Next
वनस्पतीचा सजीव गणपती
दीपक आलुरकर
Friday, September 06 | 01:30 PM
15 0 0
Share this story


सामुदायिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा मनशक्ती प्रयोगकेंद्रात १९९० पासून सुरू झाली. त्या वर्षी युवकांसाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू झाला होता. तेव्हा घरी जाण्यापेक्षा केंद्रातच पाच दिवस सामुदायिक गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना पुढे आली. ‘मनशक्ती’चे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी गणेशोत्सव करण्यास मुलांना प्रोत्साहन दिलेच शिवाय उत्सवाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टीही दिली. सण, उत्सव करताना त्यातील मर्म समजून ते करावेत, नाहीतर सत्त्व बाजूला राहून केवळ सोहळा उरतो. स्वामीजींनी गणेश दर्शन विज्ञान (१८ विवेचने), भयनाश मंत्र, धर्म संगती, देवाचा पुनर्विचार या त्यांच्या ग्रंथांत देव या संकल्पनेबद्दल, गणपतीबद्दल सविस्तर लिहिले आहे.
तेव्हापासून वनस्पतीचा सजीव गणेश साकारला जातो. त्यासाठी तृतीयेला म्हणजे गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी एक मोठी थाळी घ्यायची. त्यावर सुमारे १ इंच जाड थराची जणू केकसारखी ओली माती पसरायची, थापायची. त्या ओलसर मातीवर गणेशाची रेखाकृती काढायची. त्या आकृतीच्या रेषांवर गव्हाचे दाणे पेरायचे, मातीत अलगद खोचायचे. त्यावर पाणी शिंपडायचे. चाळणीसारख्या भांड्याने ही द्विमितीय रेखीव मूर्ती सुरक्षित झाकून ठेवायची. उगवणारी पाती ही तिसरी मिती दुसऱ्या दिवसापासून पाहायला मिळतात. एरवी मातीची गणेशमूर्ती आणून ‘प्राण’प्रतिष्ठा केली जाते. त्याऐवजी स‘जीव’ अशा वनस्पतीमधून गणेश इथे साकारला जातो. जगदीशचंद्र बोस यांच्यापासून अनेकांनी वनस्पतींना भावना असल्याबाबत संशोधन केले आहे. मनशक्तीमध्ये त्या तत्त्वाच्या आधारे अनेक प्रयोग सुचवले जातात.
चतुर्थीला या रेखामूर्तीची गेटपासून देव्हाऱ्यापर्यंत पारंपरिक ढोलताशा, लेझीम आणि झांजांच्या गजरात, वाजतगाजत मिरवणूक निघते. मोरयाच्या घोषात श्रीगणरायांचे स्वागत केले जाते. छोटी समंत्र पूजा केली जाते. गणपतीची आरती, घालीन लोटांगण आणि मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. ‘गं गणपतये नमः’ या मंत्रासह जपध्यान होते. गणपतीबद्दल छोट्या लेखांचे वाचन केले जाते. रोज सामुदायिक अथर्वशीर्ष म्हटले जाते. ऋतं वच्मि, सत्यं वच्मि म्हणजेच जाणीवपूर्वक सत्य वागण्याची मनाला आठवण करून द्यायची. अव दातारं म्हणजे मी देणारा होईन. स्वार्थ बुद्धी उपजत आहे, थोडा निःस्वार्थ बुद्धीचा संस्कार पत्करायचा. अशा शुभ संकल्पाचे संस्कार वातावरणात होतात, तसे गणेशाकृतीतील वनस्पतींवरही होतात.
पाचव्या दिवशी आपल्याच निश्चय-संकल्पांचा परिणाम होऊन सुमारे २ ते ३ इंच उगवलेली पाती प्रार्थनापूर्वक कापून घ्यायची. प्रसाद म्हणून ते गव्हांकुर सेवन करायचे. एरवी दुर्वा गणपतीला आणि मोदक आपल्याला अशी वाटणी आपण करतो. वनस्पती प्रसादाचे सेवन म्हणजे जणू आपल्या सद्विचारांचा बायोफीडबॅक म्हणजेच आपला शक्तीपुनर्मेळ. उर्वरित माती बागेत, कुंडीत वापरायची.
