी असल्याबद्दल ऑस्करच्या निवड-समितीवर टीकेचा भडीमार झालाय. याच कारणास्तव २०१६मध्ये विल स्मिथ आणि त्याची पत्नी जॅदा पिंकेट स्मिथ यांनी पुरस्कारसोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर २०२० सालापर्यंत स्त्रिया आणि गोरेतर सदस्यांची संख्या वाढवायचं वचन अकॅडमी ला द्यावं लागलं.  
'द अॅकॅडमी'चे सात हजारांहून अधिक सदस्य ऑस्कर नामांकनासाठी मतदान करतात. या सदस्यांची विषयानुसार स्वतंत्र श्रेणी असते, म्हणजे अभिनेते अभिनयाचं नामांकन ठरवतात, दिग्दर्शकांकडे दिग्दर्शनाच्या नामांकनाची जबाबदारी असते, वगैरे. एका विभागातले सदस्य दुसऱ्या विभागासाठी मतदान करू शकत नाहीत. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मात्र सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार असतो.
प्रत्येकानं किमान पाच निवडी सांगणं, पाचही निवडींचा ताळमेळ लावणं, त्यांची सरासरी काढून किमान टक्केवारीचा आकडा ठरवणं अशी क्लिष्ट प्रक्रिया पार पडली, की नामांकनं जाहीर होतात.

नामांकनानंतर समितीचे सर्व सदस्य विजेत्यांसाठी मतदान करू शकतात. १९३५ सालापासून ही सगळी जबाबदारी 'प्राइज वॉटर हाऊस कूपर्स' यांच्याकडे आहे. या कंपनीच्या केवळ दोन भागीदारांना पाकिटात सीलबंद झालेला अंतिम निकाल माहीत असतो. यंदा फेब्रुवारी १२ ते १९ या कालावधीत ऑनलाइन मतदान झालं की २५ फेब्रुवारीला ऑस्कर विजेत्यांची नावं जगजाहीर होतील.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link