Next
वज्रलेपनकार
मितेश जोशी
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

मूळ मूर्तीचं रूप जराही न पालटवता तिला नवीन चकाकी देणं म्हणजेच मूर्तीचं वज्रलेपन करणं. या कामात स्त्रियांचा सहभाग दिसत नाही. या ताकदीच्या कामाला पुरुषी फौजच असते. असं असताना पुण्यातल्या तुळशीबागेत राहणाऱ्या स्वाती ओतारी यांनी वज्रलेपनक्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. अंगी नाना कला व घरचा उद्योगधंदा असूनही चाकोरीबाहेरचं क्षेत्र स्वाती ओतारी यांनी निवडलं आहे.
पिढीजात सोनारकीचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात स्वाती यांचा जन्म झाला. वडील दागिने बनवत असताना त्यांच्याजवळ बसून निरीक्षण करून त्या सोन्याचे आखीव-रेखीव दागिने घडवू लागल्या. हळूहळू त्यांचं कौशल्य हिऱ्यांच्या दागिन्यातसुद्धा दिसू लागलं. आईचं प्रोत्साहन मिळत असल्यानं करिअरचा सुरुवातीचा काही काळ त्यांनी दागिने घडवण्यात घालवला. दागिन्यांत रेखीवता ओतण्याचं कौशल्य त्यांना वडिलांकडून मिळालं. मुळात चित्रकलेची आवड असलेल्या, पण शाळेत चित्रकला हा विषय न शिकलेल्या स्वाती यांनी चित्रकलेचा जिथे जिथे वापर होतो, अशा सर्वच कला निरीक्षणातून, पुस्तकं चाळून, त्या कलेतल्या कलाकारांशी संवाद साधून आत्मसात केल्या. क्लासमध्ये जाऊन कोणतंही रीतसर शिक्षण, घरातल्या शिस्तबद्ध वातावरणामुळे घेऊ शकल्या नाहीत. परिस्थितीशी झगडण्याची जिद्द त्यांच्यात या दरम्यानच्या काळात निर्माण झाली.
वज्रलेपनासारख्या खडतर व आव्हानात्मक वाटेवर जायला एक योगायोग घडला. साधारण १८ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. देवभोळ्या स्वाती एके दिवशी आईसोबत पुण्यातल्या कालिकामंदिरात गेल्या होत्या. दर्शन घेत असताना त्यांच्या कलासक्त मनाला एक गोष्ट खटकली. मूर्तीच्या नाकात सतत जड नथ घातल्यामुळे त्या सुबक मूर्तीचं नाक तुटलं होतं. तसेच अनेक वर्षं पंचामृत अभिषेक पूजनानं त्या मूर्तीची झीजदेखील झाली होती. शेंदराचे लेप तिच्यावर चढवल्यानं मूळ मूर्तीचं रूपच नाहीसं झालं होतं. भग्न अवस्थेत येऊन पोहोचलेल्या त्या मूर्तीकडे पाहून त्यांचं मन हळहळलं. ‘हे सर्व नीट करून, मूर्तीला नवीन चकाकी देता येणार नाही का?’ असं त्यांच्या मनात आलं. त्यांनी तडक देवळातल्या भटजींची भेट घेऊन ‘मी ही मूर्ती पूर्ववत करते, मला संधी द्या,’ अशी विनवणी केली. त्या भटजींनी स्वाती यांना काम करण्याची समंती दिली आणि त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
‘हे मुलींचं काम आहे का?’, ‘या कामासाठी जिगरबाजाची लक्षणं अंगी हवीत,’ ‘शारीरिक शक्ती एकवटून ही कामं करावी लागतात’, वगैरे टोमणे स्वाती यांना सुरुवातीला ऐकावे लागले. परंतु त्यांच्या पाठीशी आई सावलीप्रमाणे उभी होती. कालिकादेवीच्या मूर्तीचं काम हाती घेण्याअगोदर स्वाती यांनी वज्रलेपनाचा कोणत्या विद्यापीठात अभ्यासक्रम आहे का, किंवा पुस्तकी ज्ञान देणारी पुस्तकं आहेत का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. वज्रलेपनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या कुणीही कोणाला शिकवत नाही. कुणीही त्या पद्धती लिहून ठेवलेल्या नाहीत. त्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आपल्या तंत्राची माहिती इतरांना सहजासहजी देत नाहीत. अतिशय वणवण करून अनेकांकडून ही माहिती काढण्याचा स्वाती यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. मग थोडेफार जे काही समजत गेले त्यावरूनच स्वतःच प्रयोग करून स्वतःचे ठोकताळे त्यांनी बांधले. सिरॅमिकच्या वस्तू बनवण्याच्या सरावामुळे एक अंतरदृष्टी त्यांना मिळाली होती. त्याचा उपयोग त्यांनी केला. वडिलांच्या परिचयातील एका मूर्तिकार काकांशी त्यांनी संवाद साधला व कालिकादेवीच्या मूर्तीचं वज्रलेपन सुरळीत पार पाडलं. या कामासाठी त्यांची आईसुद्धा पुढे आली. आज या मायलेकी एकत्र काम करतात. ‘स्वातीच्या हाताखाली मी काम करते, ती माझी बॉस आहे,’ असं स्वाती यांच्या आई गमतीत सांगतात.
