Next
नाट्यमय घटनांचं वर्ष
डॉ. अभिजित फडणीस
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story

बरोबर वर्षापूर्वी ‘झी मराठी दिशा’च्या पहिल्या अंकात पहिल्याच पानावर बिटकॉइनबद्दल सावध करणारा माझा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी बिटकॉइनची किंमत ११,००० डॉलर होती, ती आता घसरून ४,००० डॉलर एवढी खाली आहे. २०१८चं वर्ष हे कमालीच्या चढउतारांचं, अकल्पित घटनांचं आणि अनिश्चिततेचं गेलं.
वर्षाची सुरुवातच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी काही वस्तूंवर वाढीव आयात कर लावण्याच्या घोषणेनं झाली आणि त्यानंतर त्यांनी चीनविरुद्ध जणू आर्थिक युद्धच पुकारलं. त्यांनी घोषणा करावी आणि चीननं प्रत्युत्तर द्यावं, अशी चढाओढच सुरू झाली. अर्थात याचा फटका हा अमेरिकेपेक्षा चीनला अधिक बसणार हा ट्रम्प यांचा होरा खूप चुकीचा होता असं म्हणता येणार नाही. प्रचंड उत्पादनक्षमता निर्माण केलेल्या चीनला बेकारी आणि त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या सामाजिक अस्वस्थतेची काळजी खूप करावी लागते आणि त्यातच प्रचंड वाढलेल्या आंतरिक कर्जामुळे चीन नक्कीच कात्रीत सापडला. त्यातच वन बेल्ट वन रोड या चीनच्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजनेला भारत सुरुंग लावण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाला.
पायाभूत साधनं उभारण्याच्या नावाखाली चीन नवा आर्थिक वसाहतवाद निर्माण करतो आहे याची जाणीव अनेक देशांत होऊ लागली आणि सावकारी व्याजानं चीन कर्ज देतो आहे हे उशिरा का होईना अनेक देशांच्या लक्षात आलं. त्यामुळे भारताला नवीन संधी निर्माण झाल्या. आफ्रिकेमध्ये भारतानं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून पायाभूत साधनं उभी करण्यासाठी मदत केली पाहिजे हे वातावरण हळूहळू निर्माण होतं आहे. २०१८ चं वर्ष हे सक्षम वृद्धीचं असणार यामुळे २०१५च्या अखेरीला ३० डॉलरहून खाली आलेलं तेल २०१८ मध्ये ८० डॉलरला धडक देऊ लागलं. ऑक्टोबर २०१८पर्यंत तर तेलभाव ८५ डॉलरवर पोहोचले. अमेरिकेनं इराणवर घातलेले निर्बंध नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होणार होते आणि त्या भीतीमुळे हे भाव कडाडले होते. ट्रम्प महाशयांनी काही राष्ट्रांनी इराणकडून तेल आयात करण्यावरचे निर्बंध शिथिल केले आणि तेलाची किंमत वेगानं घसरू लागली. त्यातच अमेरिका आणि चीन यांच्या भांडणामुळे अमेरिकेच्या, चीनच्या आणि जगाच्या वृद्धीचा दर २०१९ मध्ये घसरेल या भीतीनं त्या घसरणीत आणखी भर पडली.
लिबिया आपले तेलउत्पादन वाढवते आहे ही बातमी आली. ओपेक राष्ट्रांची एकी किती टिकेल याबद्दल साशंकता निर्माण झाली. ही घसरण अर्थातच भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. २०१८ मध्ये फेडरल रिझर्व्ह वाढवत असलेल्या व्याजदरामुळे भारतासह अनेक विकसनशील अर्थव्यवस्थांची चलनं घसरू लागली होती. वाढलेल्या तेलाच्या भावांमुळे, परकीय गुंतवणूकदार सातत्यानं पैसे काढून घेत असल्यामुळे आणि भारतात आय.एल.एफ.एस. प्रकरणामुळे जी अशाश्वती निर्माण झाली त्या सर्वांमुळे भारताचं चलन अधिक वेगानं घसरलं, त्यानं ७४ रुपयांना भोज्जा केला. मात्र तेलभाव पडू लागल्यावर रुपया वधारू लागला आणि केवळ रुपयांचं नाही तर भारतात कर्जरोखे आणि समभाग या दोघांचं प्रचंड घसरलेलं मूल्य हळूहळू सावरू लागलं. त्यात नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांबद्दल काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे अल्पमुदतीच्या बाजारातील तरलता आटली होती, त्यात काहीशी स्थिरता येते आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यामध्ये असलेल्या तणावाचं आणि त्याचबरोबर सामंजस्याचं दर्शन सर्वांना झालं. स्वायत्तता आणि उत्तरदायित्व यातील ताळमेळ किती महत्त्वाचा आहे हेच अधोरेखित झालं. या सर्व घडामोडी सुरू असतानादेखील भारत ही एक सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ही बिरुदावली मिरवीत होता. त्यातच धंदा करण्याची सुलभता आणि विजेची उपलब्धता अशा बाबतीतील जागतिक क्रमवारीत याच वर्षांत मोठी झेप घेतली आणि एक आशादायी चित्र उभं केलं. जीएसटीदेखील लोकांच्या आता अंगवळणी पडू लागला आहे आणि त्यात होणारी चोरीदेखील आता पकडली जाऊ लागली आहे. करदात्यांची संख्या वेगानं वाढतं आहे. त्यामुळे पायाभूत साधनांच्या उभारणीमध्ये वेग वाढतो आहे. जलवाहतुकीला परत एकदा प्राधान्य मिळू लागलं आहे. स्वच्छ भारत योजनेमुळे पर्यटन वाढतं आहे, विमानवाहतुकीचे आकडे उच्चांक गाठत आहेत. पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आर्थिक जाळं सर्वदूर पसरत चाललं आहे.
एका नव्या भारताच्या टप्प्यावर आपण सारे उभे आहोत. तरुणाई नवनव्या स्टार्टअप्सच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेत आहे.  काही राज्यांच्या आणि नंतर लोकसभेच्या निवडणुका आता आपल्यासमोर आहेत. मतदार सुज्ञपणे आपला मताधिकार वापरून देशाला बलशाली करणाऱ्या पक्षाच्या झोळीत आपली मतं टाकतील आणि भारताचा प्रगतीचा वेग अधिक वाढवायला मदत करतील, ही आशा करायला हरकत नाही. राजकीय इच्छाशक्ती आणि दूरगामी सर्वंकष विचारसरणी हीच भारताला नव्या प्रगतिपथावर नेणार आहे. भारतीय मतदार अतिशय सुज्ञ आहे आणि भारताच्या पुढच्या पिढ्यांच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे समजण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांच्या योगदानातून भारत एक नवी उंची लवकरच गाठेल या आशावादासह गेल्या वर्षभर लिहीत असलेल्या या स्तंभातून आपली रजा घेतो. खूप धन्यवाद!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link