Next
वेगळी अलका भेटत राहील
अलका कुबल-आठल्ये
Friday, April 26 | 05:00 PM
15 0 0
Share this story

‘माहेरची साडी’नंतर माझ्यामागे त्या पठडीतले एवढे चित्रपट आले की जवळपास दोनशे चित्रपट मी त्या प्रकारातले केले. त्या कामाने मला एक व्यावसायिक स्थैर्य दिलं. परंतु कलाकार म्हणून माझी भूक शिल्लक राहत होती. ‘माहेरची साडी’ १९९२ चा. तेव्हापासून २००४ पर्यंत म्हणजे बारा वर्षं मी अग्रस्थानी होते. त्यात माहेर, सासर, ओटी असे बरेच चित्रपट केले. त्या दरम्यान श्रीनिवास भणगे यांनी ‘सुगंधा’, ‘धरलं तर चावतंय’ या चित्रपटांमधून मला वेगळ्या भूमिका दिल्या. कुमार सोहोनी, गिरीश घाणेकर, सतीश रणदिवे या काही मोजक्या दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला पठडीच्या बाहेरच्या भूमिका दिल्या. परंतु चालले ते सासर-माहेर विषय असलेले चित्रपटच. म्हणजे मला वाटायचं की मी नेहमीपेक्षा वेगळी भूमिका केली आहे, तेव्हा हा चित्रपट चालवा, परंतु तसं झालं नाही. यश जे मिळत होतं ते पठडीतील चित्रपटांनाच मिळत होतं. काही वर्षांनंतर मी त्या भूमिकांना कंटाळले. तोपर्यंत व्यवसायात स्थैर्य आलं होतं. आता एक कलाकार म्हणून वेगळ्या भूमिका करायला हव्यात असं ठरवून टिपिकल भूमिकांना नकार द्यायला सुरुवात केली. दरम्यान केदार शिंदेचा ‘श्रीमंत दामोदर पंत’ आणि ‘कल्ला’ हे दोन चित्रपट मी केले कारण त्यातल्या भूमिका वेगळ्या होत्या.

त्यानंतर एक वेगळं वळण आलं आणि मी निर्मितीकडे वळले. आमच्या ओळखीचे एक चित्रपट वितरक होते. त्यांच्या सांगण्यावरून मी चित्रपट निर्माती बनले. त्यांच्या आग्रहामुळेच मी आणि माझी बहीण निर्मितीक्षेत्रात उतरलो. ‘सुहासिनीची सत्त्वपरीक्षा’(२००४) हा आमची निर्मिती असलेला पहिला चित्रपट. तो तयार झाला, सगळीकडे त्याचे शोज लागले, तीन ठिकाणी प्रीमियर शो करायचं ठरलं. मी खूप उत्सुक होते. एका नवीन भूमिकेत शिरले होते.  प्रीमियरचा दिवस उजाडला. पहिल्या प्रीमिअरसाठी आम्ही सगळे गाडीने जायला निघालो. ज्यांच्या सांगण्यावरून मी या क्षेत्रात उतरले होते त्या चित्रपट वितरकाचा फोन आला आणि ते म्हणाले, “सॉरी अलकाताई, मी तुमचा चित्रपट घेऊ शकत नाही.” माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय करायचं सुचेना, मला तर त्यातला काहीच अनुभव नव्हता. तीन ठिकाणी चित्रपट लावून तो बंद करायची नामुष्की ओढवणार या कल्पनेनं माझ्या पोटात गोळा आला. ज्यांच्या सांगण्यावरून मी चित्रपट निर्माण केला त्यांनीच चित्रपट वितरीत करणार नाही म्हणून शेवटच्या क्षणी सांगावं? मी ठरवलं की आता मागे हटायचं नाही. चित्रपट चालवायचाच. मग मी माझा मोर्चा जत्रांकडे वळवला आणि ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला. मला आठवतंय की एका जत्रेत आम्ही ७ चा शो लावला होता. सहा वाजता तिथे पोहोचलो तर अख्खी जत्रा रिकामी होती. मला भीती वाटू लागली पण जशी सात वाजण्याची वेळ जवळ आली तसे प्रेक्षकांचे लोंढेच्या लोंढे चित्रपट बघायला आले. आम्ही सात-आठशे लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती पण पुढे दोन-अडीच हजार प्रेक्षकांची व्यवस्था करावी लागली. खोटं वाटेल पण तो चित्रपट आठ महिने चालला. माझी इतर कामंही त्यावेळी सुरूच होती. माझं शुटींग असायचं पश्चिम महाराष्ट्रात आणि हा चित्रपट लागला होता विदर्भ, मराठवाडा या भागात. मग मी शुटींग संपलं की स्वतः ड्राइव्ह करून विदर्भ, मराठवाड्यात जायचे. तहान-भूक-झोप सगळं हरवून काम करत होते. कारण चित्रपट चालवून दाखवायचाच हा मी निश्चय केला होता. मला कुणीतरी फसवलं होतं आणि मला त्याला उत्तर द्यायचं होतं. माझ्या मेहनतीचं चीज झालं आणि जेवढा खर्च निर्मितीवर मी केला होता त्याच्या चार पट नफा मिळवूनच मी थांबले. खूप प्रवास केला. गाडीतच थोडावेळ झोपायचे आणि पुन्हा ड्रायव्हिंग करत ठरलेल्या ठिकाणी पोहचायचे, चित्रपटाच्या शोजना हजर राहायचे व ते संपले की पुन्हा ड्रायव्ह करून शुटींगच्या ठिकाणी पोहचायचे. अलका कुबल जत्रांमध्ये जाते, चित्रपट वितरीत करते अशी माझ्यावर टीकाही झाली पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही.  जिद्द महत्त्वाची होती. त्यानंतर वेगळ्या चित्रपटांची निर्मिती करायची म्हणून ‘धनगरवाडा’, व तृतीयपंथींवर ‘आम्ही का तिसरे’ हे चित्रपट केले. नंतर मात्र चित्रपट निर्मितीची गणितं आणि जाहिरातीचं क्षेत्र खूप वेगानं बदलू लागलं आणि कोटींच्या घरात पोहोचलं तेव्हा मात्र मी थांबले. हा जुगार आणखी जास्त आपण खेळू शकत नाही हे लक्षात आलं.

