Next
मोल्सवर्थचं मराठी भाषाप्रेम
निरंजन घाटे
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

महाराष्ट्रात ब्रिटिश येईपर्यंत मराठी कोशवाङ्मय अस्तित्वातच नव्हतं. सुरुवातीला मराठी पुस्तकं श्रीरामपूर (सेरामपूर) या बंगालमधील डॅनिश वसाहतीत छापली जात. याचं कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी संस्था होती. तिनं एक धोरणात्मक निर्णय घेतला होता, त्यानुसार कंपनीच्या ताब्यातील भारतीय प्रदेशात धार्मिक वाङ्मय छापण्यास बंदी होती. त्यामुळे मिशनरी मंडळी डेन्मार्कच्या ताब्यातील श्रीरामपूर इथे अनेक भारतीय भाषांमधील पुस्तकं छापून घेत असत. त्यासाठी त्यांनी तिथे शिळाप्रेस स्थापन करून वेगवेगळ्या भाषांमध्ये बायबलचे अनुवाद छापण्याची सोय केली होती. ज्यावेळी धार्मिक छपाईचं काम नसे त्यावेळी तिथे इतर पुस्तकं छापली जात असत.
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन गव्हर्नर बनल्यावर महाराष्ट्रात मराठी-देवनागरी लिपीतून ग्रंथछपाई सुरू झाली. ‘देवनागरी’ असं आवर्जून लिहायचं, कारण श्रीरामपूर इथे शिळाप्रेसवर छापलेले बरेच ग्रंथ मोडी लिपीत होते. विल्यम कॅरे यानं पहिला शब्दकोश ‘डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ इसवी सन १८१० मध्ये श्रीरामपूर इथे छापला. त्यातली मराठी अक्षरं मोडी लिपीत होती. हा मराठी-इंग्रजी कोश कलकत्ता येथील फोर्ट विल्यम महाविद्यालयातील विल्यम कॅरेच्याच भारतीय भाषा विभागातील पंडित वैजनाथ शास्त्री यांच्या साहाय्यानं लिहिलेला होता. इसवी सन १८२४ मध्ये मुंबईत आणखी एक शब्दकोश छापला गेला. त्याचं नाव ‘अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज.’ व्हॅन्स केनेडी यांचा हा कोश दोन भागांत होता. मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी असे त्याचे दोन भाग होते. दोन्ही भागांत मिळून सुमारे आठ हजार शब्द होते. त्यात धार्मिक चालीरीतीदर्शक शब्द आणि देवांची नावंसुद्धा समाविष्ट आहेत, असं ‘मराठी दोलामुद्रिते’ या सु. आ. गावसकर यांच्या ग्रंथात नमूद केलं आहे. मराठी दोलामुद्रितात १९६७ पर्यंतच्या सर्व उपलब्ध ग्रंथांची यादी आहेच, शिवाय त्यांपैकी कुठले ग्रंथ कुठे उपलब्ध आहेत, तेही त्यात दिलेलं आहे.
खऱ्या अर्थानं मराठी शब्दकोश म्हणजे १८२९ साली प्रसिद्ध झालेला शास्त्रीमंडळींचा कोश. या कोशावर कोश रचयिते म्हणून जगन्नाथशास्त्री जोशी क्रमवंत, बाळशास्त्री फडके, रामचंद्रशास्त्री जान्हवेकर, सखारामशास्त्री जोशी, दाजीशास्त्री शुक्ल, आणि परशुरामपंत गोडबोले यांची नावं असली तरी त्यामागे प्रेरणा जेम्स टी. मोल्सवर्थ या ब्रिटिश अधिकाऱ्याची होती. जेम्सचा जन्म १७९५ चा. तो वयाच्या सोळाव्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत दाखल झाला. ‘एन्साइन’ म्हणजे ‘शिकाऊ उमेदवार’ म्हणून त्याच्या सेवेची सुरुवात झाली. शिक्षण संपताच तो लेफ्टनंट या पदावर सैन्यात रुजू झाला. कंपनीच्या नियमानुसार त्या काळी अधिकाऱ्यांना दोन स्थानिक भाषा शिकाव्या लागत. त्यानं पर्शियन आणि संस्कृत या दोन (त्या काळातील) भारतीय भाषांच्या अभ्यासाला पसंती दिली, पण शिकतानाच त्यांचं मराठी या आव्हानात्मक भाषेवर प्रेम जडलं.
