Next
अशी पाखरे येती...
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this storyआज कुतूहलकट्ट्याची सगळी मंडळी निवरीच्या खाडी-किनाऱ्यावर जमली होती. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. आझम हेही आवर्जून आले होते. समोरचे थवे सगळे जण आपल्या नजरेत साठवत होते.
“हे आहेत हजारो किलोमीटर प्रवास करून आलेले फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी,” डॉ. आझम म्हणाले.
“बापरे!” शाश्वत उद्गारला, “हे पक्षी एवढा प्रवास करतात!”
“स्थलांतरित पक्षी ताशी पंचेचाळीस-पन्नास किलोमीटर वेगानं रोज साधारण आठ तास उडत साठ-सत्तर दिवसांत वीस-बावीस हजार किलोमीटरचाही प्रवास करतात,” डॉ. आझम म्हणाले.
“पण,” प्रथमेश म्हणाला, “हे पक्षी एवढा लांबचा प्रवास का करतात?”
“ऋतुमानाप्रमाणे पक्ष्यांच्या मूळ ठिकाणचं अन्न आणि घरट्यांसाठी जागा कमी-कमी होऊ लागल्या की अन्न आणि जागा अधिक प्रमाणात मिळतील अशा ठिकाणी पक्षी जायला निघतात,” डॉ. आझम सांगू लागले, “हिवाळ्यात उत्तर गोलार्धातले पक्षी विषुववृत्ताकडे झेपावतात. नंतर उन्हाळ्यामुळे तापमान वर जाऊ लागलं की ते पुन्हा उत्तरेकडे त्यांच्या मूळ जागी परततात. कारण या पक्ष्यांना अतिथंडी किंवा अतिउन्हाळा टाळायचा असतो.”
“एवढ्या हजारो किलोमीटरच्या प्रवासासाठी पक्षी काय तयारी करतात?” सानियाने विचारले.
“आपल्याला प्रवासाला जायचं असेल तर सगळ्यात आधी आपण काय करतो?”
“आपण कधी जाणार ते ठरवून तिकिटं काढतो,” सोहम म्हणाला, “पण पक्ष्यांना थोडंचं असं बुकिंग करावं लागतं? ते तर हवं तेव्हा उडत निघू शकतात.”
“पक्ष्यांना हवं तेव्हा उडता येत असलं तरी ते वाटेल तेव्हा प्रवासाला निघत नाहीत,” डॉ. आझम म्हणाले, “आपलं निघणं हे जसं गाड्यांच्या वेळेशी निगडित असतं, तसं पक्ष्यांचं निघणंसुद्धा ऋतुमानाशी निगडित असतं. सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटचाल करू लागला की उत्तर गोलार्धात उन्हाळा संपत येऊन सूर्याचा प्रकाश घटायला लागतो. प्रकाशसंवेदी ज्ञानेंद्रियाकडून प्रकाश कमी व्हायला लागल्याची जाणीव पक्ष्यांच्या मेंदूला होते. मग त्यांच्या शरीरात वेगवेगळी संप्रेरकं (हार्मोन्स) निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे पक्ष्यांच्या अंगावरची आधीची पिसं गळून नवी पिसं उगवायला लागतात. नव्या पिसांमुळे त्यांना शरीराचं संरक्षण करणारे नवे कपडे आणि लांबवर भरारी घ्यायला समर्थ असे भरभक्कम पंख लाभतात. तसंच, संप्रेरकांमुळे त्यांना प्रचंड भूक लागते. अनेक पक्षी कीटकांबरोबरच फळं, धान्यं आणि शरीराला भरपूर ऊर्जा देणाऱ्या पदार्थांवरही ताव मारतात. त्यामुळे त्यांच्या वजनात लक्षणीय वाढ होते.”
“पण वजनातली वाढ हा लांबवर उडण्यातला अडथळा नाही का ठरत?” अमनाने विचारले.
“खाण्यातल्या वाढीमध्ये प्रथिनं आणि भरपूर उष्मांक देणारे पदार्थही असतात. प्रथिनांमुळे त्यांचे स्नायू अधिक भक्कम होऊन दूरवर उडायला अधिक समर्थ बनतात. तसंच, शरीरात साठलेल्या मेदाचा वाटेत लागणारी भरपूर ऊर्जा पुरवायला उपयोग होतो,” डॉ. आझमांनी सांगितले.
