Next
एकतारा
- मोहन कान्हेरे
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

हे एक पौराणिक वाद्य आहे. या वाद्याला वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळी नावं आहेत. एकतार, चेकतारो, गोपीचंद, गोपीचांद, तुणतुणं. (डफ व तुणतुणं ही दोन वाद्यं शाहीरमंडळी वापरतात. या तुणतुण्याचा आकार व ध्वनी वेगळाच असतो. एकतारीशी या तुणतुण्याचा तसा काहीच संबंध नाही.)
नावाप्रमाणे खरोखरीच या वाद्याला सुरात लावलेली एकच तार असते. ती छेडताना ताल धरून, मात्रांवर ध्वनीची निर्मिती करणं अपेक्षित असतं. अशा निनादावर भक्तीसंगीत गायलं जातं. एकतारीची रचना तानपुऱ्यासारखी, मात्र आकारानं खूप लहान असते. हे छोटंसं वाद्य हातात धरून उभ्यानं भजन गायलं जातं. पौराणिक नाटकांतून नारदमुनींच्याही हातात एकतारी दाखवली जाते.
नारदमुनी हे आद्य कीर्तनकार. देवर्षी! (म्हणजे देवांचे ऋषी) हातात एकतारी घेऊन सर्वत्र संचार करणारे. त्यांच्या गळ्यात हे छोटंसं वाद्य अडकवलेलं असायचं. ‘नारायण नारायण’ असं सदैव म्हणणारे. पावना, वामना या मना, दे तव भजनी निरंतर वासना (इच्छा या अर्थी) हे पद तुम्ही ऐकलंय का? नारदमुनींची भूमिका करणारे कलावंत हाती एकतारी घेऊन हे पद रंगमंचावर अगदी समरसून गात. ते गाताना एकतारी छेडत राहत. त्यामुळे थोडा का होईना स्वर-भराव मिळत राही. सदैव भटकंती करणारे, ती करताना भक्तीसंगीत गाऊन भिक्षा मागणारे हातात हे वाद्य घेतात आणि स्वत:ला नारदीय परंपरेचे पाईक मानतात. भारताबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश या देशांतही हे वाद्य आजही वापरलं जातं. काहींनी आवश्यक वाटल्यामुळे दोतारा (एकऐवजी दोन तारा) या वाद्याची निर्मिती केली आहे. कबीरवाणी गाणारे मात्र हातात एकतारीच घेणं पसंत करतात. बंगालमधील ‘बाल’संगीत, ज्याचा काही बंगाली चित्रपटांत समावेश केलेला आहेत, त्या कलाकारांनी एकतारीला पसंती दिली आहे.
सुफी संगीत गाणारे कलाकारही याच वाद्याला पसंती देतात. (अर्थात केवळ ठरावीक प्रातांमध्ये.) पंजाब प्रांतात ‘तुंबी’ (थंबीही म्हणतात) नावाचं जे वाद्य लोकसंगीतात ऐकायला मिळतं, ते म्हणजे एकप्रकारची एकतारीच आहे.
लालचंद यमला जट (१९१४-१९९१) या कलाकारानं ‘तुंबी’ हे वाद्य पंजाब प्रांतात खूप लोकप्रिय केलंय. एकतारीची किंमत सुमारे ४००-५०० रुपये तर गोपीचंदची किंमत ७००-८०० रुपये असते. अर्थात दर्जानुसार किंमत बदलते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link