Next
आत्मानंदी वारी
डॉ. आरती दातार
Friday, July 05 | 01:15 PM
15 0 0
Share this story


वारकरीपरंपरा महाराष्ट्रात प्राचीन काळापासून आहे. आद्य शंकाराचार्यांच्या काळात वारीचे उल्लेख आहेत. शंकराचार्यांचं ‘पांडुरंगाष्टकम’ हे जे प्रसिद्ध अष्टक आहे, त्यात त्यांनी पंढरपूरला महायोगपीठ असं म्हटलं आहे. यावरून फार पूर्वीपासून महाराष्ट्रात वारीची कल्पना रुजली होती, याची साक्ष पटते. श्रीज्ञानेश्वरमाऊलींचे पणजोबाही नित्य वारी करत असत. ज्ञानेश्वरमाऊली अत्यंत आनंदानं व अभिमानानं असं म्हणते की-

माझ्या जिवीची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी।।


नाथपंथातसुद्धा पंढरपूरच्या व वारीच्या काही खुणा सापडतात.
आजच्या विज्ञानयुगातही असंख्य भाविकांना पंढरीला जाण्याची ओढ वाटते. डोळे भरून त्या विठुरायाचं दर्शन घेऊन त्याला अंतरंगीच्या गाभाऱ्यात साठवून ठेवावंसं वाटतं. शतकानुशतकं लाखो भाविकांच्या मनात विठुरायाच्या भेटीची आत्यंतिक ओढ निर्माण करण्याचं श्रेय, महाराष्ट्राचे वेद असणाऱ्या संतांचं व त्यांच्या साहित्याचं आहे. आपल्या वैभवशाली संस्कृतीचा कळस असणाऱ्या पंढरपूरच्या वारीचं माहात्म्य सातासमुद्रापलीकडे जाऊन पोचलं आहे. पश्चिम जर्मनीच्या हायेलबर्गचा पीएच.डी.चा विद्यार्थी मायकेल मार्टिनस पंढरपूरच्या वारीत झपाटला गेला,  हे ‘दी कल्ट ऑफ विठोबा’ या ग्रंथातून प्रसिद्ध झालं.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेलं श्रीक्षेत्र पंढरपूर याची नोंद वर्ल्ड बुकमध्ये झाली आहे. मराठी मनासाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट अशी, की पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचं नाव गिनिज बुकमध्ये विराजमान झालं आहे. Most visited place in a day- हा दिवस म्हणजे पंढरपूरची आषाढीची वारी!
पंढरपूर हे त्रिभुवनातलं अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे. वैकुंठाच्या अगोदर पंढरपूरची रचना ब्रह्मदेवानं केली अशी संतांची श्रद्धा आहे. ‘आधी रचिली पंढरी। मग वैकुंठनगरी।’ या श्रद्धेमुळे संत विठुरायाला सांगतात की-

वैकुंठासि आम्हा नको धाडू हरी।
वास दे पंढरी सर्वकाळ।।


भक्तराज नामदेव पंढरीचं महत्त्व गाताना म्हणतात,

सुखालागी जरि करिसी तळमळ।
तरी तू एक पंढरीसी जाय एक वेळ।।
मग तू अवघाचि सुखरूप होशी।
जन्मोजन्मीचे दु:ख विसरती।।

पंढरी हे अनंत तीर्थांचं माहेर आहे. या पंढरीत प्रत्यक्ष परब्रह्माची भेट होते. या पंढरीचा व पंढरीरायाचा महिमा मोठ्या प्रेमानं संतांनी गायला आहे.

