Next
आत्मसन्मानाकडे प्रवास
वंदना सुधीर कुलकर्णी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

साधारण वर्ष-दीड वर्षांपूर्वी माझ्याकडे एक केस आली. साधारण बारा-एक वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोन मुलं होती. नवऱ्याचं म्हणणं होतं, की ती एक माणूस, गृहिणी, आई म्हणून चांगलीच आहे. माझ्या आईवडिलांचंही तिनं व्यवस्थित केलं आहे (जेव्हा ते आमच्याकडे राहायला येतात तेव्हा). नोकरीतही तिच्या परफॉर्मन्सची कमान नेहमी चढतीच राहिली आहे. मात्र, पत्नी म्हणून आमच्या सहजीवनात माझ्या तिच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या ती पूर्ण करू शकत नाही. त्यातील त्याची काही कारणं खासगी होती. त्याचं म्हणणं होतं, की मी अनेकदा तिला हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्यापर्यंत ते पोचतच नाही. माझं बोलणं डोक्यात शिरतच नाही तिच्या. हे सांगताना त्याची मांडणी इतकी तर्कशुद्ध (Logical) होती की तुम्ही त्याचे मुद्दे खोडूच शकणार नाही.
नंतर त्याची प्रमोशनवर बदली होऊन तो काही वर्षांसाठी दुसऱ्या गावी गेला. मुलांचं बस्तान विस्कटायला नको म्हणून ती मुलांना घेऊन मागेच राहिली. त्या नवीन गावी तो दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडला आणि त्या दोघांमध्ये सर्वप्रकारचे बंध निर्माण झाले. पत्नीला शंका येत होती, पण त्यानं ताकास तूर लागू दिली नाही. अखेर तिनंच इंटरनेटवरून ते सारं प्रकरण पकडलं. तो अर्थातच तिच्यासाठी धक्का होता; पण त्याला आपणच जबाबदार आहोत (त्याच्या म्हणण्याप्रमाणे), हा धक्का जास्त मोठा होता!
“मला आपल्या वैवाहिक नात्यात तुझ्याकडून पत्नी म्हणून काय हवं आहे, हे मी तुला अनेक वर्षं सांगण्याचा प्रयत्न करत होतो; पण तू स्वत:मध्ये काहीही बदल केले नाहीस. या स्त्रीकडून मला ते मिळालं. Now I can enjoy romance with her! I know I am doing wrong, but I have no regrets for it...”
त्याचं हे शेवटचं वाक्य अजूनही माझ्या कानात रेंगाळत आहे; तर तिच्यासाठी ते किती त्रासदायक झालं असेल!
अर्थातच या सगळ्यांतून त्यांची भांडणं वाढत गेली. कधीकधी मुलांसमोरही हाणामाऱ्या व्हायच्या. काही माणसं बिनतोड वाद घालून दुसऱ्याला उचकत राहतात (instigation) आणि मग काही समोरची माणसं ते बोलणं शब्दश: घेऊन, खरं मानून स्वत:ला लावून घेतात. उचकतात. या क्रिया-प्रतिक्रियांमध्ये मग दोघंही आक्रमक होतात. या केसमध्ये ‘Benefit of doubt’ नेहमी त्याला मिळायचा; नव्हे त्याच्या हुशारीनं तो नेहमी वरचढ ठरायचा. त्यामुळे तिचं वैफल्य (frustration) आणखी वाढायचं. त्याचा तो आणखी फायदा घ्यायचा. मानसशास्त्रीय भाषेत याला Self-defeating Behaviour असं म्हणतात. ती दोघं आली तेव्हा मुलांच्या मे महिन्याच्या सुट्टीसाठी तो मोठी रजा घेऊन आला होता. ते चौघं नुकतंच कुठेतरी फिरूनही आले होते. आता आठवड्या-दोन आठवड्यांत तो कामाच्या (बदलीच्या) ठिकाणी परतणार होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या मानसशास्त्रीय चाचण्या केल्या, तेव्हा दोघांचं आपापलं व्यक्तिमत्त्व त्यांच्या वर्तनाला पूरकच असल्याचं लक्षात आलं. विवाहबाह्य संबंधाव्यतिरिक्तही त्या नवऱ्याचे अनेक स्वभावदोष त्या रिपोर्टमध्ये दिसत होते, ज्यांचा तिलाही भरपूर त्रास झाला असणार! दुर्दैवानं, तिला ते त्याच्या पद्धतीनं नेमक्या, योग्य (rational) शब्दांत मांडता येत नव्हतं. ती मुळातच काहीशा कायम गोंधळलेल्या प्रकृतीची! आता तर त्यानं तिला गोंधळायला कारणही पुरवलं होतं. खरं तर ती व्यथित झाली होती. कुठलीही सर्वसामान्य गृहिणी संसार निगुतीनं करण्यात जशी अडकत जाते, तशीच तीही अडकत गेली होती. त्यामुळे एक ‘सहचरी’(companion) म्हणून नवऱ्याला जे आपल्याकडून हवं आहे, त्याकडे तिचं दुर्लक्ष झालं होतं, नव्हे ते तिच्या अग्रक्रमात मागे पडलं होतं, ही वस्तुस्थिती होती. त्याचं गांभीर्य समजून घेण्यातही ती कमी पडली होती. ती गोंधळली की तिचं भावनिक उत्कट असणं विचित्रच वळण घ्यायचं... ते नीट ‘चॅनेलाइज’ व्हायचं नाही. त्यामुळे तो अधिकच वैतागायचा. तिला भावनिकदृष्ट्या स्थिर, शांत करणं गरजेचं होतं. ती आत्मभानाबाबत मुळातच जागृत नव्हती. आता तर त्याची वासलातच लागली होती. त्यामुळे तिचा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास अधिकच घसरला होता. खरं तर अनेक बाबतींत ती खूप सबल, सक्षम (capable) होती; पण त्याबद्दल ती जागरूकच नव्हती. She was just not taking an appropriate pride in what she was! तिला तिच्या या क्षमतांची ओळख करून देणं गरजेचं होतं. त्यासाठी तिला भावनिक स्थैर्य येणं महत्त्वाचं होतं.
