Next
दी टेन कमांडमेंटस : केवळ भव्यदिव्य
मिलिंद कोकजे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

चित्रपट सुरू होण्यापूर्वी दिग्दर्शकाने पडद्यावर येऊन चित्रपटाची गोष्ट  सांगितल्याचे कधी कोणी पाहिले आहे का? ‘दी टेन कमांडमेंट्स’ या चित्रपटात सेसिल बी डेमिल या दिग्दर्शकाने हे केले आहे. चित्रपट सुरू होतो तो रंगमंचावर असतो तशा बंद असलेल्या भव्य पडद्याच्या दृश्याने. समोर एक माइक ठेवलेला आहे... दोन पडद्यांमधील फटीमधून दिग्दर्शक पडद्यापुढे येतो आणि समोर ठेवलेल्या माइकवरून प्रेक्षकांशी संवाद साधू लागतो... डेमिल स्वतःच म्हणतो एखाद्या चित्रपटाची अशी वेगळी सुरुवात ही अपवादात्मक घटना आहे. कारण चित्रपटही वेगळा आहे, असे सांगून चित्रपट काय आहे ते दोन मिनिटांत सांगतो आणि मग चित्रपट सुरू होतो.
चित्रपटांच्या प्रकारांच्या संदर्भात ‘एपिक-भव्यदिव्य’ हा शब्द वापरला जातो. तसा ‘दी टेन कमांडमेंट्स’ हा ‘एपिक’ चित्रपट आहे. यात सर्वच काही भव्यदिव्य आहे. त्यामुळे त्याची खरे तर गंमत मोठ्या पडद्यावर (७० मिमी) बघण्यात आहे. १९५६ साली निर्माण झालेला हा चित्रपट आता कुठे लागण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे त्याचा आस्वाद नाइलाजाने टीव्ही किंवा संगणकाच्या पडद्यावर घ्यावा लागेल. अमेरिकेन संग्रहालयाच्या https://archive.org/details/TheTenCommandmentsMovie1956 या संकेतस्थळावर हा चित्रपट उपलब्ध आहे.
चित्रपटाची कथा बायबलमधील मोझेसची असल्याने ती सर्वांनाच माहीत आहे. या कथेवर त्यापूर्वीही चित्रपट येऊन गेले आणि नंतरही आले. प्रश्न फक्त मांडणीचा होता. या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्यात त्याच्या भव्यतेचा वाटा मोठा आहे. राज्यातील नवजात ज्यू मुलामुळे आपल्याला धोका आहे, हे समजल्यावर इजिप्तच्या फरोह रामसेने सर्व नवजात ज्यू मुलांना मारण्याचे आदेश दिले. योशाबेल आपल्या मुलाला एका गवताच्या टोपलीत ठेवून नाइल नदीच्या प्रवाहात सोडून देते. ती टोपली नेमकी फरोहच्या मुलीला सापडते आणि ती हे मूल दत्तक घेते. ते हिब्रू मूल आहे हे फक्त तिच्या दासीला माहीत असते. हे मूल म्हणजेच मोझेस. मोठा झाल्यावर मोझेस इथिओपिया जिंकून येतो. नेफ्रेटिरी राजकन्या आणि तो प्रेमात पडतात. परंतु नेफ्रेटिरी पुढच्या फरोहशीच लग्न करू शकते आणि त्या पदासाठी दावेदार असतात मोझेस आणि राजपुत्र रामसे. अर्थातच रामसे मोझेसचा द्वेष करतो व त्याला कसे या शर्यतीत मागे टाकता येईल हे सातत्याने बघत असतो.
इजिप्तमध्ये एक प्रचंड मोठे शहर उभारण्याचे काम सुरू असते. तिथे काम करणाऱ्या हिब्रू गुलामांना वाटेल तसे राबवून घेतले जात असते. मोझेस त्यांचे हाल कमी करतो. तो स्वतः हिब्रू असल्याचे रहस्य उघड होते. संधी मिळाली तर सर्व हिब्रू गुलामांना मुक्त करण्याचे तो जाहीर करतो. दरम्यान फरोह त्याला देश सोडून जायला सांगतो. वाळवंट पार करून तो मिडियनला पोचतो. तिथल्या एका शेखच्या सेफोरा नावाच्या मुलीशी लग्न करतो. एकदा त्याला सिनाइच्या डोंगरावर एक झाड जळताना दिसते आणि देवाचा आवाज एेकू येतो. तो इजिप्तला परत जाऊन आपल्या लोकांना गुलामीतून मुक्त करून इजिप्तमधून घेऊन येतो. तो परत सिनाइच्या डोंगरावर जातो तेव्हा त्याला ईश्वराच्या दहा आज्ञा प्राप्त होतात. या मूळ कथेला मग अनेक बारीक-सारीक अंगे आहेत, उपकथानके आहेत आणि भरपूर व्यक्तिरेखाही आहेत. परंतु या सगळ्याला खूपच आकर्षक बनवले आहे ते चित्रपटातील भव्यतेने!
