Next
हैदराबाद हंटर्सची बाजी
नितीन मुजुमदार
Friday, January 04 | 03:00 PM
15 0 0
Share this story

प्रीमिअर बॅडमिंटन लीगची रंगत आता वाढू लागली आहे. पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात स्पर्धेच्या तिसऱ्या लेगचे सामने नुकतेच संपले. त्यात पी. व्ही. सिंधूच्या हैदराबाद हंटर्स संघाने १७ गुणांसह ९ संघांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे अहमदाबादला सुरू झालेल्या पीबीएलच्या चौथ्या लेगच्या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रीमिअर बॅडमिंटन लीगचा हा चौथा सीझन आहे. मुंबई रॉकेट्स संघाकडे एकही मोठे नाव नाही. अँडर्स अॅटनसेन (जागतिक सिंगल्स रँकिंग १७) व समीर वर्मा (जागतिक सिंगल्स रँकिंग २३) हे या संघातील नामांकित सिंगल्सचे बॅडमिंटनपटू. या संघाने ११ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला आहे. अहमदाबाद स्मॅश मास्टर्स, अवध वॉरिअर्स, पुणे सेवन एसेस, नॉर्थ ईस्टर्न वॉरिअर्स, बंगळुरू रॅपटर्स व चेन्नई स्मॅशर्स हे सारे संघ एक-एक गुणांच्या फरकाने अनुक्रमे तीन ते आठ क्रमांकावर आहेत. दिल्ली डॅशर्स संघ केवळ एक गुणासह तळाला आहे. जागतिक रँकिंग १५ असलेल्या एच. एस. प्रणॉयचा हा संघ. बॅडमिंटन लीगच्या प्रारंभीच्या सीझनमध्ये या संघाने अजिंक्यपद मिळवले होते. मात्र या सीझनमध्ये तीन लढतीत १५ सामन्यांमध्ये ११ सामने दिल्ली डॅशर्सने गमावले आहेत.
आयपीएल या क्रिकेटच्या लीगमध्ये आणि पीबीएल या बॅडमिंटनच्या लीगमध्ये एक मुख्य आणि महत्त्वाचा फरक म्हणजे बॅडमिंटन लीगसाठी खेळाच्या मुख्य गाभ्यामध्ये मोठे बदल करावे लागले नाहीत. १५ गुणांचे गेम व टायब्रेकर नसणे हे दोनच तुलनात्मक दृष्ट्या मोठे बदल लीगसाठी खेळाचे पॅकेजिंग करताना करावे लागले. टायब्रेकर नसल्यामुळे या स्पर्धेत अनेक गेम १५/१४ अशा गुणसंख्येवर संपलेले दिसतात. मुळात बॅडमिंटन हा खेळ खूप वेळ घेणारा नसल्यामुळे हे शक्य झाले व खेळाची ओरिजीनॅलिटी बऱ्याच मोठ्या प्रमाणात टिकून राहिली. क्रिकेटसारख्या खेळात प्रेक्षकांना खेचण्यासाठी बरेच बदल करावे लागले. मात्र क्रिकेटच्या तुलनेत बॅडमिंटनमध्ये पैसा खूप कमी आहे. हा फरक भारतातच नाही तर जागतिक स्तरावर आहे.
पीबीएलच्या पुण्यातील स्पर्धेच्या प्रारंभीच्या दिवशी पहिल्याच सामन्यात जागतिक रँकिंग एक असलेला व्हिक्टर अॅलेक्सनचा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळाला. तीन गेमच्या सामन्यात तो पराभूत झाला व ती निराशा त्याच्या देहबोलीतही दिसली. पुणे लीगचा शेवट सर्वांसाठी उत्कंठावर्धक अशा हैदराबाद हंटर्सविरुद्ध नॉर्थ ईस्टर्न वॉरिअर्स या लढतीने झाला. या लढतीत एक सामना होता सिंधू आणि साईनामधील. सिंधूने या स्पर्धेत दोन सामने सुंग जी ह्युन व बेवेन झेंग यांविरुद्ध गमावले होते, तर साईना पहिले तीन सामने अनफिट असल्यामुळे खेळू शकली नव्हती. भारतीय बॅडमिंटन इतिहासातील या दोन सर्वोत्तम महिला शटलर्समधील ही लढत खूप रंगली. साईनाने पहिला गेम जिद्दीने खेळून घेतलादेखील. या गेममध्ये ती ७/१० अशी मागे पडली होती. मात्र तिने नंतर आठ गुण मिळवून गेम जिंकला, परंतु पुढे तिचा निभाव लागला नाही. तिसरा गेम तर ती ५/१५ असा सहज पराभूत झाली. स्पर्धेतील आणखी एक मोठे नाव म्हणजे पुणे सेव्हन एसेस संघाची कॅरोलिना मरीन. तब्बल तीन वेळा जागतिक अजिंक्यपद मिळवलेली कॅरोलिना २०१६च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती.
सध्या तिचे जागतिक रँकिंग पाचवे आहे. पुण्याच्या पीडीएमबीएवर सारे संघ सरावासाठी येत असत तेथेच सिंधूसह मरीनचा सराव तब्बल दोन अडीच तास पाहायला मिळाला. एकाच हॉलमध्ये दोन जगज्जेते खेळाडू वेगवेगळ्या कोर्टवर आपापल्या चमूसह एकाच वेळी सराव करण्याचा योग हा दुर्मिळच म्हणायला हवा. पीबीएलचा चौथा सीझन आता निर्णायक टप्प्यावर असून अहमदाबादमध्ये चौथ्या लेगच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर पाचवा लेग बंगळुरूमध्ये होईल. तेथेच उपांत्य व अंतिम फेरीचे सामनेदेखील होतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link