 लोक मला विचारायचे की अभिनेत्री म्हणून तुम्ही काम बंद केलं का, तेव्हा त्यांना मी सांगायचे की, ‘नाही! मी काम कमी केलंय.’ मला त्या भूमिकांचा कंटाळा आला होता आणि त्याचवेळी दुसरीकडे घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. मला कायम साथ देणाऱ्या माझ्या सासूबाई थकल्या होत्या. मुली मोठ्या झाल्या होत्या व त्या टप्प्यावर त्यांना आई म्हणून माझी जास्त गरज होती. त्यांची शिक्षणं महत्त्वाच्या टप्प्यावर आली होती. अशावेळी आपण घरी असणं मला गरजेचं वाटलं. मुली लहान होत्या तेव्हा मी त्यांना घेऊन शूटिंगला जायचे, एवढंच नाही तर प्रेग्नंट असतानाही मी आठव्या महिन्यापर्यंत कामं केलेली होती; तेव्हा सगळं घर माझ्या पाठीशी उभं होतं.  परंतु आता मात्र घराला, कुटुंबाला प्राधान्य देणं मला महत्त्वाचं वाटलं म्हणून मी कामं कमी केली. मुलींकडे दुर्लक्ष करून करिअर करायचं नव्हतं. आज मला खूप छान वाटतं की दोघीही चांगल्या शिकल्या. मोठी पायलट झाली आणि धाकटी डॉक्टर होतेय.

आज या टप्प्यावर याचा आनंद आहे, की वेगळ्या भूमिकांसाठी आता माझा विचार होऊ लागला आहे. ‘कौसाक्का’ नावाचा एक वेगळा चित्रपट मी नुकताच पूर्ण केला. त्याशिवाय ‘वेडिंगचा शिनेमा’ यातील माझी भूमिका खूप वेगळी होती. या भूमिका मला आनंद देत आहेत. चौकटीच्या बाहेर पडून वेगळ्या भूमिका करते आहे, ज्या वास्तववादी आहेत आणि माझ्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या जवळ जाणाऱ्या आहेत. समीर विद्वांसबरोबरही मी एक वेगळा चित्रपट करते आहे. चांगले चित्रपट मिळत आहेत याचं समाधान वाटतं. काही वर्षांपूर्वी मी त्याच त्या भूमिका करायला जो ठामपणे नकार देण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच वेगळ्या भूमिकांसाठी माझा विचार दिग्दर्शक करू लागले, इथे मी जिंकले असं मला वाटतं. प्रेक्षकांना हाच विश्वास देते की मी इथून पुढे वेगळ्या भूमिका करत राहीन आणि वेगळी अलका तुम्हाला भेटत राहील. तुमचं प्रेम माझी शिदोरी आहे, ती कधी रिती होऊ देऊ नका. असंच प्रेम करत राहा, धन्यवाद!                                      (समाप्त)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link