देव म्हणजे द + एव, फक्त देणारा. आपण असतो घेव फक्त घेणारे. कोणत्याही देव प्रतीकाकडून ‘देणाऱ्याचे हात घेण्याचा’ संस्कार स्वीकारायचा. देव हे गुणांचे प्रतीक असते. संकटे शांतीने सोसणारे, संघर्ष करणारे. सक्रिय वर्तनाचे आदर्श आपण घेणे, हीच खरी देवभक्ती. केवळ स्तुतीने भाळेल, तो देव कसला? गणपतीउत्सव हा उत्साह, चैतन्याचा सोहळा. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम मुले, युवक आयोजित करतात. सुप्त गुणांना त्याने वाव मिळतो. विविध स्पर्धा, मनोरंजक खेळ होतात. प्रश्नमंजुषा, अंताक्षरी याही गोष्टी होतात. सामुदायिक भोजन बनवले जाते. परिसरस्वच्छता केली जाते. काही वेळा रक्तदानशिबिर घेतले जाते.
शेवटच्या दिवशी अशा अर्थाची प्रार्थना म्हटली जाते-
हे महाकाय महामंडलेश्वरा! आज तुझी मूर्ती विसर्जित होवो, परंतु तुझ्या गुणांचं सर्जन माझ्या चेतनाच्या कणाकणात स्पंदित राहो. तुझी मृत्तिकाकार मूर्ती मी पुढल्या वर्षी लवकर या, म्हणत बोळवणार आहे. तुझ्या कर्तव्याचा आदर्श मी पुढल्या वर्षापर्यंत माझ्या मनात आणि वर्तनात वागवीन. दुसऱ्यासाठी, चांगल्यासाठी कष्टी होण्याचे, कष्ट करण्याचे ‘संकष्टी’ व्रत मी घेईन. आज मी तुला निरोप देतो. आणि त्या निमित्ताने आजवरच्या अनिश्चिततेला आणि कर्तव्यच्युतीलाही निरोप देतो!
.........................................

गणपतीच्या गुणांचे चिंतन
निश्चय, एकनिष्ठा : डोके उडवले गेले तरी बेहत्तर, पण त्याने आईला दिलेले वचन पाळले. आपण मुळात चुकीचे वचन देऊ नये. योग्य वचन दिले तर ते कसोशीने पाळायला हवे. आपल्या शब्दाचा आपण मान राखायला हवा.
नम्रता : आईपुढे तो नम्र, सूक्ष्म झाला. जेव्हा मोठ्या शत्रूंना सामोरा गेला, तेव्हा भव्य झाला. गणांचा विघ्नहर्ता झाला.
सत्य : त्याने शब्द पाळला. म्हणूनच अथर्वशीर्षात ‘ऋतं वच्मि सत्यं वच्मि सत्य’ बोलणे आले आहे.
ज्ञान, कष्ट : महाभारत लिहिण्यासाठी व्यासांनी त्याची निवड केली. तो व्यासांचा नम्रपणे स्टेनो झाला. जगातील पहिला स्टेनो. व्यासांनी अटच घातली होती, लिहिताना थांबायचे नाही. विश्रांती घ्यायची नाही. समजल्याशिवाय महाभारत लिहायचे नाही. नम्रतेने त्याने ती ज्ञानसेवा केली. तो बुद्धीचा देव म्हणून ओळखला जातो.
लोकसेवा, निःस्वार्थ : तो गणनायक आहे. सामान्य जनांचा, गणांचा पती. ती ‘पत’ त्याने वंशाने नाही तर सेवेने मिळवली आहे. निःस्वार्थाशिवाय खरे नायकपद मिळत नाही. मिळाले तरी टिकत नाही.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link