इसवी सन १८२४ मध्ये त्याची सोलापूर इथे लष्कराचा पुरवठा आणि परिवहन अधिकारी (कोमिसारि याट) म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. त्याचवेळी बढती मिळून तो सोलापूर इथे कॅप्टन म्हणून कार्यरत झाला. इथे त्याला अनुवाद साहाय्यक म्हणून कँडीबंधूंची साथ लाभली. ते जुळे भाऊ होते. टॉमस कँडीनं हेलिबरी कॉलेजमध्ये प्रा. इस्टविक यांच्याकडे मराठीचा अभ्यास केला. इसवी सन १८२२ मध्ये तो भारतात आला. मोल्सवर्थ मुंबईत असल्यापासूनच मराठी शब्दांचा संग्रह करू लागला होता. सोलापूरला गेल्यावर त्यानं गव्हर्नर एल्फिन्स्टन यांच्याकडे मराठीकोश रचण्याची त्याची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा त्यांनी त्याला सोलापूरला रवाना केलं. त्या दोघांनी आणि उपरोल्लेखित शास्त्रीमंडळींनी जिथे जिथे मराठी बोलली जाते, तिथून मराठी शब्द गोळा करायचे प्रयत्न केले. त्यासाठी लहान मुलं, वेगवेगळे बाजार आणि स्त्रियांकडूनही शब्द मिळवण्याचे प्रयत्न केले गेले.
आधीच्या शास्त्रीकोशाचं प्रकाशन १८२९ मध्ये झालं. त्यावर मोल्सवर्थचं नाव नाही. १८२५ मध्ये मोल्सवर्थला कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत येऊन कोश पुरे करावेत, असं सांगितलं. त्याच्यावरच्या इतर जबाबदाऱ्याही इतर अधिकाऱ्यांवर सोवण्यात आल्या. त्यामुळे कॅप्टन मोल्सवर्थ उत्साहानं कोशरचनेच्या कामाला लागला. त्याला साहाय्यक असलेल्या शास्त्रीमंडळींवर प्राचीन संस्कृतचा प्रभाव होता. संस्कृतमध्ये निघंटु, धातुपथ आणि गणपत असे कोश पाणिनीपूर्व काळात उपलब्ध होते. गणपथात शब्दांचे विषयवार वर्गीकरण करून त्यांचे त्या संदर्भातील अर्थ नमूद केलेले असत. निरुक्तामध्ये शब्द कसा अस्तित्वात आला आणि तो कशा पद्धतीनं वापरायला हवा, त्याच्या वेगवेगळ्या छटा कोणत्या याविषयी मार्गदर्शन असे. परंतु त्यात त्यानंतरच्या काळात कुठलीही सुधारणा झाली नव्हती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सर्व वारसा लिखित स्वरूपात फार कमी प्रमाणात उपलब्ध होता. गुरुकुलात त्याची संथा घोकून तो पारंपरिक पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना त्यात पाठभेद निर्माण होत होते. त्यानुसार मग त्या त्या निरुक्ताचे पाठक चिकटून बसत. दुसरीकडे हे सर्व कोश मौखिक पद्धतीनं जपताना सोपे जावेत यासाठी त्यांच्या रचनेत यमक जुळवण्याचा प्रयत्न कर्त्यांकडून केला जात असे. मोल्सवर्थला साहाय्य करण्यासाठी जी भारतीय मंडळी निवडली गेली त्यांच्यावर या सांस्कृतिक परंपरेचं ओझं होतं. याचा मोल्सवर्थला त्रास होत असे.
मोल्सवर्थ म्हणतो, “या ब्राह्मणांना कोशरचनेची प्राथमिक तत्त्वं मान्य नसावीत, असं काही वेळा वाटतं. त्यांच्या गळी ती कशी उतरवावीत, हे अनाकलनीय होऊन बसतं. जो शब्द रोजच्या व्यवहारात सतत आणि सहजगत्या वापरात आहेत, ते या मंडळींकडून काही वेळा नाकारले जातात, त्याच वेळी सूर्य आणि चंद्रासाठी असलेले संस्कृतमधील (अलंकारिक) अशक्य शब्द स्वीकारताना दिसतात.”
अठराशे एकोणतीसमध्ये शास्त्रीकोशाचं प्रकाशन झाल्यानंतर मोल्सवर्थ त्याच्या मूळ आवडत्या प्रकल्पाच्या मागे लागला. हा प्रकल्प म्हणजे मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी शब्दकोश. पाच वर्षं प्रचंड मेहनत करून त्याची दमछाक झाली असावी. त्याला मुंबईची हवा मानवत नव्हती म्हणून त्यानं त्याचा मुक्काम दक्षिण कोकणात हलवला. मोल्सवर्थ्स मराठी-इंग्रजी डिक्शनरी अखेरीस सहा वर्षांच्या परिश्रमानंतर १८३१ मध्ये प्रकाशित झाली.
