Next
कोण तुजसम?
सुरेश खरे
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this storyमहाविद्यालयात शिक्षण घेत असताना मी पहिलं संगीत नाटक पाहिलं ते ‘संगीत सौभद्र.’ त्या प्रयोगात कृष्णाच्या भूमिकेत संगीतभूषण राम मराठे होते, सुभद्रेच्या भूमिकेत होत्या हिराबाई बडोदेकर, अर्जुन होते कृष्णराव चोणकर तर मा. दामले नारद बनले होते. प्रयोग तुफान रंगला. शास्त्रीय संगीत मला समजत नसतानादेखील मला त्या नाटकातली गाणी आवडली. ‘सौभद्र’ नाटकानं माझ्यात संगीत नाटकांची आवड निर्माण केली. मी पॉकेटमनीतले पैसे वाचवून जमेल तशी संगीत नाटकं पाहू लागलो. काही दिवसांनी मी पाहिलेल्या ‘सौभद्र’च्या प्रयोगात छोटागंधर्व कृष्णाच्या भूमिकेत होते. ‘सौभद्र’ नाटकातली छोटागंधर्वांची गाणी ऐकून मी अक्षरशः वेडावून गेलो. इतकं सुमधुर गाणं मी यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. त्या स्वरराजानं माझ्यावर गारूड केलं. पुढे मुंबईत कुठेही, केव्हाही छोटागंधर्वांचं नाटक लागलं, की मी ते आवर्जून पाहत असे.

मी त्यांची ‘संशयकल्लोळ,’ ‘मृच्छकटिक’ ही नाटकं अनेकदा पाहिली, पण ‘सौभद्र’ ते ‘सौभद्र’च! त्यांची आणि माझी ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता. तो योग पुढे अनेक वर्षांनंतर जुळून आला. माझे रसिक मित्र यशवंत गोरे हे छोटागंधर्वांचे पंखा (फॅन) होते. एकदा ते गोरेंच्या घरी आले असताना गोरेंनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. छोटागंधर्वांना त्यांच्या परिवारात ‘दादा’ म्हणत असत. दादांच्या गाण्याप्रमाणे त्याचं बोलणंही गोड होतं. त्या परिचयाचं रूपांतर स्नेहात केव्हा झालं ते मला समजलं नाही. मी दादांची नाटकं आवर्जून पाहत होतो. आता मी त्यांना रंगपटात भेटायला लागलो. दादांना धूम्रपानाची आवड होती.
मी त्यांना एकदा विचारलं, “दादा, तुम्ही धूम्रपान करता, तुमच्या आवाजाला कधी त्रास नाही होत?”

“नाही त्रास होत. मी एकदा रंगमंचावर पाऊल टाकलं की रंगदेवता माझ्यावर प्रसन्न होते. आवाज तर कधीही लागतोच, पण तापानं फणफणलो असताना मी ‘सौभद्र’ केलं आहे.” दादा उत्तरले. दादांना परदेशी सिगारेट अतिशय आवडत असत. जेव्हा मी त्यांना भेटायला जात असे, तेव्हा प्रत्येक वेळी मी परदेशी ब्रँडचं सिगारेटचं पाकीट घेऊन जात असे. ते खूश होत.

‘सौभद्र’च्या एका प्रयोगाला मी माझ्या मुलीला, सोनियाला, बरोबर घेऊन गेलो होतो. प्रयोग सुरू होण्यापूर्वी मी त्यांना रंगपटात भेटायला गेलो. दादा संपूर्ण मेकअप करून कृष्णाच्या वेशभूषेत खुर्चीवर आरामात धूम्रपान करत बसले होते. कृष्णाला सिगारेट ओढताना पाहून सोनिया दचकली. ती त्यांच्याकडे एक टक पाहत होती. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मोठ्या बहिणीला सांगताना मी ऐकलं, “अग मिनी, तुला माहीत नाही. कृष्णसुद्धा आपल्या पापाजींसारखा सिगारेट ओढत असे.” मी कपाळाला हात लावला.
महाविद्यालयात शिकताना पिकनिकला किंवा माझ्या मित्रमंडळीत मी एक लावणी आवर्जून म्हणत असे. (तेवढं एकच गाणं मला चांगलं (?) म्हणता येत होतं) ती लावणी अशी होती,

सौंदर्याचा भरज्वानीचा बाग सखे तव फुलला।
नवनवतीच्या फळाफुलांनी बहर किती बघ आला।
नयन मनोहर पाहुनी वाटे फुलली कमळे निळी।
तीक्ष्ण नासिका जणु शोभे अन् चाफ्याची ग कळी।
गाल गुलाबी सफरचंद हे अवीट त्यांची गोडी।
ओठांची नाजुक ही ठेवण मोसंबीच्या फोडी।
व्यर्थची वाटे जुई मोगरा दंतपंक्तीच्या पुढे।
आम्रतुल्य कुच दोन्ही बघता जीव प्रेमाने कुढे।
तारुण्याचा बाग तुझा हा फळाफुलांनी भरला।
सांग सुंदरी या बागेचा कोण असे रखवाला।

या गाण्याची ध्वनिमुद्रिका छोटागंधर्वांची आहे, हे मला खूप उशिरा माहीत झालं. पुण्याला गेल्यावर माझी दादांकडे एक खेप ठरलेली असे. दादा हे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. चातुर्मास ते कडक रीतीनं पाळत असत. पूजाअर्चा, पठण, जपजाप्य पूर्ण झाल्याशिवाय ते कुणाला भेटत नसत. एकदा असाच भेटायला गेलो असताना मी, ‘सौंदर्याचा भर ज्वानीचा’ या त्यांनी गायलेल्या लावणीचा उल्लेख केला आणि कॉलेजात असताना मी ही लावणी म्हणत असे, हे वर सांगितलं. हा माझा आगाऊपणा नडला. दादांनी मला म्हणून दाखवायला सांगितलं. मला आता नीट आठवत नाही म्हणून मी सांगितलं. “आवडलेली असेल तर आठवायलाच पाहिजे, जेवढी आठवेल तेवढी म्हण.” असं त्यांनी म्हटल्यावर माझा नाइलाज झाला. मी धीर एकवटून पहिल्या चार ओळी कशाबशा म्हटल्या आणि संपूर्ण पाठ असताना पुढचं आठवत नाही, असं सांगितलं. . ‘तुम्हाला आठवतेय का?’ असं मी त्यांना विचारल्यावर दादांनी संपूर्ण लावणी म्हणून दाखवली.’ “तुम्हाला अजून कशी आठवते?” असं मी विचारल्यावर, “कारण ती मीच लिहिली आहे आणि संगीतही माझं आहे.” असं दादांनी सांगितल्यावर मी थक्क झालो. दादा आतून एक बाड घेऊन आले आणि माझ्याकडे दिलं. दादांनी केलेल्या साठ-सत्तर कविता त्यात होत्या. मी त्या कविता वाचल्या. अतिशय सुंदर आणि भावपूर्ण रचना होत्या. दादा एक चांगले कवी होते. त्या कवितांचं पुढे काय झालं ते मला माहीत नाही. दादांनी मला खूप सहवास दिला. माझ्या वाट्याला खूप आनंदाचे क्षण आले. आजही मी जेव्हा त्यांची ध्वनिमुद्रित गाणी ऐकतो तेव्हा त्या आनंदाचा पुनःप्रत्यय येतो. डोळ्यांसमोर त्यांची कृष्णाच्या वेषातली मिश्किल प्रतिमा उभी राहते. कानात स्वर घुमू लागतात, ‘कोण तुजसम सांग…’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link