Next
विजयी धडाका सुरूच!
भूषण करंदीकर
Friday, February 01 | 03:00 PM
15 0 0
Share this story

भारतीय क्रिकेटसंघाची विजयी घोडदौड न्यूझीलंडमध्येही सुरूच आहे. एकदिवसीय क्रिकेटची मालिका खिशात टाकल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. खरं तर भारतीय संघासाठी इतक्या कमी वेळात न्यूझीलंडच्या वातावरणाशी जुळवून घेत खेळायचं होतं. सुरुवातीला थोडी धाकधूक होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश जवळ असले तरी दोन्ही देशांच्या वातावरणात कमालीचा फरक आहे. याच बदलांशी जुळवून घेत भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती.
एकदिवसीय मालिका सुरू झाली आणि पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवलं. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीचा सामना करत करता न्यूझीलंडचे फलंदाज थकत होते. यांच्या गोलंदाजीचं उत्तर न्यूझीलंडच्या फलंदाजांना अखेरपर्यंत सापडलंच नाही. त्यात करिअरमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणारा विराट कोहली एक अभेद्य भिंत बनून भारतीय संघाला आधार देतोय. त्याच्या प्रत्येक खेळीगणीक संघाचा आत्मविश्वास कमालीचा वाढतोय आणि हे इतर सर्वच क्रिकेटसंघांच्या दृष्टीनं धोकादायक आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या स्विंगला साथ देणाऱ्या असल्यानं इथे भारतीय फलंदाजीचा कस लागेल वगैरे वाटलं होतं. प्रत्यक्षात त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. ऑस्ट्रेलियादौऱ्यात ज्या आत्मविश्वासानं भारतीय संघ खेळला त्याच आत्मविश्वासानं या संघानं न्यूझीलंडच्या भूमीवर आपला जलवा दाखवला.
ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिकेत ०-१नं पिछाडीवर असलेला भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत ही मालिका जिंकतो हे अतिशय ऐतिहासिक होतं. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभूत करणं हाच खरं तरं ऐतिहासिक क्षण होता. एकदिवसीय मालिकेत भारताच्या माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर हा भारतीय संघाच्या दृष्टीनं अतिशय मोलाचा आहे. त्याच्यावर टीका करणाऱ्या सर्वांना त्यानं मालिकेतला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरून योग्य ते उत्तर दिलंच, शिवाय आपल्यात अजून किती क्रिकेट बाकी आहे याची झलकही दाखवली. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीनं त्याची ही कामगिरी आश्वासक म्हणावी लागेल. आगामी काळात भारतीय संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर येतोय त्यावेळी पुन्हा भारत विजयाचा प्रबळ दावेदार असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया हा जखमी शेर! काही करून या दौऱ्यावर त्यांना विजय मिळवायचा असेल. खुनशी ऑस्ट्रेलियन्स या दौऱ्यात त्यासाठी प्रयत्नशील असतील आणि त्यानंतर भारतीय संघ आणि तमाम क्रिकेटप्रेमींचं ज्याकडे लक्ष लागलंय त्या विश्वचषकस्पर्धेसाठी सायबांच्या देशात रवाना होईल.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या दौऱ्यात भारतीय संघानं जी स्वप्नवत कामगिरी केली, तशीच कामगिरी विश्वचषकस्पर्धेत या संघाकडून अपेक्षित आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट सध्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी निघून गेलाय, तर शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी नवीन चेहऱ्यांना संघात स्थान दिलं. विश्वचषकाआधी जे धोरण असायला हवं त्यानुसारच हे सगळं सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र यामध्येच आयपीएलची स्पर्धा होणार आहे हे विसरून चालणार नाही. मार्चमध्ये सुरू होणारी आयपीएल आपल्या संघातील जवळपास सर्वच क्रिकेटपटू खेळतील. या स्पर्धेत दुखापतींची शक्यता लक्षात घेता भारतीय क्रिकेटपटूंनी जरा जास्तच काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या सुरू असणाऱ्या या स्वप्नवत प्रवासाला दुखापतींचं ग्रहण न लागो हीच इच्छा!
आता सर्वच आघाड्यांवर जबरदस्त दिसणाऱ्या संघात भारतीय गोलदाजांच्या कामगिरीचं विशेष कौतुक करावं लागलं. आजपर्यंतचा सर्वोत्तम गोलंदाजांचा ताफा आज भारताकडे आहे. त्यात वैविध्य आहे आणि भेदकपणाही!  तेव्हा आता गोलंदाजांच्या या परिश्रमाला फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीची जोड मिळाली तर विश्वचषक जिंकण्यापासून भारताला रोखण्याची सध्यातरी कोणत्याच संघात ताकद दिसत नाही.
विश्वचषकस्पर्धेत भारतीय संघाची मुख्य भिस्त असेल ती विराट, धोनी, रोहित, शिखर यांच्यावर. हार्दिक, जाडेजा यांच्या रूपात असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंकडून क्षमतेनुसार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. बुमराह, भुवी, शमी, उमेश यादव यांच्यात अंतिम ११मध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस असेल, तर चहल, कुलदीप, अश्विन यांच्या रूपानं परिपूर्ण असणारा फिरकी मारा आपल्या संघाची मोठी जमेची बाजू ठरणार आहे. भट्टी तर छान जमली आहे. बस्स आता प्रतीक्षा आहे विश्वचषकस्पर्धेची!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link