त्यालाही त्याच्या काही अविवेकी (irrational) वर्तनात बदल करण्याची खूप गरज होती. त्याच्या काही अविवेकी समजुती, विचारधारा (irrational beliefs) होत्या, त्याही त्याला तपासून बघायला लावणं (confrontation, disputation) गरजेचं होतं. यासाठी मी दोघांचं स्वतंत्रपणे वैयक्तिक समुपदेशन सुरू केलं. यासाठी त्यांना वेळ लागेल, काही सिटिंग्ज (follow-ups) लागतील असंही सांगितलं; पण एक-दोन सेशननंतर त्याची गावाला जायची वेळ झाली. फोन/स्काइपवरून सेशन चालू ठेवायचं ठरलं. दुर्दैवानं त्यानं ते मनावर घेतलं नाही; त्याला त्याची गरज उरली नसावी! त्याचं फोन करणं, सुट्ट्यांमध्ये घरी येणं सगळंच कमी होत गेलं. कदाचित तिकडच्या त्या बाईमध्ये तो जास्त गुरफटत गेला असावा. संसारिक जबाबदाऱ्या घेणंही कमी-कमी होत गेलं. अगदी मागितल्याशिवाय पैसे न पाठवेपर्यंत.
ही बिचारी इकडे एकटी, स्वत:चं करिअर सांभाळून, घर-संसार, मुलांचे शाळा-अभ्यास अवांतर उपक्रम, आजारपणं, येणं-जाणं अशा सगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होती. त्यात तिचीही आजारपणं झाली. मात्र तिनं तिचे माझ्याकडील समुपदेशनाचे फॉलो-अप कधीही चुकवले नाहीत. तिच्या भावनांचे चढ-उतार मला दिसायचे; पण लाटांचं ते उसळणं हळूहळू खूप कमी होत गेलं, जसा एखादा शांत होत चाललेला समुद्र!
हळूहळू तिनं स्वत:कडे लक्ष पुरवायला सुरुवात केली. नवऱ्याच्या सांगण्यात जे तथ्य होतं, त्या तिच्या कमतरतांवर सकारात्मक पद्धतीनं मात करायला सुरुवात केली. कितीही गडबड असली तरी दिवसांतून एक तास स्वत:च्या व्यायामासाठी आणि एक तास स्वत:च्या छंदासाठी देऊ लागली. शनिवार-रविवारी मित्रमैत्रिणी, चित्रपट-नाटक वगैरे कोणतीही स्वत:ची ऊर्जा वाढवणारी करमणूक किंवा स्वत:ला आनंद देणारे उपक्रम हे ती हळूहळू प्राधान्यानं करू लागली. त्यातून तिला स्वत:ची नव-नवी शक्तिस्थानं उमगली. त्यामुळे तिचा घसरलेला आत्मविश्वास उंचावायला लागला. ती छान, नीटनेटकी राहायला लागली. तिची भावनिक उसळण आणि त्यामुळे खूप ऊर्जा घेणारी अवास्तव हालचालींची देहबोलीही शांत होत गेली. स्वत:कडे लक्ष द्यायला सुरुवात केल्यावर, तिची आरशातील प्रतिमा आता तिलाही हवीहवीशी वाटायला लागली. इतके दिवस तिनं तिच्याकडे कधी नीट बघितलंच नव्हतं!