वज्रलेपनाच्या कामाची माहिती देताना स्वाती सांगतात, “मूर्तीची जी गरज असते त्याप्रमाणे मी काम करते. काही मूर्तींच्या झीज झालेल्या भागाला किंवा संपूर्ण मूर्तीला वज्रलेप करणं. वर्षानुवर्षं मूर्तीवर शेंदराचे एकावर एक थर देऊन लेपन झालेलं असतं. त्यामुळे मूळ मूर्तीचं तेज, सौंदर्य झाकलं जातं. अशावेळी त्या शेंदराचे थर हळुवार हातांनी काढून तिला मूळ स्वरूप प्राप्त करून देणं. वज्रलेपनाचं काम मी दोन भागांत करते- एक, ज्यात कृत्रिम रसायनांचा वापर होतो आणि दुसरा, नैसर्गिक वनस्पतींचे रस-अर्क वापरून काम केलं जातं.”
मूर्ती घडवताना मूर्तिकार दगड हातापायात, हव्या त्या दिशेला धरू शकतो, वळवू शकतो. एकदा प्रतिष्ठापना झाली, की हे स्वातंत्र्य कारागिराला घेता येत नाही. मूर्तीवर संस्कार करताना कोणतंही हत्यार वापरता येत नाही. वज्रलेपनाच्या वेळी स्वाती यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचदा मूर्ती कोनाड्यात, गुहेत, भिंतींमध्ये स्थापित असते. मूर्ती थोड्या उंचीवर असतील तर जरा सोपं असतं, पण अगदी जमिनीलगत असेल तर काम करणं खूप अवघड जातं. कालिकादेवीच्या कामानंतर स्वाती यांच्याकडे खेडशिवापूरच्या विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीचं काम करण्याची विचारणा झाली. या देवालयात विजेची सोय नव्हती. ४०० वर्षांपूर्वीच्या या विठोबा-रखुमाईच्या मूर्तीचं काम त्यांनी बॅटरी व दिव्यांच्या प्रकाशात केलं.
शेंदूर लावलेला असतानाचं मूर्तीचं रूप आणि शेंदूर काढल्यानंतर स्वच्छ झालेल्या मूर्तीच्या रूपामध्ये काही वेळा फरक आढळतो. तुळशीबागेतील मारुतीला मिशा आहेत. हे त्या मूर्तीवरचा शेंदूर काढल्यानंतर कळलं. काही वर्षांपूर्वी स्वाती यांनी एक घरगुती रेणुकादेवीच्या गोट्याचं काम केलं. या गोट्यावर शेंदराचे थर चढवलेले होते. अथक कष्टानं हे थर काढले व त्यातून आंब्याच्या बाठ्याएवढा गोटा निघाला.
कालिकादेवीचं काम केल्यानंतर स्वाती यांचा आत्मविश्वास वाढला. आतापर्यंत त्यांनी तुळशीबागेतील पेशवेकालीन गणपती, पुण्यातील ओंकारेश्वर येथील शनी, मारुती व गणपती, शिवापूरचे विठ्ठल-रुक्मिणी, उस्मानाबाद येथील ९०० वर्ष जुनी महिषासुरमर्दिनी, मोरया गोसावी येथील गणपतीचे गोटे, लोणंद येथील गुरुपादुका या व अशा अनेक मूर्तींचं वज्रलेपन केलं आहे.
वज्रलेपनाच्या कलेमुळे स्वाती यांचं कौतुक करत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यात मिटकॉन उद्योजिका पुरस्कार, स्त्रीशक्ती पुरस्कार २००९, तनिष्क पुरस्कार २०१३ आदी पुरस्कारांचा आवर्जून उल्लेख करावा लागले. कोणत्याही विद्यापीठात वज्रलेपन शिकवलं जात नाही. या क्षेत्रात काम करायची इच्छा असलेल्यांना स्वाती हे ज्ञान देऊ इच्छितात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link