Next
पंढरपुरा नेईन गुढी।
डॉ. रामचंद्र देखणे
Friday, July 05 | 01:15 PM
15 0 0
Share this story


पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तीची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडवणारे ते नैतिकतेचे चालतेबोलते विद्यापीठ आहे. ज्ञानवंतांनी पंढरीनाथाचे ज्ञानरूप उभे केले तर मोठ्या भाविकांनी भक्तिभावाने त्याचे भावदर्शन अनुभवले. ज्याला ज्ञानाने जाणायचे ते ‘ज्ञेय’ आणि ज्याला ध्यानाने गाठायचे ते ‘ध्येय’, असे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य, योगियांचे गौप्य जिथे विटेवर समचरण उभे आहे त्याला प्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेल्या वैष्णवांचा मेळा म्हणजे ‘वारी’ होय.  मानवी जीवनातील अपूर्णता, दोषमयता, मनुष्याची सदाचाराकडे धावणारी स्वाभाविक प्रवृत्ती या व्यापक जनविश्वात आपल्या थिटेपणाची जाणीव, विश्वाची विशालता आणि नियमबद्धता यांचा जिज्ञासू भूमिकेतून अर्थ शोधल्याशिवाय परमार्थाची वाट सापडत नाही. ज्ञानेश्वरमाऊली म्हणतात,

पाठी महर्षि येणे आले। साधकाचे सिद्ध झाले
आत्मविद् थोरावले।
येणेचि पंथे ।।  


याच मार्गावरून महर्षी आले, साधक सिद्धावस्थेला गेले. हा मार्ग स्वच्छ आहे. शुद्ध आहे. निर्मळ आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या पालखीने पुणे मुक्काम सोडल्यानंतर पुढचा मुक्काम येतो तो सासवड गावी. सासवडच्या अगोदर वारीच्या वाटचालीत दिवेघाट लागतो. त्या घाटातून वाटचाल करताना वारीचे दृश्य अतिशय नयनमनोहर असते. टाळ-मृदंगाच्या गजरात झेंडेपताकांचा भार घेऊन वारकऱ्यांचा जनप्रवाह सरसर वर सरकताना दिसतो. हा वर झेपावणारा प्रवाह पाहिल्यावर मनामध्ये नाथांचे एक रूपक उभे राहते. नाथांचे ‘कोडे’ नावाचे एक भारूड आहे त्यात त्यांनी वर्णिले आहे,

नाथाच्या घरची उलटीच खूण पाण्याला मोठी लागली तहान ।
आज सई म्या नवल देखिले।
वळचणीचे पाणी आढ्या लागले ।।

जगातला कोणत्याही द्रवाचा प्रवाह हा वरून खाली वाहत येतो. पाण्याचा प्रवाहदेखील वरून खालीच वाहत असतो. परंतु हा व्यापक जनलोकांचा प्रवाह जेव्हा खालून वर वाहताना दिसतो तेव्हा ‘वळचणीचे पाणी आढ्या लागले’ या वचनाची साक्ष पटते. हा प्रवाह खालून वर म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविचाराकडून विचाराकडे, अविवेकाकडून विवेकाकडे, विरोधाकडून विकासाकडे, गोंधळातून व्यवस्थेकडे, भेदातून अभेदाकडे, अंधारातून प्रकाशाकडे ऊर्ध्व दिशेने नेणारा विवेकाचा मार्ग आहे. आणि या मार्गावर वैष्णवांच्या सांगाती सत्संगती घडणारी वाटचाल म्हणजे पंढरीची वारी होय, म्हणून तर ज्ञानदेव या वाटेवर स्थिरावले आणि

आनंदाने गात सांगू लागले।
माझीया जिवीची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ।।


संत ज्ञानेश्वरमाऊलींना वेदांताच्या ज्ञानाने, तुकोबारायांना वृत्तीच्या अंतर्मुखतेने, नामदेवरायांना भक्तीच्या लडिवाळपणाने, नाथमहाराजांना व्यापक लोकसंग्रहाने तर समर्थांना लोकभ्रमंतीने जे अनुभवसिद्ध वैभव प्राप्त झाले ते जगाला देण्यासाठी संत सिद्ध झाले. संतविचारांचे हे अलौकिक वैभव वारीच्या वाटेवर ओसंडून वाहू लागले. जगाचा, सत्याचा, मानवी मनाचा, दु:खाचा आनंदाचा, परमात्माप्राप्तीचाही शोध घेण्याचा भ्रमंती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग ठरतो. जनमनाचा वेध घेऊन जनातील देव शोधणे आणि मनातील देवत्वाला आवाहन करणे यासाठी विवेकाच्या मार्गाने होणारी भ्रमंती म्हणजे ‘पंढरीची वारी’ होय. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा नामगजर म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक महामंत्र होय. ज्ञानेश्वरमाऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे, तर तुकोबाराय हा नि:श्वास आहे. ज्ञानोबा-तुकाराम या महामंत्रातच सर्व साधुसंतांचा आणि संतपरंपरेचा समावेश होतो.
आचार्य अत्रे म्हणतात, “मराठी भाषेतून आणि मराठी जीवनातून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ वजा केले तर बाकी काय राहील?” सद्विचारांचे आणि सद्भावनेचे केवढे गडगंज धन त्यांनी महाराष्ट्रावर उधळून ठेवले आहे. ज्ञानेश्वरमाऊली या मार्गावर रंगले आणि नाचत गात सांगू लागले...

