Next
लढवय्या पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी मीही सैन्यात
शब्दांकन : डॉ. विनया केसकर
Friday, May 31 | 01:45 PM
15 0 0
Share this story

‘कर्नल संतोष’ हे माझे पती. देशप्रेम हा त्यांचा श्वास होता. देशासाठीच त्यांनी आपल्या जिवाची आहुती दिली. आज शरीराने ते आमच्यात नसले तरी कायम आमच्याजवळ आहेत. ते कायम माझ्यासोबत असतात. कोणत्याही प्रसंगात संतोष कसा विचार करत होते, असा विचार करून मी निर्णय घेते. माझ्या लढवय्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सैन्यात भरती झाले, दु:ख झुगारून ठामपणे उभी राहिले.

मी, लेफ्टनंट स्वाती महाडिक. माझे पती संतोष महाडिक यांना श्रीनगरमधील कूपवाडा येथे १७ नोव्हेंबर २०१५ रोजी वीरगती प्राप्त झाली. त्या दिवशी मी आणि आमची मुले आम्ही तिथून एक दिवसाचा प्रवास करून पोहोचता येईल इतक्या अंतरावर असलेल्या उधमपूर येथे होतो. संतोष यांना गोळी लागली आहे, हे जेव्हा मला समजले तेव्हा माझे मन मला सांगत होते, ते नक्की परत येतील. फार तर मोठी दुखापत झाली असेल. परंतु त्यांच्या जिवावर बेतेल असे कधी मनातही आले नाही.

सैन्यात देशासाठी सज्ज असलेला पती म्हटला की युद्ध, गोळी लागणे, दुखापत हे सगळं आलेच. परंतु संतोष यांनी मला नेहमीच खूप कणखर बनवले होते. त्यांना गोळी लागल्याची बातमी आली, त्यानंतर आमचे घर माणसांनी भरून गेलं. तिन्ही युनिटचे मुख्य अधिकारी आले तेव्हा मात्र माझ्या मनात शंका आली. मला आतल्या खोलीत नेऊन अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘संतोष आता आपल्यामध्ये नाही.’ हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक एकाकी झाल्यासारखे वाटू लागलं. ते दिवस खूप भयंकर होते. आता मी मुद्दाम त्याबद्दल जास्त काही सांगत नाही. कारण ते सगळं आठवले की खूप त्रास होतो. 

एक-दोन दिवसांतच मी साताऱ्याला आमच्या गावी आले. त्यानंतर माझ्या मनाने घेतले की आपल्या पतीचे सैन्यातील स्वप्न आपण पूर्ण करायचे. आपणच सैन्यात भरती व्हावे, त्यांचा युनिफॉर्म घालावा आणि त्याचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, असे विचार मनात येऊ लागले. हा विचार मी जेव्हा बोलून दाखवला तेव्हा माहेर आणि सासर दोन्हीकडून फारसा पाठिंबा नव्हता. एक सुरक्षित आयुष्य आणि नोकरी करायची सोडून मी हे का करते आहे, असा त्यांचा विचार होता. परंतु माझा निर्धार पक्का असल्यामुळे मग त्यांनी मला परवानगी दिली. माझ्याबाबत सहानुभूती दाखवून सरकारने माझ्यासाठी विशेष काही करावे, अशी माझी अपेक्षा नव्हती. फक्त वयाच्या बाबतीत शिथिलता द्यावी, असे मला वाटत होते. लेखी परीक्षेच्या सहा महिने आधी मी अकादमीमध्ये रुजू झाले. माझ्या दोन्ही मुलांना हॉस्टेलवर ठेवले. कठोर मेहनत केली. परीक्षेच्या वेळी माझ्यापेक्षा १५-२० वर्षं लहान मुलींसोबत सगळ्या पातळ्यांवर मी सरस ठरले. सैन्यात जाण्याचा निर्णय मी भावनिक पातळीवर घेतला होता, पण नंतर मी विचार करू लागले, हा निर्णय मी का घेतला असेल? मग माझ्याही लक्षात आले, की नकळत का होईना मी योग्य निर्णय घेतला होता. माझ्या मुलांसाठी मला उभे राहणे गरजेचे होते. मी कणखरपणे उभी नाही राहिले तर माझी मुले कोणाच्या आधारे जगतील? पैसे मिळवणे ही माझ्यासाठी दुय्यम गोष्ट होती. माझ्या मुलांना लष्कराची शिस्त, तिथले वातावरण, सुरक्षितता या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. जी गोष्ट आपल्याला आनंद देते ते करिअर, याची अनुभूती मी प्रत्यक्षात घेतली. सध्या माझे पोस्टिंग देहूरोडला आहे. कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी म्हणवून घेताना मला जितका अभिमान वाटत होता, तितकाच अभिमान लेफ्टनंट स्वाती महाडिक म्हणून काम करताना वाटतो आहे.

संतोष त्यांच्या विचारांच्या रूपात कायम आमच्या सर्वांच्या जवळ आहेत. ते कायम म्हणायचे, ‘कायम समाधानी राहायला शिक.’  कित्येकदा मला अशी जाणीव होते, की डोळे बंद केले की ते माझ्याशी बोलतात. कूपवाडा येथे संतोष यांनी खूप सामाजिक कार्य केले आहे. आजही तिथले लोक त्यांची आठवण काढतात. त्यांच्या नावाने कूपवाडामध्ये कर्नल संतोष महाडिक स्कील डेव्हलपमेंट सेंटर ही एनजीओ काम करते आहे. कूपवाडा येथील तरुणांना सक्षम बनवण्यासाठी संतोष यांच्या कल्पनेतून हे काम सुरू झाले. ते आजही तसेच चालू आहे.

कायम वर्तमानकाळात जगायचे, असा संदेश ते नेहमी द्यायचे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देशसेवा करणे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. त्यांची प्रेरणा कायम मनात असेल. बा. सी. मर्ढेकरांच्या या काव्यपंक्ती संतोषच्या जीवनाला अगदी चपखल बसतात, 

अखेर घेता टक्कर जरी मग युगायुगांचे फुटेल भाल, 

अशाश्वताच्या समशेरीवर शाश्वताची तुटेल ढाल

(शब्दांकन : डॉ. विनया केसकर)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link