Next
निसर्गचक्र
आनंद शिंदे
Friday, May 10 | 04:00 PM
15 0 0
Share this story


हत्तीला निसर्गाचा अभियंता (इंजिनीयर) आणि वास्तुविशारद (आर्किटेक्ट) म्हणतात, इतकं काम हत्ती निसर्गासाठी कळत-नकळत करत असतो. मागच्या लेखात हत्तीच्या शेणामुळे काय फायदे निसर्गाला होतात हे आपण पाहिलं. आपल्या शहरात/गावात आणि जंगलातील विश्वात खूप फरक असतो. आपण आपलं काम करत असताना इतर जिवांचा विचार करायला आपल्याला वेळ नसतो. मग जंगलात फिरताना जे अनुभवायला मिळतं ते अद्भुत असतं. अगदी हत्तीच्या पायाचा ठसासुद्धा वेगळा ठरतो. शहरात/गावात आपल्याला हा प्रश्न पडत नाही की नेहमी आजूबाजूला असणारी फुलपाखरं, मधमाश्या कुठे पाणी पितात? याचं उत्तर हत्तीच्या पायांच्या ठशानं दिलं जंगलात! हत्ती पाण्यासाठी नदीवर येतो. चालताना त्याचा पाय चिखलात जातो. त्या ठशाच्या खड्ड्यात पाणी साठतं आणि फुलपाखरू, मधमाश्या तिथे येऊन पाणी पितात. एवढंच नाही, तर ते ‘फास्टफूड सेंटर’ बनतं. त्या पाण्याबरोबर काही किडे, छोटे मासे तिथे खड्ड्यात अडकतात. ते खायला बेडूक येतो. बेडूक जास्त रेंगाळला की तो सापाचं भक्ष्य ठरतो. तर सापाला खायला गरूड येतो. फास्टफूड सेंटर म्हणजे अगदी जलदगतीनं ही अन्नसाखळी त्या पावलाच्या ठशात चालू होते. आपल्यालाही कळणार नाही अशाप्रकारे एक वेगळंच विश्व त्या पावलात तयार होतं.
नुसत्या हत्तीच्या गवताळ प्रदेशातून चालल्यानं कोणी आपलं अन्न मिळवू शकतं हे जेव्हा प्रथम कळलं तेव्हा जरा झटकाच बसला. परंतु हे खरं आहे. हत्ती गवतावरून चालतो तेव्हा त्याच्या वजनदार पावलांमुळे जमीन हादरत असते. या हादरण्यानं गवताखालील किडे गवतावर येतात, याच किड्यांवर पक्षी जगत असतात. म्हणून आपण हत्तींचा कळप बघतो तेव्हा त्यांच्या मागे पक्ष्यांचे थवे उडताना दिसतात. हत्तीच्या मागावर राहिल्यानं त्यांना त्यांचं अन्न मिळत असतं. केरळातील कोनी एलिफंट सेंटरमध्ये एका कावळ्याची एका हत्तीशी खास मैत्री होती. दुपारी आणि संध्याकाळी तो चिखलातून, गवतातून चालत येई तेव्हा हा कावळा तिथे येत असे. त्या हत्तीच्या पायाशी बसून त्याची नखं साफ करून देत असे. त्या नखांत त्याला त्याचं खाणंही मिळत असे. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत होता आणि हत्तीची नखंही साफ होत होती.
दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये जंगलामधील हत्तीचं महत्त्व लक्षात येण्यासारखं असतं. ज्ञानेंद्रियांच्या शक्तीमुळे हत्ती दुष्काळी काळात स्वत: कळप तसं इतर प्राण्यांच्या मदतीला धावून येतो. आपल्या पाणी शोधण्याच्या क्षमतेचा उपयोग तो सर्वांसाठी करत असतो. अगदी कोरड्या पडलेल्या नदीपात्रामध्ये जिवंत झरा कुठे आहे, हे हत्ती शोधू शकतो. जिवंत झरा असलेल्या ठिकाणी तो आपल्या नखानं खणतो. अर्थात तिथे डबकं तयार होतं. त्यातलं पाणी तो पितो आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो.
जंगलात असलेल्या बऱ्याच वनस्पतींना पुन्हा जन्म घेण्यासाठी हत्तीच्या पचनसंस्थेतील प्रवास अतिशय महत्त्वाचा असतो. ते बी हत्तीच्या पचनसंस्थेतून गेलं नाही तर ते रुजलं जात नाही. यामुळे मरणपंथाला लागलेल्या किंवा दुर्मिळ वनस्पती पुन्हा जन्म घेतात. पूर्व आफ्रिकेत केलेल्या एका अभ्यासात त्यांना असं आढळून आलं की गवताळ प्रदेशात फिरणारे हत्ती बी जास्त काळ पोटात ठेवू शकतात. त्यामुळे झाडांचं बी त्यांनी टाकलेल्या शेणातून साधारण साठ किलोमीटर लांब गेलं. त्यामुळे ती झाडं परिसराबाहेर रुजली आणि जगली.
अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात माहुतांना माझ्याबद्दल फारसं प्रेम नव्हतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ‘तुमचा त्रास नको म्हणून आम्ही दोन घोट घेऊन येत असू. (अर्थात हे सांगितलं ते मैत्री झाल्यावरच!) पण डासांचं काय, ते तर त्रास देतच होते रात्रीच्या वेळी.’ त्याच्यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळी हत्तीच्या शेणाचे गोळे जाळून धूर करत असू. त्याचा वासही नव्हता आणि डोळ्यांना जळजळ कमी होती. डासांचा त्रास कमी होत होता. म्हणजे, प्राण्यांनाच नाही तर मनुष्यप्राण्यांनादेखील हत्तीचा असा उपयोग होतो!
मध्यंतरी एक संशोधन वाचलं आणि थोडा चाटच पडलो. पूर्वी हत्ती चहा-कॉफीच्या मळ्यात येतात म्हणून बऱ्याच तक्रारी असत. एका अभ्यासामुळे या तक्रारी कमी झाल्या. हत्तीनं खाल्लेली कॉफी त्याच्या शेणातून बाहेर पडली. ती शेणातून काढून परत रुजवली. अनेक परीक्षणांनंतर त्या कॉफीची उत्तम कॉफीमध्ये गणना झाली. आता जगातल्या महागड्या कॉफींपैकी ती कॉफी आहे, असं समजतं.
अशा या प्राण्याचं निसर्गचक्रातलं महत्त्व हे अतिशय मोलाचंं आहे. हा प्राणी निसर्गातून नाहीसा झाला तर नक्कीच त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. कारण तो जे काही कळत-नकळत निसर्गासाठी करतो आहे, ते करण्याची क्षमता मनुष्यप्राण्यात नाही. म्हणून हत्ती जगलाच पाहिजे!


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link