“पण हा प्रवास करताना पक्ष्यांना योग्य दिशेनं जाण्याचा नेमका मार्ग कसा सापडतो?” प्रथमेशने विचारले.
“त्यात काय मोठंसं, थव्यातले जे पक्षी मागच्या वर्षी आले असतील, ते पहिल्यांदाच येणाऱ्यांना बरोबर आणत असतील,” सोहम म्हणाला.
“नाही,” हसून डॉ. आझम म्हणाले, “जन्मल्यानंतर पहिल्यांदा एकट्यानं येतानासुद्धा पक्षी त्याच मार्गानं येतात. हे कसं घडतं, यावर संशोधन चालू आहे. त्यातून काही गोष्टी उलगडल्या आहेत. आपल्याला चुंबकीय क्षेत्र जाणवत नसलं तरी पक्ष्यांना असणाऱ्या चुंबकीय ज्ञानेंद्रियामुळे चुंबकीय क्षेत्र आणि त्याची दिशा यांची जाणीव होते. तसंच, सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची जागा आणि आकाशातल्या तारकांची स्थानं यांचाही पक्षी उपयोग करतात. शिवाय, दिवसाच्या सूर्यप्रकाशात पर्वतांसारख्या जमिनीवरच्या ठळक गोष्टी त्यांना उपयोगी पडतात. कदाचित, हे ज्ञान त्यांच्या जनुकांमध्येही गुंफलेलं असू शकेल. लहान मूल जसं कोणीही न शिकवता उपडं पडतं, रांगायला लागतं, तशी ही प्रक्रिया असू शकेल. तसंच, पक्ष्यांचा जातानाचा आणि येतानाचा मार्ग भिन्न असतो. कारण बदलत्या ऋतुमानानुसार अन्न जिथे जास्त मिळतं, अशी ठिकाणं ते जाता-येताना निवडतात.”
“कमाल आहे!” मुक्ता म्हणाली, “पण स्थलांतर करताना पक्ष्यांना काही अडचणी येतात का?”
“पक्ष्यांना अनेक वेगवेगळ्या धोक्यांना तोंड द्यावं लागतं,” डॉ. आझम म्हणाले, “अनेक भक्षक पक्षी त्यांना मारून खायला टपलेले असतात. त्यांना टाळण्यासाठी बरेच पक्षी रात्रीच्या वेळी दूरचा प्रवास करतात. त्यामुळे भक्षक पक्ष्यांना ते सहजपणे दिसत नाहीत. याखेरीज वाईट हवा, वादळ आणि अन्नाचा दुष्काळ यामुळेही हे पक्षी संकटात सापडतात. या प्रवासात पक्ष्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची कठोर कसोटी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे पक्षीच परत मूळ ठिकाणी पोचून पुढच्या पिढीला जन्म देतात. पिढ्यानपिढ्या चाललेल्या या चक्रातून तावूनसुलाखून निघालेल्या पक्ष्यांच्या पुढच्या पिढ्या स्थलांतरासाठी अधिकाधिक सक्षम होत जातात. मानवसुद्धा या पक्ष्यांच्या दृष्टीनं एक मोठं संकटच आहे.”
“का?”
“मानवानं उभारलेले विजेचे उंच खांब, पवनचक्क्या यांना आदळून लक्षावधी पक्षी नव्यानं या प्रवासात बळी पडायला लागले आहेत,” डॉ. आझम म्हणाले, “अफगाणिस्तानमधल्या टोळ्यांकडून होणाऱ्या कत्तलींमुळे भरतपूरच्या अभयारण्यात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या ज्या जीवजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यांचं संवर्धन करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.”
“ते कोणते?”
“अतिशय हलकी इलेक्ट्रॉनिक उपकरणं पक्ष्यांच्या पायांना बांधून स्थलांतरमार्गांवरच्या परिस्थितीची माहिती शास्त्रज्ञ गोळा करताहेत,” डॉ. आझम म्हणाले, “त्यातून या पक्ष्यांना वाचवण्यासाठी काय करता येईल, हे कळेल.”
“शिवाय, तुमच्यासारखे पक्षितज्ज्ञ सर्वांच्या मनात ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’ ही भावना निर्माण करतात, तीही खूप महत्त्वाची आहे!” भारावून मुक्ता म्हणाली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link