Next
जुगलबंदी
अरुण घाडीगावकर
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyमराठी व्यावसायिक रंगभूमीवर १९६०-७० च्या दशकामध्ये मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात’ आणि बाळ कोल्हटकर लिखित ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ ही नाटकं भावनाशील, कोमल प्रवृत्तीच्या रसिकांनी डोक्यावर घेतली होती. बुद्धिजीवी प्रेक्षकांनी या नाटकांवर मेलोड्रामाचा शिक्का मारून त्यांना रंगभूमीच्या इतिहासाच्या एका कोपऱ्यात स्थान दिलं होतं. पण ही देशी, मराठी मातीतली, मूळ मध्यमवर्गीय मानसिकतेची मराठमोळी नाटकं होती. त्यांची मांडणी मेलोड्रामा, अतिनाटकी होती हे खरं असलं तरी मराठी परंपरा, संस्कृती, संस्कार, रूढी, आचार यांचं त्या नाटकाच्या कथानकाला अधिष्ठान होतं. मूल्यं, तत्त्वं यांना त्यात मोलाचं स्थान होतं. एकूण कुटुंबपद्धती, चाळसंस्कृती या महानगरात जिवंत होती, चैतन्यरूप होती, तेव्हा त्या प्रेक्षकांना ही नाटकं ‘हृदयस्पर्शी’ वाटत होती.

‘दिवा जळू दे सारी रात’ हे मधुसूदन कालेलकर यांच्या ‘नाट्यवैभव’ या नाट्यसंस्थेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर आलं होतं. बाळ कोल्हटकरांची सारी नाटकं ‘नवाक्षरी’ असत. त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या शीर्षकामध्ये नऊ अक्षरं असत. त्यांचा दृढ समज असा की ‘नवाक्षरी नाटक’ त्यांना फळतं. म्हणून शीर्षक ‘नवाक्षरी’ ठेवण्याचा त्यांचा अट्टहास असे. मधुसूदन कालेलकरांनी ‘दिवा जळू दे सारी रात’ या शीर्षकात ‘नवाक्षरी’ प्रयोग केला आणि कोल्हटकरांप्रमाणेच त्यांनाही तो फळला. या नाटकास प्रारंभापासूनच नाट्यरसिकांनी हाऊसफुल्ल दाद दिली.

या नाटकात मध्यवर्ती नायिकेची भूमिका रेखा कामत करत असत. अप्रतिम. श्यामकांतची भूमिका नरेन चव्हाण करत. हा देखणा अभिनेता. ही भूमिका आर्मीतील. त्यात ते रुबाबदार दिसत. शामकांतांच्या वडिलांची भूमिका वसंत ठेंगडी करायचे. अनिल ही भूमिका संझगिरी (त्यांचं नाव अरुण होतं का...?) आणि अनिताची भूमिका शीला वालावलकर करत असत. या कलाकारांपेक्षाही कलावंतांची एक जोडगोळी या प्रयोगाचं अधिकचं आकर्षण होतं. ही जोडगोळी म्हणजे शरद तळवलकर आणि बबन प्रभू. तळवलकर यात पोस्टमन गुप्तेकाका रंगवायचे, तर बबन त्यांच्या मुलाची, अवलिया मदनची भूमिका करायचे.

शरद तळवलकर आणि बबन प्रभू यांना विनोदाचं दैवी अंग होतं. टायमिंग आणि हजरजबाबीपणा यात या दोघांचा हातखंडा. शिवाय, या दोघांमधील रंगमंचावर देवाणघेवाण म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच असायची. शरद तळवलकर नाट्यसंहिता थोडी बाजूला ठेवून ते बबन प्रभूंना डिवचायचे. मग त्यावर बबन प्रभूंचं उत्तर आणि मग जुगलबंदी रंगे. मग दोघांपैकी कुणीतरी माघार घेऊन, नाट्यसंहितेच्या संवादाला भोज्जा करे आणि तिथून पुन्हा नाटक सुरळीत चाले.

