Next
त्यांनी घडवले तबल्यावरचे सुबक हात
विवेक देवस्थळीे
Friday, February 08 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सुगम संगीत असो किंवा शास्त्रीय, साथीचा तबला वाजतो, साथसंगत करणाऱ्याने वाजवलेला ताल एकच असेल, मात्राही त्याच आणि बोलही तेच... परंतु प्रत्येक तबलजीच्या हातातून उमटणारे वजन, त्याचा डौल हे पाहिल्यास त्याचा गुरू कोण हे ओळखता येते. आजकाल कला पेश करण्याची माध्यमे भरपूर वाढली आहेत. त्यातून कलावंतांना प्रकाशमान होण्याची संधी मिळते. परंतु त्यांच्या गुरूंचे योगदान खूप महत्त्वाचे असते. तबल्याच्या क्षेत्रात असे कित्येक गुरू निरलसपणे वर्षानुवर्षे तालक्षेत्राची सेवा करत आहेत आणि त्यापैकीच दिल्ली व अजराडा घराणेशैलीचा वारसा पुढे नेणारे एक नाव म्हणजे गुरुवर्य पं. श्रीधर यशवंत पाध्ये... अर्थात पाध्येमास्तर!  पं. श्रीधर पाध्येमास्तर वयाची ८१ वर्षे पूर्ण करत असून त्यानिमित्त येत्या शनिवारी ९ फेब्रुवारी रोजी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये त्यांचा सत्कारसोहळा होत आहे. गिरगावात वर्षानुवर्षे पाध्येमास्तरांनी तबल्याचे अनेक विद्यार्थी घडवले, असे म्हणण्यापेक्षा या विद्यार्थ्यांचे हात घडवले, हे पाध्येमास्तरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. स्वतः फार प्रकाशात न येता अनेक तबलावादकांच्या हाताला योग्य वळण देण्याचा ध्यासच जणू त्यांनी आपल्या अध्यापनात हाती घेतला होता.

कोकणातील राजापूर तालुक्यातील आडिवरे या गावात ९ मार्च १९३८ रोजी जन्मलेल्या श्रीधर पाध्ये यांचे आरंभीचे तबल्याचे शिक्षण कै. पं. सखारामपंत भागवत, कशेळी यांचेकडे झाले. मुंबईला आल्यावर सन १९५७ साली त्यांची पं. यशवंतराव केरकर या थोर गुरूंशी भेट झाली व त्यांच्या सांगीतिक जीवनाला नवी दिशा प्राप्त झाली. पं. केरकरमास्तरांकडून श्रीधर पाध्ये यांना घराणेदार बंदिशींचा खजिना मिळाला व निकासाचे मार्गदर्शन मिळाले. सन १९५७ पासून १९९२ पर्यंत म्हणजेच पं. केरकर यांच्या अखेरपर्यंत पाध्ये यांनी पं. केरकर यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले. सन १९६५ साली पं. श्रीधर पाध्ये यांनी तबला शिकवण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात दहा वर्षे अध्यापनाचे कार्य केले. पं. श्रीधर पाध्ये यांना मोठ-मोठया गवयांसोबत साथ-संगत करण्याची संधी मिळाली.

त्यांनी गानतपस्वी गजाननबुवा जोशी, पं. निवृत्तीबुवा सरनाईक, पं. फिरोज दस्तूर, पं. रत्नाकर पै, पं. गोविंदराव अग्नी व डॉ. अशोक रानडे यांच्यासोबत साथ-संगत केली. पं. कृष्णराव चोणकरांबरोबरही त्यांनी बरीच वर्षे साथ केली.

बालगंधर्व व पंडिता हिराबाई बडोदेकर यांनाही साथ करण्याची त्यांना संधी मिळाली. ज्येष्ठ संगीततज्ज्ञ प्रा. बी.आर. देवधर यांच्या संगीतावरील व्याख्यानांमध्ये तसेच मैफिलींमध्ये पाध्ये यांनी अनेकदा तबलासंगत केली. पंडिता धोंडूताई कुलकर्णी यांच्यासोबत तर त्यांनी सतत ४०-५० वर्षे साथ-संगत केली.

अभ्यासू वृत्तीचे असलेल्या पं. पाध्ये यांनी तबल्याचे २० ठेके व त्यातील ५२ उपप्रकार यावर संशोधन करुन भावी पिढीला मार्गदर्शक ठरावे म्हणून ध्वनिमुद्रित  रुपाने संकलन करुन ठेवले आहे. पाध्येमास्तरांची विद्यार्थ्यांचा हात धरून तबला शिकवण्याची एक शैली आहे. ही खास त्यांची शैली आहे; कारण त्यात एक विचार आहे, त्या विचारावरचचिंतन आहे, त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास आहे; मास्तरांनाही आणि शिष्यांनाही; आणि कदाचित म्हणूनच “पाध्येमास्तर” हे एक वेगळे ‘घराणे’ आहे जे कुठेही सहज ओळखता येते. आजच्या काळासारखे ‘तास’, ‘सिटिंग्स’ अशा व्यावहारिक संज्ञा यांना त्यांचेकडे थाराच नाही. इथे होते ते गुरू-शिष्य नाते घट्ट करणारे शिक्षण, तालीम. तबला केवळ ‘वाजता’ कामा नये, तर तो ‘बोलायला’ हवा; त्यातून श्रोत्यांशी संवाद साधला जावा, यावर मास्तरांचा कटाक्ष असतो.
तबलावादन हे श्रवणीयच नव्हे, तर ते प्रेक्षणीयही असावे हा मास्तरांचा प्रत्येक शिष्याच्या बाबतीतला आग्रह असतो. येथे ‘प्रेक्षणीय’ या विशेषणाची व्याप्तीस्पष्ट करणे आवश्यक ठरते. हाताची तबल्यावरील ठेवण, बोटांची जुळणी, दोन्ही खांद्यांचा तोल, मान सरळ ठेवणं, दोन्ही हात तबला व डग्ग्याच्या कक्षेबाहेर नाहीत यावर लक्ष ठेवणे, चेहरा प्रसन्न असायला हवा, या व अशा अनेक छोट्या छोट्या परंतु, प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व तबलावादनप्रभावी करणाऱ्या या गोष्टीच ते श्रवणीय व प्रेक्षणीय करू शकतात या विचारधारेनंच मास्तर आपल्या प्रत्येक शिष्याची जडणघडण करत आले आहेत.

प्रसिद्धीपराङ्मुखता हा तर मास्तरांच्या स्वभावाचा स्थायीभाव आहे. किंबहुना त्यांची ती एक तपस्याच म्हणावी लागेल. त्यामुळेच की काय, मास्तरांच्यावाट्याला पुरस्कार, मानसन्मान आले नाहीत; पण विनम्र भावनेनं ओथंबलेले नमस्कार मात्र किती आले याची गणना नाही. मास्तर, जीवेत शरद: शतम ! 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link