Next
पूल बंद, संसार चालू
विशेष प्रतिनिधी
Friday, September 20 | 02:00 PM
15 0 0
Share this story

चर्नीरोड येथील जवळपास सर्वच पादचारी पूल बंद झाल्याने येथे गिरगावकडे जाण्यासाठी उतरणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. सुरक्षेच्या कारणासाठी पुलाचा पादचारी जिना बंद केला असतानाच, अवघ्या तीन महिन्यांतच या पुलाचा ताबा मात्र अनेक कुटुंबांनी घेतला आहे.
कोणतीही दुर्घटना घडल्यास या कुटुंबांच्याही जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, परंतु महापालिका, रेल्वे, पोलिस यांच्या निष्काळजी वृत्तीमुळे येथे सर्व आलबेल सुरू आहे. सार्वजनिक रस्ते, पूल, पदपथ यांचा मुंबईत कसा गैरवापर सुरू असतो, त्यावर चर्नीरोड पुलावरील चित्र पाहिल्यास प्रकाश पडेल.
 मुंबईत छत्रपती शिवाजीमहाराज रेल्वे टर्मिनससमोरच्या हिमालयपूल दुर्घटनेने ७ पादचाऱ्यांचे बळी घेतले, तर ३० हून अधिक जण जखमी झाले. त्यापूर्वी एल्फिन्स्टनरोड-परळ येथील पूलदुर्घटनेत २२ जणांचा प्राण गेला होता. हिमालयपूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांची झाडाझडती सुरू झाली.
चर्नीरोडला पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी तसेच रेल्वेकडे येण्यासाठी तीन पूल आतापर्यंत होते. आजघडीला हे तिन्ही पूल बंद आहेत किंवा तोडून टाकले आहेत. त्यापैकी सैफी मंझिल-हिंदुजा महाविद्यालयाकडे उतरणारा बोरिवली दिशेकडील पूल धोकादायक झाल्याने या वर्षी २६ जून रोजी बंद करण्यात आला. त्यापूर्वी साहित्य संघ मंदिर व केळेवाडीकडे जाणारा पूलही पाडण्यात आला होता. तसेच ऑपेरा हाऊसच्या दिशेने चौपाटीकडे जाण्यासाठी वापरात येणारा पूलही सध्या बंदच आहे. त्यामुळे चौपाटी, मरीन ड्राइव्ह किंवा प्राणसुखलाल मफतलाल बाथकडे जायचे झाल्यास रेल्वेपास-तिकीट नसलेल्या पादचाऱ्यांना सरकारी मुद्रणालयाकडील पुलावरून रेल्वे ओलांडावी लागते. सैफी मंझिल रुग्णालयासमोरील महर्षी कर्वे मार्गावर अष्टौप्रहर रहदारी असते. हा रस्ता ओलांडण्यावाचून आता रेल्वेप्रवाशांना गत्यंतर नसते, अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली. यापूर्वीही रुग्णालयाच्या आवारात पूल उतरू नये, यासाठी पूल आखूड जागेत बांधल्याचे कळत होते. त्यामुळे पायऱ्या अगदी अंगावर यायच्या व पूल चढून आल्यावर धाप लागायची, निदान आता नवीन पूल बांधताना तरी ती चूक सुधारावी, अशी प्रतिक्रिया पादचारी विकास परांजपे यांनी दिली. पूल सुरू होऊन दहा वर्षेही झालेली नाहीत, तेवढ्या काळात पूल धोकादायक कसा ठरतो, याची चौकशी होणार की नाही, असेही त्यांनी विचारले.
नगरसेविकाही हतबल
या विभागाच्या नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदार यांनी सांगितले, गिरगाव-ऑपेरा हाऊस भागात येणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल होताहेत. या प्रश्नावर आम्ही स्थापत्य समिती, प्रभाग समिती तहकूब केली. परंतु तरीही प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. या पुलाचा जोड खराब आहे म्हणून तो बंद करण्यात आला, परंतु त्याच पुलाचा ताबा मात्र शे-सव्वाशे कुटुंबीयांनी घेतला आहे. एकदा तर या वस्तीला असलेल्या लोकांकडून जेवणाचे खरकटे पिशवीतून भिरकावले गेल्याने दुचाकीस्वाराचा तोल गेल्याची तक्रार माझ्याकडे आली. काही दिवसांपूर्वी पूल बंद असतानाही पुलावर मात्र दिव्यांचा झगमगाट होता, त्याची तक्रार आम्ही बेस्टकडे करून वीज बंद करून घेतली. चर्नीरोडचे मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे, मग या पुलाच्या दुरुस्तीकडे इतकी डोळेझाक कशासाठी?
बहुतांश पूल, सार्वजनिक चौक यांच्या जागांवर विविध प्रकारचे विक्रेते, हारतुरे विणणारे यांचा राबता असतो. त्यांचे संसारही तेथे थाटले जातात. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी अशा निर्जन पुलांवर जुगारांचे अड्डे चालतात. काही जागांचा गोदामासारखा वापर होतो. मशीदबंदरच्या पुलाखाली कित्येकदा गर्दुल्ल्यांचे अड्डे पाहायला मिळायचे. या सर्व उद्योगांमुळे पुलांच्या सांगाड्याची हानी होते.
मुंबईतील बहुतेक चौकांमध्ये वळणांवर अशी अतिक्रमणे आहेत व त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आहे, याकडे वारंवार लक्ष वेधूनही त्यात बदल झालेला नाही.
यासंदर्भात मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंते (पूल) प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. n


गणेशोत्सवातही साकडे
मूगभाट येथील सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीपुढे एक छोटी रेल्वे उभारण्यात आली होती व त्यातून भाविकांना गणपतीपर्यंत पोहोचण्याची सुविधा करण्यात आली होती. या देखाव्याबाहेर एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता, ‘गणराया, आमचा चर्नीरोडचा पूल लवकर सुरू होऊ दे’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link