‘दिवा...’च्या दुसऱ्या अंकातील एक प्रवेश. मदन (बबन प्रभू) शाळेच्या परीक्षेत पुन्हा एकदा नापास झालाय. म्हणून त्याची तक्रार घेऊन गुप्तेकाका (तळवलकर) ताईकडे आलेत. ताईनं मदनला समजुतीच्या चार गोष्टी सांगाव्यात म्हणून! पण पुण्यातील एका प्रयोगात तळवलकरांनी प्रभूंना छेडलं आणि मग त्यांच्यात जुंपली जुगलबंदी!

गुप्तेकाका म्हणतात, “पुन्हा नापास. तुला अभ्यास करता येत नाही. सिनेमा बघतोस, उनाडक्या करतोस, अभ्यासात अजिबात लक्ष नाही.” त्यावर मदन म्हणतो, “करतो ना! पुस्तकं तर तीच आहेत.”

“मग? नापास कसा होतोस?”

“पुस्तकं तीच. पण परीक्षेत प्रत्येक वेळी वेगळे प्रश्न विचारतात ना!” म्हणजे चूक मदनची नव्हे तर शिक्षकांचीच!

“नशीब माझं. ते प्रिन्सिपॉल माझ्या ओळखीचे आहेत, म्हणून अजून तुझं नाव शाळेतून काढलं नाही. त्या ज्ञानेश्वरांनी आमच्यासारख्या पामरांसाठी शहाणपणा शिकवलेला आहे. पण तुमच्यासारख्यांना तो नाही कळणार.”

यावर मदन रागानं म्हणतो, “का नाही कळणार? मी दोन्ही ज्ञानेश्वर पाहिलेत. हिंदीतला आणि मराठीतलाही.”

“आम्ही एकच ज्ञानेश्वर ओळखतो,” गुप्तेकाका म्हणाले.

त्यावर मदन गाणं म्हणतो, “ज्योत से ज्योत जलाते चलो... प्रेम की गंगा बहाते चलो.”

“ते पैठणहून नेवासेला चालत गेले होते ज्ञानेश्वर.”- गुप्तेकाका.

“पैठण? नेवासे? ज्ञानेश्वर तर पंचवीस आठवडे चालला होता. पण इथे तर पैठण आणि नेवासे नावाची सिनेमा थिएटरच नाहीएत.” मदन आपल्याच नादात. गुप्तेकाका त्राग्यानं मदनला विचारतात, “गाढवा, पैठणहून नेवासेला जायला काय पंचवीस आठवडे लागतात?”

तळवलकर आणि प्रभू यांच्या या उत्स्फूर्त प्रश्नोत्तरानं प्रेक्षकांचंही मस्त मनोरंजन होत होतं. हास्याचे फवारे उडत होते. कुणीही माघार घेण्याचं नाव घेत नव्हतं. या दोघांच्या सवाल-जवाबामध्ये प्रेक्षकही मस्त गुंतले होते. या प्रयोगाला साक्षी होते ते कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी.

“तुम्ही कुठल्या ज्ञानेश्वराची गोष्ट सांगत आहात?” मदननं गुप्तेकाकांना कंटाळून विचारलं.

“ते तुला नाही कळायचं.”

तळवलकर प्रभूंपुढे हात जोडत म्हणाले, “आमचा ज्ञानेश्वर तुझ्या आकलनशक्तीच्या पलिकडचा आहे.” आणि मग ताईचा दाखला देत ते म्हणायचे, “ताई म्हणते ते बरोबरच आहे.”

“काय?” बबन प्रभूंनी वैतागून विचारलं.

“तू जगाच्या पुढे चालणारा माणूस आहेस.” गुप्तेकाकांनी मदनापुढे शरणागतीच पत्करली. या वाक्यानं मग पुढचा प्रवेश नाट्यसंहितेबरहुकूम सुरू झाला.
विनोदाची जाण असणारे, हजरजबाबी अन् कल्पक मातब्बर कलावंत असले की उत्स्फूर्तपणे गुंफलेला प्रसंगही कसा रंगवता येतो, याचं हे मस्त उदाहरण!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link