Next
पुण्यात खेलो इंडियाचा क्रीडामहोत्सव
आशिष पेंडसे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyपुण्यात मोठ्या धुमधडाक्यात ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेला सुरुवात झाली. थंडीतल्या या क्रीडापूर्ण वातावरणामुळे अवघी पुण्यनगरी ढवळून निघाली आहे. २० जानेवारीपर्यत चालणारी ही स्पर्धा पुण्यातील श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी, महाळुंगे-बालेवाडी येथे सुरू आहे.

क्रीडाविश्वातील २०हून अधिक घटकांना एकत्रित करणारा खेलो इंडिया हा अभिनव उपक्रम आहे. त्यामध्ये खेळ आणि खेळाडू यांच्यासमवेत शिक्षण, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, युवककल्याण, स्टार्टअप, महिला सबलीकरण, मनोरंजन, नवीन तंत्रज्ञान अशा अनेकविध विषयांचा आविष्कार प्रदर्शनच्या माध्यमातून घडत आहे. तसेच, क्रीडाप्रेमी आणि क्रीडाविश्वातील या घटकांच्या संवादसत्रांच्या माध्यमातून ही क्रीडासंस्कृती दूरवर रुजवण्याचा मानस आहे. क्रीडाशिक्षण, क्रीडावैद्यकशास्त्र या संदर्भातील कार्यशाळांच्या माध्यमातून प्रशिक्षकांचे ज्ञानवर्धनदेखील केले जाते. प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, नवीन प्रशिक्षक घडवण्यासाठीचे मार्गदर्शन, क्रीडाविषयक शिक्षणावर आधारित स्वतंत्र दालन, क्रीडाविश्वात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा गौरव, खेळाडूंच्या मार्गदर्शकांबरोबरच पालकांचाही गौरव, क्रीडाविश्वात भरीव कामगिरी करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान, स्पोर्ट्स फॅशन शो, अशा बहुआयामी आविष्कारांचा समावेश या क्रीडा प्रदर्शनात आहे.

यापूर्वी, २०१६ मध्ये अशाच धर्तीवरील उपक्रम झाला होता. यंदा खेलो इंडिया हा प्रस्तावित क्रीडामहोत्सव नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडतर्फे (एनवायसीएसएल) आयोजित करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात या सोसायटीचे प्रतिनिधी युवाविकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच, तीन लाखांहून अधिक सदस्यांच्या माध्यमातून देशभरातील युवावर्गाशी या सोसायटीच्या माध्यमातून सक्रिय संवाद साधला जातो. सोसायटीच्या या पूर्वीच्या ‘गेल रफ्तार’, ‘खेलेगी तो खिलेगी’ आदींच्या माध्यमातून क्रीडाप्रसाराचा संदेश सुमारे २५ लाख युवकांपर्यंत पोचला आहे. आता महाराष्ट्रातील ‘खेलो इंडिया’च्या निमित्ताने भरवण्यात येत असलेल्या या क्रीडामहोत्सवाद्वारे खेळांचा प्रचार-प्रसार देशभरातील सुमारे एक कोटी युवकांपर्यंत पोचवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

खेलो इंडियाची उद्दिष्टे
 • क्रीडासंस्कृतीचा प्रचार-प्रसार
 • क्रीडाप्रदर्शनाच्या माध्यमातून खेळांबाबत जनजागृती करणारी सुमारे ५० हून अधिक दालने.
 • क्रीडाविश्वाशी संबंधित २० हून अधिक घटक एकाच सर्वसमावेशक व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आणणे
 • क्रीडाकौशल्य
 • प्रशिक्षणासाठी कार्यशाळा
 • आहार, तंदुरुस्ती, दुखापतींपासून संरक्षण, डोपिंगविरोधी मोहीम आदींबाबत जनजागृतीपर सत्रांचे आयोजन
 • प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व त्यांच्यासाठी कार्यशाळा
 • स्किल इंडिया मोहिमेच्या धर्तीवर क्रीडाविश्वातील कौशल्यविकासाच्या उपक्रमांना व्यासपीठ
 • दिग्गज खेळाडूंकडून प्रेरणा घेण्यासाठी युवा खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी विशेष संवादसत्र
 • क्रीडाविषयक संशोधनाची माहिती देणारे स्वतंत्र दालन व सादरीकरण
 • महिला सबलीकरणासाठी खेळांच्या माध्यमातून मुलींच्या विकासासाठी उपक्रम
 • क्रीडाकौशल्यांच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा
 • क्रीडाविश्वात भरीव योगदान देत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना व्यासपीठ
 • स्पोर्ट्स स्टार्टअपच्या माध्यमातून देशातील क्रीडाविश्वातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा आविष्कार
 • स्पोर्ट्स फॅशन शो यांसारख्या नावीन्यपूर्ण क्रीडा उपक्रमांच्या सादरीकरणाचे व्यासपीठ
 • खेळाडूंच्या मार्गदर्शकांबरोबरच पालकांचाही गौरव
 • मल्लखांब, कलरीपायत्तु यांच्यासारख्या पारंपरिक क्रीडाप्रकारांच्या प्रसारासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन
 • झुंबा आदी आधुनिक नृत्य आणि व्यायामप्रकारांची विशेष सत्रे आणि त्याच्या प्रशिक्षणाच्या कार्यशाळा
 • भारताच्या पुढाकाराने जगभर आता योगाची महती पोचली आहे. या महोत्सवात योगाभ्यासाकरता दररोज सकाळी विशेष सत्र.
 • महाराष्ट्राने क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती करून देणारे विशेष दालन
    फिक्कीच्या अहवालानुसार भारतीय क्रीडाविश्वात २०२५ सालापर्यंत तब्बल ५५ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्याकडेच लक्ष ठेवून क्रीडाशिक्षणाची माहिती देणारे स्वतंत्र दालन आणि त्याविषयीच्या कार्यशाळा. खेलो इंडियामध्ये १७ ते २१ वयोगटामधील क्रीडापटू सहभागी होतात. त्यामुळेच त्यांच्यासाठी करिअर आणि स्किल्स इन स्पोर्ट्स या विषयावरील ज्ञान-माहिती प्राप्त होणे अतिशय आवश्यक ठरते आहे. म्हणूनच, हे दालन आणि या विषयीच्या कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरतील.

खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील युवा प्रतिभावंत खेळाडू मैदानावर त्यांच्या क्रीडानैपुण्याची प्रचीती देतीलच, शिवाय क्रीडाप्रेमींना विविध खेळांचा अनुभव देणारा विशेष विभाग- स्पोर्ट्स एक्स्पिरियन्स झोन आहे. यात तिरंदाजी, नेमबाजीपासून वॉल क्लाइंबिंग थरारापर्यंतचे विविध क्रीडानुभव घेण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळेल. तसेच, सुमो रेसलर्ससमवेत दोन हात करण्याची अनोखी संधी या निमित्ताने क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.
याच ठिकाणी खेळांचे नियम, तो कशा पद्धतीने खेळला जातो, याची तज्ज्ञ व प्रशिक्षकांच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. क्रीडासाक्षरता वाढीस लागण्यासाठीचा हा पहिलाच अनोखा उपक्रम आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील युवा क्रीडापटू आपल्या क्रीडानैपुण्याचा आविष्कार घडवण्याची संधी मिळाली आहे. त्याच्याच जोडीला इंडिया का खेलोत्सवच्या माध्यमातून क्रीडासंस्कृती व क्रीडासाक्षरतेच्या राष्ट्रीय चळवळीची मुहूर्तमेढ पुण्यातून उभारली जाईल, हेही नक्की!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link