Next
नौदल आणि मुंबापुरीचा इतिहास
विशेष प्रतिनिधी
Friday, February 08 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सात बेटांचा समूह असलेली मुंबापुरी गुजरात सल्तनतकडून पोर्तुगीजांकडे कशी आली, ती पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांना आंदण म्हणून कशी मिळाली, यापासून या बंदराचा झालेला विकास, त्यासभोवती छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे या मराठा साम्राज्यातील लढवय्यांनी आरमाराचे महत्त्व ओळखून ब्रिटिशांना दिलेली टक्कर, वाडियांनी सुरू केलेली नौकाबांधणीची उज्ज्वल परंपरा... मुंबईच्या उत्क्रांतीच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यांबरोबरच तिच्याशी जोडल्या गेलेल्या भारतीय नौदलाच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा पाऊण तासाचा एक लघुपट भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडने तयार केला आहे.

 राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते अलिकडेच नेव्हीनगरातील कॅप्टन के. मल्ला सभागृहात ‘मॅरिटाइम मुंबई – अॅन ओडिसी’ या  लघुपटाचे प्रकाशन अलिकडेच करण्यात आले. कुलपती या नात्याने माझ्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील २० विद्यापीठांमध्ये हा लघुपट दाखवला जाईल, अशी घोषणा राज्यपाल राव यांनी यावेळी केली. हा लघुपट या महिनाभरात व्यावसायिक पातळीवर प्रदर्शित होईल व तो जागतिक स्तरावरही नेण्यात येईल, असे या लघुपटाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे नौदलाच्या पश्चिम कमांडचे माजी ध्वजाधिकारी व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी सांगितले. व्हाइस अॅडमिरल (आता निवृत्त) गिरीश लुथ्रा यांच्या काळात या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. या लघुपटात अॅनिमेशन, ग्राफिक व काही प्रसंगांमध्ये प्रत्यक्ष कलाकार अशी मिश्र माध्यमे वापरून १६व्या शतकापासून मुंबईचा झालेला विकास दाखवण्यात आला आहे. इंग्लंडचा किंग चार्ल्स (दुसरा) यास, पोर्तुगालची युवराज्ञी कॅथरीन ब्रिगॅन्झा हिच्याशी विवाहबद्ध झाला तेव्हा, पोर्तुगालच्या राजाने मुंबई आंदण दिली. त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला मुंबापुरी भाड्याने दिली. ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचे मुख्यालय सुरतेहून मुंबई बेटावर स्थलांतरित केले, तेव्हा बॉम्बेम किंवा गुड बे याचा जन्म झाला. तेव्हापासून मुंबईचे नौवहन व नौदलाचे महत्त्व वाढत गेले. १७३५ मध्ये लोविज नुसेरवानजी वाडिया या पारशी व्यक्तीला सुरतेहून मुंबईत नौकाबांधणी करण्यासाठी व बॉम्बे शिपयार्डचे आधुनिकीकरण करण्यासाठी पाचारण करण्यात आले. वाडियांनी १६० वर्षांच्या काळात ३५५ नौका बांधल्या. आजही हार्टेपूल येथे पाण्यावर तरंगत असलेल्या जगातील सर्वात प्राचीन एचएमएस त्रिंकोमाली या नौकेची बांधणी येथेच झाली होती. अशा विविध विस्मयकारक गोष्टी या ४० मिनिटांच्या लघुपटात प्रभावीपणे समोर येतात. नौकाबांधणी, व्यवसायातून भारतीय नौदलाची पायाभरणी कशी झाली, त्याचे संदर्भही या लघुपटात देण्यात आले आहेत.

़़़़़़़़़़़़़़़़

गडकरींकडून प्रेरणा?

 केंद्रीय जहाजवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या किनारपट्टी विकासावरून नौदलाला अनुलक्षून केलेले विधान वादग्रस्त ठरले होते. भारतीय नौदलाने सुरक्षेच्या कारणास्तव एका हॉटेलला परवानगी नाकारल्याबद्दल टीका करताना त्यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सीमेवर जाऊन लढावे, असे विधान केले होते. यानंतरच भारतीय नौदल आणि मुंबईचा संबंध काय, नौदलाचे मुंबईच्या विकासाताली योगदान काय, हे स्पष्ट करण्याची नितांत आवश्यकता नौदल अधिकाऱ्यांना जाणवली. त्यामुळे गडकरींच्या विधानामुळेच या प्रकल्पाचा जन्म झाला, अशी वदंता आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link