आपला शब्दकोश कसा असावा, याबद्दल मोल्सवर्थच्या डोक्यातील योजना नि:संदिग्ध होती. रोजच्या व्यवहारात, तसंच सरकार दरबारी आणि न्यायालयाच्या कामात वापरले जाणारे जास्तीत जास्त शब्द आपल्या कोशात यावेत, अशी त्याची अपेक्षा होती. शिवछत्रपतींनी त्यांच्या दरबारात वापरण्यासाठी राजकोश तयार केला असला तरी त्यानंतरच्या काळात- विशेषत: शाहिरी वाङ्मयातून आणि बखरींमधून पुन्हा मराठीत अनेक फारसी (पर्शियन) आणि अरेबिक शब्द घुसले होते. त्या शब्दांचा या कोशात समावेश करण्यास शास्त्रीमंडळींचा विरोध होता. या आणि इतरही कोशांमध्ये कुठले शब्द घ्यावेत याबद्दलच्या वादाचा आणखी एक मुद्दा म्हणजे असंस्कृत, असभ्य, अशिष्ट, अर्वाच्य, अश्लील आणि ग्रामीण समजले जाणारे शब्दकोशात समाविष्ट करावेत किंवा नाही, विशेषत: ज्यांचा वापर शिव्या म्हणून केला जातो अशा शब्दांबद्दल वाद होणं साहजिकच होतं. एकीकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांना सर्व मराठी समाजात प्रचलित असलेली भाषा समजण्यात अडचण येऊ नये, यासाठी जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते तेथील शब्द गोळा करण्यासाठी धडपडणारा मोल्सवर्थ आणि दुसरीकडे त्यांची व्युत्पन्न ब्राह्मण म्हणून समाजात असलेल्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी धडपडणारी शास्त्रीमंडळी अशी ही रस्सीखेच होती. त्यात अखेरीस मोल्सवर्थचं म्हणणं शास्त्रीमंडळींना मान्य करावं लागलं.
मराठी-इंग्रजी शब्दकोश पूर्ण झाल्यावर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मोल्सवर्थ मायदेशी परतला. तोपर्यंत त्याच्या भाषाभ्यासाच्या झपाटलेपणानं भारावलेले शास्त्री, पंडित त्याला आधी मोलेसरशास्त्री आणि हळूहळू मोरेश्वरशास्त्री म्हणू लागले होते.
इंग्लंडला परतण्यापूर्वी त्यानं सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याला सन्मानपूर्वक निवृत्त करण्यात आलं. तोपर्यंत तो अतिशय आध्यात्मिक बनला होता. त्यामुळे त्यानं लष्करी हुद्दा, मानसन्मान आणि निवृत्तीवेतनावर पाणी सोडलं होतं. खरा ख्रिश्चन सैनिक असू शकत नाही, असं कारण त्यानं त्यासाठी दिलं होतं. इसवी सन १८४७ मध्ये मोल्सवर्थचं अपूर्ण राहिलेलं कार्य म्हणजे मराठी-इंग्रजी शब्दकोश थॉमस कँडीनं पूर्ण करून प्रसिद्ध केला. त्याच वर्षी मोल्सवर्थच्या शब्दकोशाची पहिली आवृत्ती संपत आली होती. तेव्हा मोल्सवर्थनंच सुधारित दुसरी आवृत्ती तयार करावी, असं त्यानं वरिष्ठांना सुचवलं. सरकारनं १६ विविध विद्वानांना याबद्दल विचारलं. त्या सर्वांचं मत कँडीप्रमाणेच होतं. अखेरीस १८५१ मध्ये मोल्सवर्थ भारतात परतला. १५ वर्षं उलटली तरी तो अतिशय शुद्ध मराठी बोलत होता. या सुधारित आवृत्तीचं बहुतेक सर्व काम त्यानं पुणे आणि महाबळेश्वरात राहून केलं. पहिली आवृत्ती ४० हजार शब्दांची होती, तर ही नवी आवृत्ती ६० हजार शब्दांची होती. ती १८५७ मध्ये प्रसिद्ध झाली. मोल्सवर्थ १८६० मध्ये मायदेशी परतला. तिथेच १३ जुलै १८७२ रोजी त्याचं निधन झालं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link