‘दांडेकर दिंडी’बद्दल मिळाली उद्बोधक माहिती‘आवा चालली पंढरपुरा’ हा क्षमा दांडेकर यांचा ६ जुलैच्या अंकातील लेख अप्रतिम आहे. या लेखातून वारीची माहिती मिळाली. दांडेकर दाम्पत्याने सुरू केलेली ‘दांडेकर दिंडी’ तथाकथित ‘व्हाइटकॉलर्ड’ व कामात व्यस्त असणाऱ्यांना वारीचा अनुभव घेण्यासाठी उत्तम पर्याय आहे, हे हा लेख वाचून समजले. परंतु या लेखात क्षमा दांडेकरांशी संपर्क कसा साधायचा याचा काहीच उल्लेख नाही. कारण अशी माहिती मिळते तेव्हा आवर्जून त्या व्यक्तीशी संपर्क साधावा असे वाटते. हा संपूर्ण अंक अत्यंत वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे.
- कुंदा पित्रे, दादर (प.), मुंबई
--------------
शब्दकोडे थोडे सोपे असावे
वाचनीय मजकुराचा भरणा असलेले ‘झी मराठी दिशा’ हे प्रत्येक मराठी माणसाने जपून ठेवावे असे आठवडापत्र आहे. प्रकाशनाच्या पहिल्या अंकापासून मी या आठवपत्राचा वाचक आहे. यातील प्रत्येक अंकात सादर होणारा ‘विशेष विभाग’ मला खूप आवडतो. यात विशेष उल्लेख करावा लागेल ते क्रिकेट विश्वचषकस्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे पूर्वालोकन करणारा १५ जूनचा अंक आणि ६ जुलैचा ‘वारी पंढरीचा’ विशेषांक! या दोन्ही विशेषांकांतील सर्वच लेख अत्यंत सुंदर, साध्यासोप्या शब्दांत मांडलेले होते. त्यामुळे ते वाचनीय झालेच, शिवाय भारत-पाक क्रिकेट सामन्यांबाबतची सोमहर्षक माहितीही मिळाली; तसेच महाराष्ट्रातील विठ्ठलमंदिरे आणि दांडेकर दिंडीबद्दल नवीन माहिती समजली. ‘झी मराठी दिशा’चा प्रत्येक अंक उत्तम असतोच, तरीही एक सूचना करावीशी वाटते, की शब्दकोड्यातील काही शब्द हे फारच कठीण असतात. त्यामुळे हे शब्दकोडे थोडे सोपे करावे. यापुढेही ‘झी मराठी दिशा’मधून विविध विषयांना वाहिलेले विशेष विभागाचे अंक वाचायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.
- निळकंठ चिपकर, मुंबई
--------------
आजची बचत, उद्याची गुंतवणूक!
दिलीप नेर्लीकर यांचा २२ जूनच्या अंकातील ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा लेख अप्रतिम होता. या लेखातून वीजबचतीचे महत्त्व नेर्लीकर यांनी स्पष्ट केले आहे. आधुनिक काळात वाढत्या लोकसंख्येला वीज, पाणी आणि इतर आवश्यक गोष्टी मुबलक प्रमाणात मिळणे अवघड झाले आहे. या वर्षी तर पाणीटंचाईचा कहर होता. उपलब्ध साधनसंपत्ती काटकसरीने वापरणे हाच आता एकमेव पर्याय यासाठी लागू पडणार आहे. अगदी साध्यासोप्या उपायांनीही वीज, पाणी इत्यादींची बचत करता येणे शक्य आहे. फक्त त्यासाठी मनापासून इच्छा आणि भविष्यातील संकटाची जाणीव असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे सयुक्तिक ठरेल. अन्यथा येणारा भविष्यकाळ अधिकच कठीण असेल. ‘झी मराठी दिशा’मधून पर्यावरणाच्या संदर्भाने केले जाणारे मार्गदर्शन मोलाचे असते, हे या निमित्ताने येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
- अर्चना काळे, सातपूर कॉलनी, नाशिक