मधल्या काळात तिची मुलं वडिलांच्या वागण्यामुळे- फोन कमी, भेटीगाठी कमी- खूप असुरक्षित आणि सैरभैर झाली होती. आधीची भांडणं बघितल्यामुळे, बाबा आता परत येणारच नाही का, आम्हाला सोडून जाणार का, हा भाबडा भयगंड त्यांच्या मनात निर्माण होऊ लागला होता. हिला मी सांगितलं होतं की मुलं आणि बाबा या नात्यात तू ढवळाढवळ करायची नाहीस. बाबांबद्दल काही वाईट बोलायचं नाही. त्यांच्या तक्रारींना ‘री’ ओढायची नाही.
नंतर मीच त्यातल्या मोठ्या मुलाला भेटले. तो पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याला सुरक्षिततेची भावना देणं गरजेचं होतं. तो अत्यंत बुद्धिमान आणि वयाच्यामानानं खूप परिपक्व. बाबा भेटायला कमी येण्यातल्या त्यांच्या अडचणी मी फक्त त्याला सांगितल्या. ते असे एकदम तुम्हाला सोडून जाणार नाहीत, हे समजावलं. ज्यांचे वडील सैन्यात, बोटीवर, परदेशात (पोस्टिंगवर) काम करतात, त्या मुलांनाही अशाच एकल पालकत्वामधून जावं लागतं. तुझ्या आईबाबत काही तक्रारी आहेत का असंही विचारलं, ज्या सुदैवानं नव्हत्या. त्याला माझं म्हणणं पटलं असावं. तो हळूहळू परिस्थितीशी जुळवून घ्यायला इतका चांगला शिकला, (मुलं फार adaptive– लवचीक असतात), की वडिलांचा ‘आता मी दिवाळीच्या सुट्टीत मोठी रजा घेऊन येतोय’ असा फोन आला, तेव्हा ‘ओके’ या एका शब्दाच्यावर दोन्ही मुलांची कोणतीही प्रतिक्रियानव्हती.
तिला हेही पटलं होतं की त्याच्या अफेअरचा आपण कोणताही विचार करायचा नाही, कारण त्यातून काहीच साध्य होणार नाही. त्याचं त्याच्याजवळ. तो आता इथे आल्यावरआपलं सगळं रूटीन (त्याच्यासाठी जराही न विस्कटता) चालू ठेवायचं. आपल्या कर्तव्य जबाबदाऱ्यांना चुकायचं नाही. त्यानं केलेली प्रत्येक गैरवर्तणूक हे त्याच्या बरोबरच्या पतीपत्नी नात्यासंबंधातील आपल्या भविष्यातल्या निर्णयाचे मुद्दे (inputs) असतील (त्यानं गैरवर्तणूक केलीच तर). तो जर आपल्याशी, स्वत:च्या मुलांशी प्रतारणाच करत राहणार असेल तर घटस्फोटाचा विचार आपणही करू शकतो. आपण काहीतरी म्हणायचं, त्यानं ते खोडून काढायचं, यातून साध्य काय होणार आहे? आपण आपलं तटस्थ राहणं, वैवाहिक नात्यातील गुंतवणूक फक्त व्यावहारिक बाबतीत ठेवणं हे आपल्या हातात आहे. आपल्या वर्तनातला बदल, त्याच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तो काय करतो ते बघू. Wait and watch! मात्र या काळात आपलं आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण हवं!
हे तिला आता बऱ्याच अंशी साध्य होत आहे. वर्ष-सहा महिन्यांच्या काळात ती आत्मसन्मानाच्या दिशेनं एक मोठा प्रवास करून आली आहे; ज्यामुळे तिचं तिलाच निर्भर, छान वाटतं आहे.
अनेकांच्या आयुष्यात ‘समस्या’ म्हणून आलेले प्रसंगच, आत्मसन्मान जागवण्याची संधी घेऊन आलेले असतात. समस्येकडे आव्हान म्हणून बघितलं तर ही संधी दिसते. मगच स्वबदलाच्या दिशेनं पावलं पडायला लागतात. आपल्यातील ‘सुप्त’ गुण त्यावेळी आपल्याला खूप छान साथ देतात! ‘हे गुण माझ्यात होते?’ अशी आपलीच आपल्याला नव्यानं ओळख व्हायला लागते! त्यातून ‘स्व’ सुखावतो नि आत्मभानही जागृत होतं. आत्मविश्वास दृढ होतो; दुणावतो. समोरच्या माणसाच्या वागण्याचा होणारा त्रास आता आपण स्वत:ला करून घेत नाही. ती आणि तिच्या मुलांचं आता एक छान विश्व बनलंय. त्यात त्याचं येणं हे आगंतुकासारखंच होणार आहे. जसं ‘त्याच्यावाचून माझं अडतं’, असं तिला (आणि त्यालाही!) वाटत होतं, त्याऐवजी ‘माझ्यावाचून कुणाचं काही अडत नाहीए!’ ही धारदार जाणीव आता त्याला झाल्यावाचून राहणार नाहीए! त्यानंतर तो जे ठरवेल ते ठरवेल. तिच्यासाठी आता त्यामुळे फार फरक पडणार नाहीए!
 (समाप्त)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link