अवघी ही पंढरी सुखाची ओवरी।
अवघा हा विठ्ठल सुखाची कैवारी।।


‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी। प्रत्यक्ष चक्रपाणी उभा दिसे।’ याची साक्ष पटलेला चोखामेळा पंढरीचा वारकरी आहे. पंढरीची वारी करणारा तो वारकरी. या वारीसाठी कुणी कुणाला आमंत्रण देत नाही. एका आंतरिक ओढीनं, विठुरायाच्या भेटीसाठी लाखो भाविक ऐक्याच्या भावनेनं, वारीत स्वत:ला विसरतात. वारकरी संप्रदाय प्रापंचिकांचा आहे. परमार्थासाठी प्रपंच हा अडथळा नाही तर प्रपंच ही परमार्थाची शाळा आहे. प्रपंच-परमार्थसंपन्न करण्याचा संदेश वारी देते. वारी हा प्रापंचिकाचा आनंदोत्सव आहे. ‘वाट धरिता पंढरीची। चिंता हरे संसाराची।’ हा वारकऱ्यांचा अनुभव आहे. वारी म्हणजे संतांच्या सहवासात पंढरीरायाच्या भेटीला जाण्याचा संस्कारक्षम सोहळा आहे.
वारकऱ्यांना वारीचं अलौकिक प्रेम असतं. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीत तो स्वत:ला विसरतो. पंढरीरायाकडे त्याला स्वत:साठी काहीही मागायचं नसतं.

संपत्ती सोहळा नावडे मनाला।
लागला टकला पंढरीचा।।
जावे पंढरीसी आवडे मनाला।
कधी एकादशी आषाढी हे।।
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी।
त्याची चक्रपाणी वाट पाहे।।


‘मुखी नाम व हाती काम’ अशी श्रद्धा असलेल्या वारकऱ्यांना आपल्या कामातच देव भेटतो.

कांदा मुळा भाजी।
अवघी विठाई माझी।

ही संत सावता माळी यांची श्रद्धा आहे. वारी म्हणजे वारकऱ्यांची नामस्मरणसाधना आहे.
विठुरायाच्या भक्ताला जशी त्याच्या भेटीची ओढ असते तशीच ओढ त्या भक्तीचं सर्वस्व असलेल्या विठुरायालाही असते. त्यामुळे विठुराया अत्यंत लडिवाळपणे आपल्या भक्तांना साद घालताना म्हणतो-

आषाढी कार्तिकी विसरू नका मज
सांगतसे गुज पांडुरंग।।

ही विठूची प्रेमळ हाक अंतरंगी साठवून जो वारी करतो तो खरा वारकरी. विठुरायावरील निरपेक्ष प्रेम, त्यासाठी केलेली वारी ही भक्त-भाविकांच्या जीवनातील एक सुंदर अनुभूती आहे. विठुरायाची भेट हे वारकऱ्यांचं अंतिम ध्येय आहे. त्यासाठी ‘पाऊले चालती। पंढरीची वाट।’ हा त्यांचा श्वास आहे. पंढरपूरची वारी जन्ममरणाची यातायत चुकवते.
वारी म्हणजे आत्मभेटीचा एक अपूर्व सोहळा! या वारीत आत्मज्ञानाची पहाट होते. ‘मला मी सापडलो’ हा अपूर्व आनंदाचा क्षण अनुभवता येतो. या क्षणानं-

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ति चारी साधियेल्या।।

हा अलौकिक आनंद मिळतो. अंतरंगीचा आवाज कानी पडतो. या आवाजाच्या दिशेनं वाटेवर पावलं पडायला लागली, की पांडुरंगाची गळामिठी पडते. वारीच्या या पवित्र वाटेवर मन तीर्थ होऊन जातं. ‘मी माझे ऐसा आठवचि नाही’ हा भाव नातं जोडणारा तो खरा वारकरी, असं गुरुवर्य सोनोपंत दांडेकर म्हणतात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली म्हणते-

काया वाचा जीवे सर्वस्वे उदार।
बापरखुमादेविवरू विठ्ठलाचा वारीकर।।


श्रीज्ञानेश्वरमाऊलींना बहिरंगापेक्षा अंतरंग साधन अपेक्षित आहे. माऊली स्वानुभावातून म्हणते-

अवघा डोळा तुज म्या पाहावे।
अवघा श्रवणी तुजची ऐकावे।।
अवघी मूर्ती तुजपे घ्यावे।
अवघा चरणी तुझ्या पंथी चालावे।।