भव्य राजप्रासाद आणि त्यातील प्रचंड मोठी दालने, त्यात वावरणारे लोक, त्यांचे कपडे, दागिने. फरोह रामसेसच्या महोत्सवानिमित्ताने जे मोठे शहर निर्माण केले जात असते त्या दृश्यांची भव्यता तर प्रचंडच आहे. लक्षावधी गुलाम त्या प्रकल्पावर काम करताना दाखवले आहेत. शेकड्यांनी गुलाम एकाचवेळी प्रचंड मोठ्या शिळा दोरांनी खेचत असतात. अशाच एका शिळेखाली एका गुलाम बाईच्या कंबरेला बांधलेली दोरी अडकते आणि शिळेखाली चिरडून होणारा तिचा मृत्यू सर्वांना दिसू लागतो. बाकीचे गुलाम काम थांबवून तिची सुटका करण्याची विनवणी करतात, परंतु त्यांचे कुणीच ऐकत नाही. अखेर एकजण मोझेसला जाऊन सांगतो. तो ताबडतोब येऊन सुरीने कंबरेची दोरी कापून तिला वाचवतो. जिला वाचवतो ती मोझेसची खरी आई असते. या प्रसंगापासूनच मोझसचे वेगळेपण दिसू लागते. नेमके हेच सर्व राजपुत्र रामसेच्या पथ्यावर पडते व त्याला मोझेसला राजाच्या पदाच्या शर्यतीतून बाहेर फेकणे सोपे जाते.
रामसेस राजा झाल्यावर इजिप्तबाहेर हाकललेला मोझेस परत येतो, तो त्याला इशारा द्यायला. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या शाब्दिक संघर्षात मोझेस आपली दैवी शक्ती दाखवतो. रामसेसचा लहान मुलगा त्याच्या काठीला लाथ मारतो तेव्हा त्या काठीचा नाग बनतो आणि ती काठी पाण्यात बुडवल्यावर नाइल नदीच्या पाण्याचे रक्तात रूपांतर होते. अखेर ठरवल्याप्रमाणे मोझेस त्याच्या लोकांची गुलामीतून मुक्तता करण्यासाठी येतो. लक्षावधी हिब्रू गुलाम आपापले सामान घेऊन, मुलांना, म्हाताऱ्या-कोताऱ्यांना, जनावरांना घेऊन मोझेस पाठोपाठ बाहेर पडतात ते दृश्य ऐतिहासिक आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक चित्रपटाच्या पडद्यावर एका दृश्यात क्वचितच बघायला मिळाले असतील. युद्धांच्या दृश्यात मोठ्या संख्येने लोक बघायला मिळतात. परंतु या दृश्याची गंमतच वेगळी आहे.
मोहिमेवर गेलेल्या रामसेसला परत येतो तेव्हा त्याला गुलाम निघून गेल्याचे कळते. तो सैन्य घेऊन त्यांच्या पाठीमागे जातो. तोपर्यंत मोझेस सर्वांना घेऊन लाल समुद्रापर्यंत पोचतो. तोवर त्यांच्यामागे रामसेसचे सैन्य येते. मोझेस आपल्या ईश्वराच्या मदतीने त्या सैन्यापुढे आगीचा लोळ निर्माण करून त्यांची आगेकूच थांबवतो. मग तो ईश्वरी शक्तीने संपूर्ण तांबडा समुद्र दुभंगवतो आणि आपल्या लोकांना पलिकडे जायला रस्ता तयार करून देतो. सर्व हिब्रू पलिकडच्या किनाऱ्यावर पोचल्यावर मोझेस परत समुद्र पूर्ववत करतो. दरम्यान हिब्रूंच्या मागे लागलेले सैनिक समुद्राच्या तळाशी जातात. समुद्र दुभंगण्याचे व पूर्ववत होताना त्यात पाण्याखाली सापडलेले सैनिक ही दृश्ये हे या चित्रपटातील कमालीची भव्य आणि अप्रतिम स्पेशल इफेक्ट्स असेलेली आहेत. चित्रपट बनवण्याचा काळ लक्षात घेतला तर हे दृश्य कसे घेतले असेल याचे आश्चर्य वाटते. असेच स्पेशल इफ्केट्स मोझेसला डोंगरावर ईश्वराचा संदेश प्राप्त होतो आणि विजा कडाडून दगडावर आदळून त्यातून दगडावर दहा आज्ञा कोरल्या जातानाच्या दृश्यात बघायला मिळतात.
चार्ल्टन हेस्टन, यूल ब्रायनर, अॅना बॅक्स्टर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. सगळेच एकदम जबरदस्त कलाकार असल्याने चित्रपटाची भट्टी उत्तम जमली आहे. राजवाड्यातला मोझेस ते हिब्रू गुलाम मोझेस आणि त्यानंतर ईश्वराची आज्ञा प्राप्त झालेला मोझेस या व्यक्तिरेखांची एकदम परस्परविरोधी भिन्न अंगे हेस्टनने उत्तमपणे साकारली आहेत. कथा, त्याची मांडणी, उत्तम व्यक्तीरेखा, भव्यता आणि स्पेशल इफ्केट्स या सगळ्यांची उत्तम सांगड दिग्दर्शक सेसिल बी डेमिलने घातल्याने ‘ दी टेम कमांडमेंट्स’ एका वेगळ्याच उंचीवर गेलेला अप्रतिम चित्रपट झाला आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link