Next
साखळीयुद्धतंत्रातील आघाडी कोलकाता श्रेणी
समीर कर्वे
Friday, May 03 | 03:15 PM
15 0 0
Share this story

आगामी काळातील युध्दे एकाच माध्यमातून लढली जाणार नाहीत. त्यात हवाई, समुद्र आणि जमीन या तिन्ही आघाड्यांवर सुसज्जता बाळगावी लागेल. सागरी युध्दाची व्यूहरचना त्याचदृष्टीने केली जाते. त्यासाठीच आघाडीच्या युद्धनौकांवर हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे असतात, त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरही असतात व पाणबुड्यांचा निःपात करणारी शस्त्रेही महत्त्वाची ठरतात. विनाशिका श्रेणीतील युद्धनौकांना तर अशी चारी आघाड्यांवरची सज्जता गरजेचीच. आयएनएस कोलकाता श्रेणीतील स्वदेशी बनावटीच्या विनाशिकांमध्ये या भावी युद्धतंत्रांचा प्रभावी विचार केला आहे.
यापुढील समुद्रातली युध्दे केवळ एकाच युद्धनौकेवरून होणार नाहीत. क्षेपणास्त्रमाऱ्यासाठी एखादे लक्ष्य टिपायचे, तरी त्यात एकाहून अधिक युद्धनौकांची साखळी प्रभावी ठरेल. त्यासाठीच तर विविध युद्धनौका आणि किनाऱ्यावरील युद्धनियंत्रणकक्ष यांना एकमेकांमध्ये कुजबुज करता यायला हवी. युध्दाच्या सांकेतिक भाषेत. या तंत्राला नेटसेन्ट्रिक वॉरफेअर म्हणतात. शत्रूच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र डागून तिचा संहार करायचा असेल, तर हे लक्ष्य टिपण्याचे काम एक नौका करील व लक्ष्याचा ठावठिकाणा जमिनीवरील केंद्रास देईल. त्यानंतर ते लक्ष्य साधण्याचे काम दुसरीच नौका करील. मात्र हे लक्ष्य जर नौकेऐवजी विमान असेल, तर त्याचा वेग पकडणे अधिक कठीण असेल. त्यासाठी लक्ष्य टिपणाऱ्या रडारला अतिजलद वेग हवा. असे जलद रडार हे आयएनएस कोलकाता श्रेणीतील विनाशिकांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. कोणत्याही युद्धनौकांवर काही मनोरे आपल्याला दिसतील. त्यात टेहळणी करणाऱ्या तसेच शस्त्रास्त्रमाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रडारचा समावेश असतो. आयएनएस कोलकाता श्रेणीतील विनाशिका त्यांच्यावरील विशिष्ट प्रकारच्या रडारमुळे चटकन ओळखू येतात. एका मनोऱ्यावर चारी बाजूंना अष्टकोनी आकाराच्या फ्रेममध्ये बसवलेली चार गोलाकार एम-एफ स्टार ही इस्रायली रडार या विनाशिकांची टेहळणीची शक्ती कित्येक पटींनी वाढवतात. चारी बाजूंना रडार असल्याने ३६० अंशातील टेहळणी किंवा लक्ष्य टिपणे त्यांना शक्य असते. पाणबुडीचा वेध घेण्यासाठी सोनार ही ध्वनिलहरी टिपणारी यंत्रणा आहे.
यापूर्वी आपण आयएनएस दिल्ली या स्वदेशी बनावटीच्या विनाशिकांची माहिती घेतली होती. नव्वदीच्या दशकात दिल्ली श्रेणीतील विनाशिकांनी भारताच्या युद्धनौकाबांधणीचे कौशल्य सिध्द केले होते. या श्रेणीवरच आधारित परंतु अधिक प्रहारक्षमतेच्या व अद्ययावत तसेच स्टेल्थ प्रकारातील विनाशिका बांधण्याचे काम माझगाव गोदीस देण्यात आले. नौकाबांधणी सुरू झाल्यापासून समुद्रचाचणीनंतर त्या नौदलात कमिशनिंग होईपर्यंत या प्रकल्पाला दहा वर्षे इतका प्रदीर्घ काळ लागला. आयएनएस कोलकाता (१६ ऑगस्ट २०१४), आयएनएस कोची (३० सप्टेंबर २०१५) व आयएनएस चेन्नई (२१ नोव्हेंबर २०१६) अशा क्रमाने या विनाशिकांचे भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाच्या ताफ्यात अखेर कमिशनिंग झाले. आयएनएस दिल्ली ही ६७०० टनांच्या प्रकारातील विनाशिकांची श्रेणी होती. तर अत्याधुनिक रडार आणि शक्तिशाली क्षेपणास्त्रे यामुळे कोलकाता श्रेणी ही ७५०० टनांची झाली. 

बराक आणि ब्रह्मोस
कोलकाता श्रेणीतील विनाशिकांवर ब्रह्मोस ही भारत-रशिया यांच्या संयुक्त बनावटीतून जन्माला आलेली स्वनातीत वेगाची (सुपरसॉनिक) क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रे लांब पल्ल्यावर उभी असलेली जहाजे, युद्धनौका किंवा एखादा भूभाग यांचे लक्ष्य टिपण्यास समर्थ आहेत. त्यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ही क्षेपणास्त्रे डागण्यासाठी व्हर्टिकल लाँचिंग यंत्रणा (उर्ध्वगामी प्रक्षेपक) आहे. त्यामुळे लक्ष्याच्या दिशेने नौका फिरवण्याची गरज भासत नाही. क्षेपणास्त्र डागल्यानंतर नौकेला झटपट माघारी फिरायचे असल्याने या छोट्या गोष्टींचाही बराच उपयोग असतो. शिवाय या विनाशिकांना ताशी ३२ मैल इतका चांगला वेग आहे. आकाशातील लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी या नौकेला बराक९ या क्षेपणास्त्रांची व्यवस्था आहे. शिवाय ७६ मि.मी.ची एक तोफ, एके ६३० च्या चार मशीनगन, पाणतीर डागणारी नळकांडी, पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर्स असा इतर शस्त्रसंभारही या विनाशिकांवर आहे. त्यांच्यावर दोन हेलिकॉप्टर हँगर आहेत.

इलेक्ट्रॉनिक्सवर भर
नेटवर्क ऑफ नेटवर्क्स म्हणजे विविध सॉफ्टवेअरचे जाळे या नौकेवर आहे. ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेन्ट सिस्टिम आहे, ज्यामुळे एखाद्या विभागात बिघाड झाल्यास तो टाळून इतर यंत्रणांचा वीजपुरवठा अखंडित राखता येतो. कॉम्बॅट मॅनेजमेन्ट सिस्टिम अशी युद्धखेळीचे संगणकामार्फत नियोजन करणारी प्रणाली त्यावर आहे. स्वतःचे सक्षम सर्व्हर आहेत. डिजिटल प्रणालीवर भर असून त्यामुळे शस्त्राची प्रहारक्षमता वाढते. उच्चाधिकाऱ्यांना सूत्रे सांभाळण्यासाठी नेहमीच्या स्टिअरिंग ब्रिजच्या जोडीला नौकेवर आणखी एक फ्लॅगब्रिज आहे. युद्धमोहिमांमध्ये कमांड-कंट्रोल प्लॅटफॉर्म म्हणून ही नौका वापरली जाते.   
याच श्रेणीतील आयएनएस चेन्नईने ओखी वादळात अडकलेल्या अनेक बोटींवरील खलाश्यांचे प्राण वाचवले होते. अशा मदतकार्यातही या विनाशिकांचा उपयोग होतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link