Next
बोलीभाषेचे वैभव
संपादक
Friday, December 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story

युनेस्कोने २०१९ हे वर्ष बोलीभाषावर्ष म्हणून घोषित केले आहे. बोलीभाषांना शहरी भाषांच्या आक्रमणापासून वाचविण्यासाठी व बोलीभाषांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी
          असा काही उपक्रम जागतिक पातळीवर हाती घेणे आवश्यक होते. सार्वत्रिक संपर्कासाठी प्रमाणभाषेची अनिवार्यता आहे, मात्र त्याचा अर्थ बोलीभाषांचे अस्तित्व निरर्थक आहे असा नव्हे. मुळात बोलीभाषांपासूनच प्रमाणभाषेची निर्मिती झाली आहे. अनेक बोलीभाषांमध्ये सारखे असलेले शब्द घेऊन ते प्रमाणभाषेत वापरले जातात. त्यामुळे प्रमाणभाषा व बोलीभाषा यांच्यात दुरावा असण्याचे काही कारण नाही. परंतु प्रमाणभाषा ही आर्थिक व्यवहाराचीही भाषा असल्यामुळे तिला आपोआपच वजन प्राप्त होते व त्याचा दबाव बोलीभाषांवर येतो. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात बोलीभाषा बोलणाऱ्यांची संख्याही कमी नसते. त्यामुळे त्यांचा आवाज त्यांच्या बोलीभाषेत ऐकला जाणे आवश्यक आहे. केवळ एकट्या मराठीचे उदाहरण घेतले तरी मराठी स्थळकाळानुसार बदलताना दिसते. मराठीची बोलीभाषा असलेल्या कोकणीभाषेचे उदाहरण घेतले, तरी ही भाषा मुंबईपासून मंगलोरपर्यंत सहा-सात प्रकारे बोलली जाते. मराठवाड्यातली मराठी तिथल्या सात जिल्ह्यांत चार-पाच प्रकारे बोलली जाते. या सर्व बोलींमध्ये एक अंगभूत सौंदर्य आहे. या बोली तिथल्या मातीचा सुगंध आणि मानवी स्वभावाचे कंगोरे घेऊन जन्माला आल्या आहेत. भाषेचे श्रेष्ठत्व ठरविण्याचा निकष म्हणजे त्या भाषेत असेलेले शब्दवैभव. मराठीतल्या बोलीभाषा या शब्दवैभवाने नटलेल्या आहेत. आज प्रमाणमराठीवर हिंदी व इंग्रजीचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण होत आहे. मराठीतले अनेक शब्द मागे पडून त्यांची जागा इंग्रजी किंवा हिंदी शब्द घेत आहेत व त्याचा मराठीसमाज अभिमान बाळगत आहे. मराठीतील प्रतिशब्द किंवा पारिभाषिक शब्द क्लिष्ट असतात असा आक्षेप घेतला जातो, तो खराही असू शकतो, पण त्यावर उपाय ‘सोपा मराठी शब्द’ निर्माण करणे हा आहे, इंग्रजी किंवा हिंदी शब्द स्वीकारणे हा नाही. असे प्रतिशब्द निर्माण करण्यासाठी बरेच भाषातज्ज्ञ संस्कृतभाषेचा आधार घेतात आणि त्यामुळेच बहुधा प्रतिशब्द दुर्बोध किंवा क्लिष्ट होत असावेत. पण संस्कृतऐवजी बोलीभाषेतून प्रतिशब्द घेतले तर मराठीचे मराठीपण टिकवणे अधिक सोपे होईल. आजकाल वापरात येणाऱ्या नव्या व आधुनिक साधनांना बोलीभाषांत अनेक चपखल शब्द वापरले जातात. ते स्वीकारणे व वापरणे याला गावंढळपणा मानण्याचे काही कारण नाही. मराठीत हिंदी किंवा इंग्रजी शब्द पर्याय म्हणून स्वीकारताना ते गावंढळासारखे स्वीकारले जातात. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘गर्व’ या शब्दाचा वापर. या शब्दाचा हिंदीतील अर्थ व मराठीतील अर्थ अगदी परस्परविरोधी आहे. पण लोक हिंदीतील अर्थाने मराठीत हा शब्द वापरतात. मराठीत ‘गर्वाचे घर खाली’ अशी म्हण आहे. तिचा अर्थ ‘गर्व करणाऱ्या माणसाचा विनाश अटळ आहे’ असा आहे. ज्या अर्थाने हा शब्द हिंदीत वापरला जातो, त्याला मराठीत ‘अभिमान’ असा शब्द आहे. गर्व, अभिमान, स्वाभिमान या शब्दांच्या भिन्न अर्थछटा मराठीत आहेत. त्या लक्षात घेऊन त्यांचा समर्पक वापर करण्याची सवय मराठीसमाजाने लावून घेतली नाही, तर मराठीचे हे भाषावैभव एके दिवशी लयाला जाईल आणि तिचे स्वरूप इंग्रजी किंवा हिंदीची गुलामभाषा असे होईल.  बोलीभाषांच्या या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी हे वर्ष बोलीभाषा वर्ष जाहीर करण्यात आले आहे व त्याला ‘झी मराठी दिशा’ने बोलीभाषा विशेष विभागात या विषयातल्या तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध करून साथ दिली आहे. मराठीवाचक त्यामुळे अधिक जागरूकतेने मराठीभाषेचा वापर करतील, अशी आशा आहे.                   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link