पंढरीची वारी म्हणजे स्वानंदसुखाची प्राप्ती आहे. शारीरिक, मानसिक व वाचिक या तीन पातळ्यांवर वारी प्रत्येकानं एकदा तरी अनुभवायला हवी. वारी हा आध्यात्मिक प्रवास आहे. अंतर्बाह्य शुचिता व ईश्वरशरणता वारीत अनुभवता येते. आजकाल आपल्याला आपल्या आंतरिक सौंदर्याचा, संस्कारांचा विसर पडला आहे. पंढरीची वारी म्हणजे शाश्वत मूल्यांचं विद्यापीठ. ‘काय भुललासि वरलिया रंगा’ हे सत्य पटलं तरी निरोटीची उपासना करण्याची पद्धत रूढ होत आहे. ज्ञानेश्वरमाऊलींनी बहिरंगापेक्षा ‘आतली वारी’ अपेक्षित आहे.
पंढरीच्या वारीला जाताना आपल्या बहिरंगावर धारणा केलेल्या तुळशीमाळ, गोपीचंदनाचा टिळा व कुंकुमतिलक या गोष्टींचं अंतरंगाशी घनिष्ट नातं असतं. या गोष्टी आपल्या अंतरंगाशी संवाद साधतात.
बाह्यरंगावर धारण केलेली तुळशीमाळ म्हणजे लाडक्या विठुरायाच्या नावानं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र. भाळी गोपीचंदनाचा टिळा व बुक्का म्हणजे विठुरायाच्या नावानं रेखाटलेला सौभाग्यतिलक कुंकुमतिलक. वारकऱ्यांच्या खांद्यावर असलेली भगवी ध्वजा म्हणजे सदाचाराची आठवण देणारी सांस्कृतिक निशाणी.
आंतर्बाह्य विठुमय होऊन गेलेला पंढरीचा वारकरी म्हणजे मोक्षाचा मानकरी, असं जगद्गुरू तुकोबा म्हणतात. मोक्ष म्हणजे निरपेक्ष आनंदाचा स्वर्गीय ठेवा. मोक्ष म्हणजे मन निर्विषय होणं. मोक्ष हा आपल्या चित्ताचा धर्म आहे. मोक्ष आपल्या वागण्या-बोलण्या-चालण्यातून आहे. मोक्ष म्हणजे आत्मानंदाची प्राप्ती झालेल्या पंढरीच्या वारकऱ्याला अर्थपूर्ण जगण्याचा वसा मिळतो. आत्मानंदाची अनुभूती आलेला वारकरी विठ्ठलस्वरूप होऊन जातो.
पंढरीची वारी हा एक बहुरूपी आत्मानंदी खेळ आहे. दमलेल्या वारकऱ्यांना मनस्वीपणे खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे रिंगण! रिंगण पाहताना अक्षरश: डोळ्यांचं पारणं फिटतं. रिंगण हे वारीसोहळ्याचं फार मोठं आकर्षण आहे. हे रिंगण म्हणजे मनाभोवती घातलेलं आनंदाचा आवार आहे.

पंढरीच्या वाटे दिंड्या पताका लोळती।
देवा त्या विठ्ठलाचं साधू रिंगण लोळती।।


रिंगण म्हणजे गोलाकार खेळ. हे रिंगण सदाचाराचं, संस्कारांचं, साधुसंतांचं रिंगण आहे. एका बिंदूपासून निघायचं, गोलाकार फिरायचं आणि परत त्या बिंदूत मिसळायचं, म्हणजे ते रिंगण पूर्ण होतं. एका आत्मस्वरूपाच्या बिंदूपासून निघून, व्यापक अशा शिवस्वरूपाला वळसा घालून, पुन्हा मूळ आत्मस्वरूप आत्मानंदाजवळ विसावायचं म्हणजे जीवनाचं रिंगणाइतकं आपण व्यापक व्हायला हवं. ही जाणीव पंढरीच्या वारीतून मिळते. या व्यापक जाणिवेमुळे नीती, चांगुलपणा, देवत्व, सदाचार या शाश्वत मूल्यांच्या रिंगणात जीवनाचा खेळ रंगतो. जीवन सत्कारणी लावण्याचा स्वर्गीय आनंद मिळतो. कृतकृत्य जीवनाच्या आत्मानंदी रिंगणात असंख्यांना सामावून घेता येतं.
सामाजिक एकता, समानता, सहिष्णुता यांचं दर्शन वारीत सहजपणे घडतं. सामान्य माणसांनी प्रपंच करून परमार्थ कसा साधावा याचं प्रात्यक्षिक म्हणजे पंढरीची वारी. वारी म्हणजे व्यक्ती व समाज यांचा समतोल राखणारं मूल्यशिक्षणाचं मुक्त विद्यापीठ!
अशा या आत्मानंदी वारीचा अनुभव प्रत्येक मराठी मनानं एकदा तरी घ्यावा.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link