Next
थोरवी
अरुण घाडीगावकर
Friday, May 10 | 03:30 PM
15 0 0
Share this story


मुंबईबाहेरच्या कलाकारांसाठी मुंबई ही स्वप्ननगरी होती. कलाकारांसाठी मुंबई हे स्वप्नपूर्तीसाठी अखेरचं स्थानक होतं. स्वप्न उराशी घेऊन अनेक कलावंत मुंबईत दाखल होत. अशा कलाकारांसाठी सत्तरच्या दशकात दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं ‘रामनिवास लॉज’ हे अत्यंत सोयीचं ठिकाण होतं. १९७६-७७च्या सुमारास पुण्याहून मोहन गोखले आणि नाशिकहून उपेंद्र दाते हे याच ‘रामनिवास लॉज’मध्ये उतरले होते. वसंत कानेटकर यांचे ‘कस्तुरीमृग’ हे नाटक नाट्यनिर्माते मोहन तोंडवळकर हे आपल्या ‘कलावैभव’ या संस्थेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर आणत होते. प्रमुख कलावंतांची निवड आधीच झालेली होती. डॉ. श्रीराम लागू त्यातील चार महत्त्वाच्या भूमिका करणार होते आणि दिग्दर्शनही. ‘अंजनी’च्या मध्यवर्ती भूमिकेसाठी रोहिणी ओक (नंतरच्या हट्ट्ंगडी) यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. त्याही पुण्याच्या. ‘एनएसडी’चं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरचं त्यांचं हे व्यावसायिक पदार्पण होतं. याच नाटकातील तबलजी असणाऱ्या अंजनीच्या बालमित्राची भूमिका मोहन गोखले यांना दिली होती. कारण मोहन गोखले हे तबला उत्तम वाजवत. त्यासाठीच त्यांची निवड झाली होती. ‘कस्तुरीमृग’च्या तालमींसाठी मोहन गोखले मुंबईत आले होते.
उपेंद्र दाते यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’च्या कलाविभागानं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या वसंत कानेटकर यांच्या नाटकातील संभाजींच्या भूमिकेसाठी नाशिकहून बोलावून घेतलं होतं. छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका बाळ पवार करायचे. हंबीरराव मोहिते यांची भूमिका शिवाजी साटम तर मोहन कोठीवान अण्णाजी करायचे. या नाटकाच्या तालमींसाठी दाते मुंबईत आले होते. ‘कस्तुरीमृग’च्या तालमी दादरला, तर ‘रायगड..’च्या तालमी ग्रँट रोडच्या ‘गोवा हिंदू’च्या इमारतीमधील हॉलमध्ये व्हायच्या. तालमींच्या जागा वेगवेगळ्या असल्या तरीही गोखले आणि दाते ‘रामनिवास’मध्ये एकाच रूममध्ये ‘शेअरिंग बेसिस’वर राहत होते. ‘रामनिवास लॉज’ला प्रचंड मागणी असल्यानं ते बऱ्याचदा ‘फुल्ल’ असे. त्या रात्री, निळू फुले ‘रामनिवास’मध्ये आले, पण त्यांना काही रूम मिळू शकली नाही. म्हणून ते तिथून बाहेर पडत असतानाच त्यांना मोहन गोखले भेटले. दोघेही पुणेकर. परस्परांशी परिचित. त्यामुळे ‘संवाद’ सुरू झाला. निळूभाऊंची अडचण लक्षात येताच गोखले त्यांना म्हणाले, “ आमच्या रूममध्ये तीन कॉट्स आहेत. माझ्याबरोबर उपेंद्र दाते आहे. तुम्हाला चालत असेल, तर बघा...राहा आजची रात्र आमच्यासोबत. उद्या दुसरी व्यवस्था बघा... चालेल? ‘चालेल की...’ निळूभाऊंनी होकार दर्शवला. गोखले त्यांना त्यांच्या रूमवर घेऊन गेले. तिघेही समानधर्मी... मैफिलीतले. त्यामुळे त्यांचे ‘सूर’ जुळायला फारसा वेळ लागला नाही.
‘रामनिवास’च्या बाजूला ‘डिसिल्व्हा हायस्कूल’च्या शेजारच्या गल्लीत सामिष भोजनाच्या गाड्या लागायच्या. तिथलं मांसाहारी भोजन निळूभाऊंना फार प्रिय. त्या रात्री निळूभाऊंनी गोखले आणि दाते या दोघांनाही जेवू घातलं. अर्थात, तो सारा खर्च निळूभाऊंनी आपल्या खिशातून केला. एका रात्रीपुरता आसरा घ्यावा म्हणून गोखले यांची विनंती मान्य करणारे निळूभाऊ तीन-चार दिवस त्यांच्यासोबत राहिले आणि निघताना ‘रामनिवास’चं त्या चार दिवसांचं तिघांचंही भाडं भरून गेले.
निळूभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातच ‘चुंबकत्व’ होतं. त्यांच्या संपर्कात येणारी व्यक्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं भारली जायची. गोखले, दातेही त्यास अपवाद कसे असतील? त्या तीन दिवसांनी दोघंही ‘निळूमय’झाले होते. नंतर हा सिलसिला मुंबईत नेहमीच होत राहिला. मोहन गोखले यांचे नाटकाचे प्रयोग, चित्रपट अथवा दूरदर्शन मालिकांचं शूटिंग यासाठी मुंबईत त्यांचं सतत येणं व्हायचं. उपेंद्र दाते यांचे ‘अखेरचा सवाल’ या ‘गोवा हिंदू...’ निर्मित नाटकाचे प्रयोगही जोरात सुरू होते. दोघंही मुंबईत एकाचवेळी असले की ‘रामनिवास’मध्ये तीन कॉट्सची रूम बुक करीत... निळूभाऊंचं वास्तव्य गृहीत धरून...
उपेंद्र दाते हे मुंबईत एकटे असले की वास्तव्यास राहत नसत. त्यांनी नाशिक-मुंबई रेल्वेचा पास काढलेला असे. मोहन गोखले असले तरच मुंबईत मुक्काम, नसेल तर प्रयोग संपल्यावर नाशिकचा रस्ता... याच काळात उपेंद्र दाते यांची ‘धूम्रकांडी’शी मैत्र झालं होतं. त्यांना तिचा खूप ‘आधार’वाटे. मात्र तिनं द्यायचा तो दगा दिलाच. त्यामुळे दाते अस्वस्थ असत. त्यांची सतत चिडचिड व्हायची. मन:स्थिती उद्विग्न असे. अशा परिस्थितीत निळूभाऊंचा सहवास लाभला की दाते यांना हिमालयाची शीतलता लाभे. निळूभाऊ आलेत, असं समजलं की त्यांचे ‘राष्ट्र सेवा दला’तील सहकारी, समविचारी माणसं त्यांना भेटायला येत. त्यांच्या गप्पांना ऊत येईल. मैफलही रंगे. मग त्या सहकाऱ्यांसह दाते, गोखले यांना निळूभाऊ जेवायला घेऊन जात.
रूमवर परतल्यावरही बराच वेळ गप्पांचा फड रंगू लागे. वक्ते अर्थातच निळूभाऊच आणि हे दोघं श्रोते. दाते यांची अवस्था विमनस्क असल्याचं चाणाक्ष निळूभाऊंनी ओळखलं. गप्पांचा ओघ सुरू ठेवत त्यांनी आपली खुर्ची दाते यांच्या  पलंगापाशी आणली. त्रासलेल्या चेहऱ्याच्या उद्विग्न झालेल्या दाते यांचं डोकं चेपत निळूभाऊंनी धीर देण्याच्या हेतूनं विचारलं, ‘काय झालंय? का इतकी चिडचिड करताय?’ दाते यांच्या मस्तकी निळूभाऊंचा झालेला तो मायेचा स्पर्श आणि आपुलकीच्या शब्दांनी असहाय्य झालेल्या दाते यांचा बांध फुटला. आपल्या अस्वस्थतेचं कारण त्यांनी सांगितलं. ‘मी ‘रायगड..’मध्ये संभाजी करतोय, पण संवाद म्हणताना माझा श्वास पुरत नाही. तो मध्येच कुठंतरी रोखला जातो. संवाद आणि त्यामुळे माझी भूमिकाही प्रभावी होत नाही.’
दाते बोलत असताना निळूभाऊ त्यांचं कपाळ चेपून देत होते. ‘मला पोक येतं हे संभाजीच्या भूमिकेसाठी योग्य नाही... म्हणून माझी चिडचिड होते.’ दाते यांचं हे सारं बोलणं शांतपणे ऐकत निळूभाऊंनी त्यांचे पायही चेपायला सुरुवात केली. ‘अहो, हे काय करताय निळूभाऊ?’ पाय मागे खेचत उपेंद्र दाते म्हणाले. तेव्हा निळूभाऊ म्हणाले, ‘उपेंद्रभय्या... तुम्ही शांत पडून राहा. होईल सगळं ठीक.’ निळूभाऊंच्या धीराच्या बोलानं दाते यांचे मन शांत व्हायचं आणि स्पर्शानं शारीरिक थकवा दूर व्हायचा.
दाते यांना श्वासनलिकेचा ट्युमर झाला होता. संवादाच्या वेळी तो श्वासनलिकेवर दाब आणायचा. त्यांचा श्वास रोखायचा. हा त्रास शस्त्रक्रियेनंतर दूर झाला. परंतु या काळात दाते यांना मानिसक उभारी दिली ती निळूभाऊंनी. कलावंताची व्यथा कलावंतालाच जाणवते. निळूभाऊ आपलं श्रेष्ठत्व, ज्येष्ठत्व, नावलौकिक, वलय... सारं रूमवरच्या खुंटीला टांगून ठेवत आणि रूममेट्सशी माणुसकीच्या नात्यानं वागत. त्यांच्यावरील संस्कारानं ते त्यांचे पाय नेहमीच मातीशी घट्ट नातं ठेवून राहिले, म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व आभाळभर पसरलं...
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link