अवघाचि संसार सुखाचा करीन।
आनंदे भरीन तिन्ही लोक।।
जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा आपुलिया ।।

तर तुकोबाराय या मार्गावरून चालताना अवघे विठ्ठलरूप होऊन म्हणू लागतात...

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी।
विठ्ठल तोंडी उच्चारा।।
विठ्ठल अवघ्या भांडवल।
विठ्ठल बोला विठ्ठल।।

ज्ञानभक्तीच्या समचरणावर अठ्ठावीस युगे परब्रह्मरूपात विठ्ठल उभा आहे. त्याला भक्तिप्रेमाने भेटायला निघालेल्या वैष्णवांचा मेळा जेव्हा वारीच्या रूपात उभा राहतो तेव्हा भक्तीचे व्यापक भावदर्शन अनुभवता येते. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली, ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली, भक्तीच्या पेठेत अद्वैत भावाची देवाणघेवाण झाली, सदाचाराचा व्यापार फुलला, अवघाचि संसार सुखाचा झाला आणि पंढरीच्या वाळवंटात ‘एकची टाळी झाली.’ ती ‘अद्वैताची एकची टाळी’ हेच वारकऱ्यांचे लक्ष्यही ठरले आणि लक्षणही. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचे रिंगण फुलते. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो आणि पारलौकिकाची अनुभूती मिळते.
पंढरीची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे; परंतु पंढरपूरच्या वारीला किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते, तर त्यांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची मिराशी होती. ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता. परंतु पहिली दिंडी ही पंढरपुराहून आळंदीला आली आहे. ज्ञानेश्वरमाऊलींनी समाधी घेण्याचा मनोदय जेव्हा व्यक्त केला तेव्हा संत नामदेवमहाराजांच्या मार्गदर्शनाखाली संत गोराकुंभार, नरहरी सोनार आदी संतमंडळींनी भजनाची दिंडी तयार केली आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या गावाहून म्हणजे पंढरपुराहून संतमंडळी माऊलींच्या समाधीसोहळ्यासाठी आळंदीस आली. ज्ञानेश्वरमाऊलींच्या अगोदरपासून पंढरपुरी वारीला जाण्याचा प्रघात होता; पण दिंडी नव्हती. आता दिंडी सुरू झाली आणि ही पंढरपुरी पायी जाणारी मंडळी दिंडीत सहभागी झाली. त्या काळच्या साधू-संतांनी हा प्रघात चालू ठेवला. संत एकनाथमहाराज, संत तुकाराममहाराज, मल्लप्पा वासकर आदी संतपरंपरेने हा पुण्यमार्ग वाढवला आणि वैष्णवभक्तीचे वर्म, वारीचा धर्म घेऊन दिंडीच्या रूपात नाचू लागले. वारीची परंपरा तुकाराममहाराजांच्या घरात पिढ्यान् पिढ्या चालू होती.
‘पंढरीची वारी आहे माझे घरी’ असे तुकाराममहाराज अभिमानाने सांगतात. विश्वंभरबाबा हे तुकाराममहाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष. तुकाराममहाराज हे त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज होत. विश्वंभरबाबा दर पंधरा दिवसांनी पंढरपूरला जात असत. तुकोबारायांचे वडील बोल्होबा अखंडपणे चाळीस वर्षे वारी करत होते, असे महिपतीने वर्णिले आहे. त्यानंतर तुकोबाराय हे स्वत: ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात बांधून आपल्या टाळकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरीची वारी करत. तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांनी वारीची परंपरा चालू ठेवली आणि त्यानंतर वारीच्या परंपरेची आणि सांप्रदायाची धुरा तुकोबारायांचे धाकटे पुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. ज्ञानेश्वरमहाराज आणि तुकाराममहाराज यांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असे भजन करत पंढरपूरला जाण्याची परंपरा नारायणबाबांनी सुरू केली आणि वारीला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले. ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीसोहळ्याला आज जे नेटके रूप प्राप्त झाले आहे ते हैबतबाबांमुळे. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या पदरी सरदार असलेले हैबतबाबा माऊलींचे परमभक्त होते. त्यांनी त्या वेळचे औंधचे प्रतिनिधी यांच्याकडून आणि पुढे बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावच्या सरदार शितोळे यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी गाड्या, नैवेद्यासाठी सेवेकरी हा सारा स्वारीचा लवाजमा मागवला; तो आजतागायत चालू आहे. श्रीमंत पेशवेसरकार, औंधचे पंतप्रतिनिधी आणि पेशवाई नष्ट झाल्यावर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरू झाले तेव्हा त्यांनीही वारीचा हा खर्च देण्याचे चालू ठेवले. पुढे शितोळे सरकारांचे हे सेवाकार्य आजतागायत अखंडपणे चालू आहे. हैबतबाबा हे लष्करात वावरले असल्यामुळे त्यांनी वारीला लष्करी शिस्तीचे वळण दिले. आजही वारीची शिस्त हा एक अभ्यासाचा विषय आहे. आजही वाटचालीत
मालिकेप्रमाणे अभंग म्हणण्यात शिस्त आहे.
तळावरील पालखीची समाज आरती पाहिल्यावर शिस्तीचे उत्कृष्ट दर्शन पाहायला मिळते. थोडक्यात आजचे वारीचे स्वरूप पाहता सहज लक्षात येते, की वारी हा लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे असे म्हणावे लागेल.  पालखीच्या वाटचालीमध्ये तीन भाग महत्त्वाचे पडतात. एक म्हणजे भजन म्हणत होणारी वाटचाल. दुसरे म्हणजे ज्या गावाला पोचायचे तो मुक्काम, तर तिसरी गोष्ट म्हणजे वाटचालीतील मधला विसावा. चालणारा वारकरी आहे आणि वाट वेगळी आहे. वारकरी आणि वाट दोन्ही मुक्कामाच्या गावी पोचतात म्हणून म्हणावेसे वाटते, की द्वैतभावाची वाटचाल, अद्वैतभावाचा मुक्काम पण प्रेमभावाचा विसावा म्हणजे पंढरीची वारी होय. वारीच्या वाटेवर काही ठिकाणी रिंगण केले जाते. उभे रिंगण आणि गोल रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार असतात. सर्व वारकरी, टाळकरी, झेडेकरी, मृदंगवादक, विणेकरी गोलाकार उभे राहतात. नामगजर चालू होतो. टाळ-मृदुंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात आणि त्या तालातच भरधाव वेगाने माऊलींचे अश्व गोलाकार प्रदक्षिणा करत माऊलींना अभिवादन करतात. टाळ-मृदंगाचा वेग, जयजयकार आणि वायुवेगाने धावणारे अश्व हे सारे दृश्य विलोभनीय असते. रिंगण संपते आणि हमामा, फुगड्या, हुतुतू, एकीबेकी यासारखे खेळ सुरू होतात.
रिंगण ही प्रथा का सुरू झाली, तिचे रूपक काय, हे समजणे आवश्यक आहे. पंढरीची वारी आणि त्यातील आविष्कार हाच एक बहुरूपी संतखेळ आहे. दमलेल्या-चाललेल्या वारकऱ्यांना खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे रिंगण. त्यातून काही शारीरिक व्यायाम आणि योगासनेही आपोआपच घडतात आणि वाटचाल सुलभ होते. रिंगण करायला, त्यात खेळायला आणि पाहायलाही खूप लोक उत्सुक असतात. एका लोकगीतात त्याचं सुंदर वर्णन आलं आहे.

