Next
बॅडमिंटनमध्ये ‘सिंधू’युग
अमित मधुकर डोंगरे
Friday, August 30 | 03:30 PM
15 0 0
Share this story

भारताची अव्वल खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने स्वित्झर्लंडच्या बासेलमधील जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी १९८३ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी कांस्यपदक मिळवून जागतिक बॅडमिंटनस्पर्धेत भारताचे खाते उघडले होते. सुवर्णयुग उगवायला यापुढे तब्बल ३६ वर्षे जावी लागली.
जपानची माजी जगज्जेती नोझोमी ओकुहारा हिला अवघ्या ३८ मिनिटांत सरळ दोन गेममध्ये २१-७ आणि २१-७ अशी धूळ चारून दोन वर्षांपासून हुलकावणी देत असलेल्या जगज्जेतेपदावर दावा सांगितला. गेल्या दोन वर्षांपासून सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागत होते. यावेळी तिने ओकुहाराला तगडे आव्हान देऊन अपयशाची परंपरा मोडीत काढली. तिने ओकुहाराला क्रॉस कोर्ट, सर्व्हिस तसेच रॅलीवर असे जखडून ठेवले, की सिंधूच्या कोणत्याही फटक्याला तिच्याकडे उत्तर नव्हते. या सामन्यातील पहिलाच शॉट तब्बल २२ रॅलीजचा झाला, त्याचवेळी सिंधूच्या खेळातील वर्चस्व स्पष्ट दिसत होते. पहिल्या गेममध्ये सिंधूने सलग आठ गुणांची कमाई केली, तसेच ही आघाडी १६-२ अशी वाढवली, दुसऱ्या गेममध्येही सिंधूने ९-२ असे वर्चस्व मिळवले होते. खरे तर तेव्हाच ओकुहाराचा पराभव होणार हे स्पष्ट होऊ लागले होते. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु सिंधूसमोर तिची मात्रा चालली नाही आणि सिंधूने हा सामना एकहाती जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले.
जागतिक बॅडमिंटनस्पर्धेत विजयी होत सिंधूने चीनच्या झँग निंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. निंगप्रमाणेच आता सिंधूच्या खात्यात पाच जागतिक पदके आहेत. इतकेच नाही तर सिंधूने महिला एकेरीची सगळी पदके मिळवण्याचाही पराक्रम केला आहे. तिने एक सुवर्ण आणि दोन रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. २४ वर्षांच्या सिंधूने देशभगिनी साईना नेहवाल या ‘फुलराणी’लाही मागे टाकत स्वत:चा दबदबा प्रस्थापित केला आहे. जपान व चीनचे बॅडमिंटनपटू प्रत्येक सामन्यात रॅलीजवर जास्तीत जास्त भर देतात. याच गोष्टीचा अभ्यास करून सिंधूने तिच्या खेळाचे नियोजन केले. सिंधूच्या आधी प्रकाश पदुकोण, साईना नेहवाल आणि बी. साईप्रणीत यांनीही या स्पर्धेत पदके जिंकण्याची किमया केली आहे. चार दशकांपासून असलेली जागतिक पदकाची अपेक्षा यावेळी सिंधूने पूर्ण केली व ती देशाची नवी सोनपरी बनली.
सिंधूने ही कामगिरी रविवारी (२५ ऑगस्ट) केली त्याच दिवशी तिच्या आईचा वाढदिवस होता. एका अर्थी तिचे जगज्जेतेपद ही आईला दिलेली सर्वोत्तम गिफ्ट ठरले आहे. यंदाच्या मोसमात सिंधूने खेळलेल्या २८ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १९ विजय अशी सरस कामगिरी केली आहे. खरे तर यावेळीही तिच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न विचारले जात होते, मात्र सिंधूने या कोणत्याही गोष्टीचे दडपण न घेता खेळ केला व भारतीय बॅडमिंटनचाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या.
भूतकाळावर नजर टाकली तर चीन, इंडोनेशिया, कोरिया  आणि जपान या देशांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनवर सातत्याने मक्तेदारी राहिलेली दिसते, मात्र आधी साईनाने व पुढे सिंधूने त्यांची ही मक्तेदारी मोडून काढली व भारताचा दबदबा निर्माण केला. भारताचे ऑल इंग्लंड विजेते खेळाडू व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे सराव करायला लागल्यापासून सिंधूच्या खेळात कमालीची सुधारणा झाली. साईनाप्रमाणेच तिने आपल्या खेळाला नवी उंची दिली. साईनापाठोपाठ सिंधूनेदेखील ऑलिंपिकपदक जिंकल्यापासून या खेळाला क्रिकेटप्रमाणेच प्रतिष्ठा प्राप्त झाली. पी. व्ही. म्हणजेच पुसरला व्यंकट सिंधू हिने सलग पाच वर्षे जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची केलेली कामगिरी अन्य कोणालाही जमलेली नाही. गेल्या मोसमात सिंधूचा खेळ तितकासा चांगला होत नव्हता, त्यावेळी तिच्या अपयशाचीदेखील जोरदार चर्चा सुरू झाली होती, परंतु ‘फॉर्म इज टेंपररी बट क्लास इज पर्मनंट’ हेच गमक सिद्ध करत सिंधूने तिच्या खेळाने टीकाकारांची तोंडे कायमची बंद केली आहेत.
क्रिकेटच्या बरोबरीने नसले तरी त्याच दर्जाचे ग्लॅमर बॅडमिंटनला आता भारतात मिळू लागले आहे. फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सिंधू तेराव्या स्थानावर आहे. तिची गेल्या मोसमातील कमाई ८.५ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. यावरून आपल्या देशात क्रिकेटव्यतिरिक्त खेळांनाही सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे. जागतिक विजेतेपदाचे सुवर्णपदक हा तर सिंधूने दाखवलेला ट्रेलर आहे, पूर्ण चित्रपट जपानमध्ये दाखवण्यासाठी सिंधू नावाची ही नवी फुलराणी सज्ज झाली आहे.

सिंधूची पदककमाई
* २०१३ – जागतिक बॅडमिंटनस्पर्धा – कांस्य
* २०१४ – जागतिक बॅडमिंटनस्पर्धा – कांस्य
* २०१४ – इंचेऑन एशियाड – कांस्य
* २०१४ – ग्लासगो राष्ट्रकुल - कांस्य
* २०१६ – रिओ ऑलिंपिक - रौप्य
* २०१७ – जागतिक बॅडमिंटनस्पर्धा – रौप्य
* २०१८ – जकार्ता एशियाड – रौप्य
* २०१८ – गोल्डकोस्ट राष्ट्रकुलस्पर्धा - रौप्य
* २०१८ – जागतिक बॅडमिंटनस्पर्धा – रौप्य
* २०१९ – जागतिक बॅडमिंटनस्पर्धा – सुवर्ण

जागतिक बॅडमिंटनमधील भारतीय मानकरी

* प्रकाश पदुकोण – १९८३ – कांस्यपदक
* साईना नेहवाल – २०१५ – रौप्यपदक
* साईना नेहवाल – २०१७ – कांस्यपदक
* बी. साईप्रणीत – २०१९ –  कांस्यपदक
* पी. व्ही. सिंधू – २०१९ – सुवर्णपदक

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link