Next
डॉक्टर आणि रुग्ण
विशेष प्रतिनिधी
Friday, June 28 | 12:00 AM
15 0 0
Share this story

येत्या १ जुलैला ‘डॉक्टरदिन’ आहे, त्यानिमित्ताने या अंकात एक विशेष विभाग देण्यात आला आहे. हा विशेष विभाग देण्याचा हेतू डॉक्टर व रुग्ण यांच्यात पुन्हा विश्वासाचे संबंध प्रस्थापित व्हावेत हा आहे. आपण जसजशी आर्थिक, वैज्ञानिक व भौतिक प्रगती करीत आहोत तसतसे आपसांतील नातेसंबंध गमावत चाललो आहोत. डॉक्टर-रुग्ण हा असाच गमावलेला नातेसंबंध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात गावातील वैद्य ही संकल्पना मागे पडून पाश्चात्त्य वैद्यकशिक्षण घेतलेला डॉक्टर लोकप्रिय होऊ लागला. वैद्य-रुग्णसंबंधाचे स्वरूप व्यावसायिक-ग्राहक असे कधीच नव्हते, त्यात पैशांची देवाणघेवाणही अभावानेच होत असे. वैद्यांची रुग्णसेवेवरील निष्ठा आणि रुग्णाचा वैद्यावरील विश्वास या वादातीत गोष्टी होत्या. त्यामुळे त्याकाळी नव्याने डॉक्टरी व्यवसाय करणारे हाच नातेसंबंध पुढे नेत होते. त्यातूनच ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना पुढे आली व ती दीर्घकाळ टिकली. आता डॉक्टरी व्यवसायाने कार्पोरेट स्वरूप धारण केले आहे. त्यात पैसा व सेवा हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. आर्थिक प्रगती व राहणीमान वाढत असल्यामुळे रुग्णही आरोग्योपचाराकरता पैसा मोजण्यास तयार आहे. परंतु त्यामुळेच आता रुग्ण डॉक्टरकडून पैशांच्या पुरेपूर मोबदल्याची अपेक्षा करत आहे. डॉक्टरशी कोणताच रुग्ण फीबाबत घासाघीस करत नाही आणि डॉक्टरही ती सहन करत नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या सेवेत डॉक्टरकडून यत्किंचितही हेळसांड झाली तर ती सहन करण्याची रुग्णाची किंवा त्याच्या नातेवाईकांची तयारी नसते. थोडक्यात, आता डॉक्टर-रुग्ण हे नाते व्यावसायिक व ग्राहक या स्वरूपात बदलले आहे. त्यामुळे आता या व्यवसायाला ग्राहक कायदे लागू करणे आवश्यक झाले आहे. साध्या सर्दी-पडशासाठी गल्लीतल्या डॉक्टरकडे जाऊन दहा-पंधरा रुपयांत औषध घेणाऱ्या रुग्णाला आता आधी डॉक्टरची अपॉइन्टमेंट घ्यावी लागते, अर्धा-पाऊण तास रांगेत थांबावे लागते, विविध चाचण्या कराव्या लागतात आणि महागडी औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे रुग्णाच्या डॉक्टरकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सर्व व्यवसायांत जसा ग्राहक हा राजा झाला आहे, तसा तो डॉक्टरी व्यवसायातही झाला आहे, हे वास्तव सर्वांना स्वीकारावेच लागेल. याचा अर्थ लोकांना अद्ययावत रुग्णालये नकोत, कुठेतरी कसाबसा व्यवसाय थाटणारा डॉक्टरच हवा, असा नाही. रुग्णाला चांगली सेवा हवी व त्यासाठी योग्य तो मोबदला मोजण्यास तो तयार आहे, परंतु त्यात हयगय झालेली त्याला चालणार नाही, इतका हा स्वच्छ मामला आहे. रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून काढणारा डॉक्टर आजही लोकांना देवासमानच वाटतो. अशावेळी उपचारांवर आलेला अफाट खर्चही तो विसरून जातो. डॉक्टरी व्यवसाय हा त्यामुळेच लोकांच्या आदराचा व प्रतिष्ठेचा व्यवसाय झाला आहे. मात्र अलिकडच्या काळात खाजगी वैद्यकीय महाविद्यालये निघाली आहेत. त्यांची फी अफाट असते, शिवाय निव्वळ डॉक्टरीची पदवी असून चालत नाही, काहीतरी स्पेशलायझेशन आवश्यक असते, त्यामुळे डॉक्टरी शिक्षणाचा खर्च अफाट वाढला आहे. नव्याने डॉक्टरी सुरू करणाऱ्या तरुणाला हा खर्च भरून काढण्याची चिंता असते, त्यातून तो व्यावसायिक तडजोडी करत असतो. हे एक दुष्टचक्र आहे. ते कसे भेदायचे हा डॉक्टर, रुग्ण यांच्याशीच निगडित प्रश्न नाही तर ती एक सामाजिक समस्या आहे. त्याचा व्यापक विचार सर्वांनीच करणे गरजेचे आहे.           
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link