पंढरीच्या वाटं दिंड्या पुताका लोळती।।
देव त्या विठ्ठलाचं साधु रिंगण खेळती।।

रिंगणाचं रूपकही आगळंवेगळं आहे. रिंगण म्हणजे गोलाकार खेळ. एखाद्या सरळ रेषेतील सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू दाखवता येतो. रिंगणात मात्र कोणत्याही बिंदूपासून वर्तुळ सुरू होते आणि पुन्हा त्याच बिंदूला येऊन मिळाल्यावर परिपूर्ण होते. तसेच जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून आपल्याला पारमार्थिक रिंगणात प्रवेश करता येतो. माऊली म्हणतात, ‘हृदय शुद्धीचा आवारी’ अंत:करणाच्या शुद्धतेच्या आवारात हे मनाचे सुरू होते. आत्मस्वरूपापासून निघून व्यापक शिवस्वरूपाला वळसा घालून पुन्हा आत्मस्वरूपाला स्थिरावणे म्हणजे वर्तुळ पूर्ण होणे. माऊली या विश्वव्यापी रिंगणात मनाला सोडतात आणि म्हणतात,

म्हणेन तुमचा देवा। परिवारू जो आघवा।।
तेतुले रूप होआवा। मीचि एकु।|

देवा, तुमचा जो सर्व परिवार आहे तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे. मीच सर्व रिंगणभर व्हावे आणि रिंगणाइतकं व्यापकत्व माझ्यात यावे. खेळ रिंगणात खेळतात. विश्वाची निर्मिती हा भगवंताचा खेळ तर जीवन जगणं हाच जीवाचा खेळ आपण घालून दिलेल्या मर्यादेच्या आत म्हणजेच धर्म, नीती, तत्त्व, आचार या परिघातच जीवनाचा खेळ रंगवून आनंदाचं रिंगण करायचे आहे.
एकान्त, लोकान्त आणि त्यात रंगलेला वेदांत म्हणजे वारी होय. भगवंत एकच आहे. त्या एका भगवंताच्या ठिकाणी स्वत:च्या ‘मी’पणाचा अंत करणे म्हणजे एकान्त होय. अरण्यात जाणे म्हणजे एकान्त नव्हे. लौकिक लोकजीवनात स्वत:ला विसरणे हा लोकान्त ती तर ‘मी’पणा जाणे हाच वेदान्त. तो कृतीत उतरायचा असेल तर संतखेळात रमायला हवे. तुकोबाराय वर्णन करतात-

खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान केले पावटणी
एक एका लागती पायी रे।

वैष्णवांनी वाळवंटात देवाशी ऐक्यभावाचा खेळ मांडला, क्रोध, अभिमान, जातभेद यांना पायाखाली घालून ते नाचत नाचत खेळू लागले. जीव, शिव दोघेही खेळात रमले. परमात्म्याच्या महाद्वारात जीवा-शिवाची फुगडी रंगली. संतांची फुगडीवर रूपके फारच लोकप्रिय आहे. नाथमहाराज सांगतात

फु फु फु फु फुगडी ये।
दोघी घालू झगडी ये विटेवरील पाऊल येऊ ये।
राही माझ्या हृदयी गे जेथे वैष्णवांचा भार गे।
तेथे घालीन फुगडी गे।

वैष्णवांचा नामघोष हे विठ्ठलाचे महाद्वार, त्या महाद्वारात भाव आणि भक्ती दोघीजणी फुगडी घालतात आणि ऐक्यभावात रमतात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली या फुगडीच्या रूपकातून निजब्रह्म आणि परमब्रह्म यांनाच एकमेकांच्या हातात हात घालून खेळायला लावतात.

फुगडी फू गे बाई फुगडी फू।
निजब्रह्म तू गे बाई परब्रह्म तू गे।।
ज्ञानदेवा गोडी।
केली संसारा फुगडी।।

जीव आणि शिव, प्रकृती आणि पुरुष, भाव आणि भक्ती, कर्म आणि धर्म, प्रपंच आणि परमार्थ यांनी हातात हात घालून फुगडीचा खेळ खेळल्याशिवाय संसारात रंग भरेल कसा?
वारकऱ्यांची खूण सांगणाच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ‘गाथा’ आणि ‘माथा.’ अभंग गात गात वाटचाल करताना वारकरीच अभंगरूप होतो. अभंग गाणे आणि ‘अभंग होणे’ हेच वारकऱ्यांचे वैशिष्ट्ये ज्ञानेश्वरमाऊलींपासून निळोबारायांपर्यंत संतपरंपरेने आपल्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीसाठी अभंगाचेच माध्यम वापरले. मराठी संतांनी आपला परमार्थ विचार ओवीतून मांडला तर आपला परमार्थानुभव मात्र अभंगातून व्यक्त केला. अभंग म्हणजे वारकऱ्यांचे वेदउपनिषदे होय. वारीच्या वाटेवर अभंग गात गात भजन म्हणत चालण्याची परंपरा आहे. हे भजन म्हणण्यातली शिस्त आहे. प्रत्येक फडावरच्या भजन मालिकेच्या क्रमाप्रमाणे अभंग म्हटले जातात. भजनी मालिका म्हणजे सकलसंतांच्या निवडक अभंगांचे संकलन होय. विणेकऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून मंगलाचरण, काकडआरतीचे अभंग, भुपाळ्या, वासुदेव, आंधळे-पांगळे जोगीं, बाळघडे गौळणी, नाटाचे अभंग, वाराचे अभंग, हरिपाठाचे अभंग असे म्हणत म्हणत संध्याकाळच्या मुक्कामी वारी पोचते. आणि भजनाच्या माध्यमातून अखंड वाग्यज्ञ करीत पंढरपुरी येते. या वाग्यज्ञाचा प्रसाद म्हणजे पांडुरंगाचे दर्शन, पांडुरंगाचे दर्शन घेताना वारकरी एवढेच मागतो-

हेचि व्हावी माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास।
पंढरीचा वारकरी।
वारी चुको नेदो हरी। 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link