Next
नंतर... नंतर...
डॉ. राजेंद्र बर्वे
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story

“लहापणापासून मला सगळे ‘वेळकाढू’ म्हणायचे. आई म्हणायची, बाबासारखा तू चेंगट. प्रत्येक गोष्टीला वेळ लावतोस. कधी धड पटकन काम करत नाहीस. आमच्या शाळेतले संस्कृतचे गुरुजी मला म्हणायचे तू दीर्घसूत्री आहेस. आणि मला त्याचा अर्थ कळला नाही की त्यावर पुढे ‘दीर्घसूत्री विनश्यति’ असं शाप दिल्यासारखं पुटपुटायचे. मला सगळी कामं सुरू करायला वेळ लागतो, हे अगदी खरंय. काही लोक आरंभशूर असतात. मी त्यांच्या विरुद्ध, म्हणजे आरंभच करत नाही. दहावी-बारावीनंतर कोणता शिक्षणक्रम निवडावा यावर माझी आणि वडिलांची सतत चर्चा चाले. आई त्या चर्चेला काथ्याकूट म्हणायची. फॉर्म भरेपर्यंत माझं ठरलं नव्हतं. आईनं फॉर्म हिसकावून त्यावर कॉमर्स असं लिहिलं. मला आठवतं, ते वाचून त्या क्षणी मला वाटलं होतं की सायन्स घ्यायला हवं होतं. मी म्हटलंदेखील तसं. त्यावर आई म्हणाली, तुला विचारलं तेव्हा म्हणालास मी ठरवेन. नंतर, नंतर. तुझं सगळं नंतर... नंतरच असतं.  हे सगळं आठवत राहतं आणि त्यामुळे माझं मन आधीच गोंधळलेलं असतं, ते आणखी बुचकळ्यात पडतं, की हा निर्णय आता घेऊ की नंतर... नंतर?”
संदीपनं आपली कैफियत मांडली. पुढे तो म्हणाला, “नंतर नंतर म्हणणं हा रोग नाही तर स्वभाव आहे आणि स्वभावावर तर औषधच नाही, असं वाटल्यामुळे मी या त्रासाचं तसंच घोंगडं भिजत टाकलं.”
खरंय, स्वभावाला औषध नाही, या म्हणीमध्ये तथ्य आहे. परंतु तो विचार अर्धवट आहे. स्वभावावर मानसोपचार करता येतात. स्वभाव म्हणजे ठरावीक सवयींचा समुच्चय. सवयी एकत्र येऊन वृत्ती बनते. वृत्ती होकारात्मक किंवा नकारात्मक असते. आपली वृत्ती आणि सवयी बदलता येतात. एखादा महत्त्वाचा किंवा क्षुल्लक निर्णय घ्यायचा असला की तू बावचळतोस, अस्वस्थ होतोस आणि निर्णय घेण्याचं काम पुढे ढकलतोस. नंतर, नंतर म्हणून वेळ काढतोस. अंगावर येतं, आता निर्णय घ्यायला तरणोपाय नाही, असं झाल्याशिवाय निर्णय घेत नाहीस. आणि तो निर्णय आणखी कोणी घेतला (उदाहरणार्थ, तुझ्या आईनं कॉमर्सचा कोर्स निवडणं) किंवा स्वत:ला घ्यावा लागला तर मनात खूप नाराजी निर्माण होते.
“अगदी खरंय,” संदीप म्हणाला, “आणि आपलं काहीतरी चुकलंय असं वाटून मनाला खंत वाटते.”
म्हणजे?
“म्हणजे असं की निर्णय घेतेवेळी मन साशंक असतं. खरं सांगायचं तर भयग्रस्त असतं आणि भीती कसली वाटते म्हणाल तर, जाऊ दे नंतर नंतर सांगतो,” संदीप बडबडला.
आतासुद्धा भीती कसली वाटते, हे सांगताना आपण चूक करू, काहीतरीच बोलून बसू आणि बोलण्याचा निर्णय चुकला असं वाटत होतं का? आणि पुढचे प्रश्न... आपण चुकताच कामा नये? आपला निर्णय अचूक असला पाहिजे असं मनात वाटत राहतं का? आणि चूक झाली तर ती संपूर्ण जबाबदारी घेण्याचीही भीती वाटते, असं वाटतं का?
संदीप दचकल्यासारखं पाहत राहिला. “माझ्या मनातलं अक्षर नि अक्षर ओळखलंत. मी नंतर, नंतर असं म्हणतो त्यामागे नेमकी हीच मानसिकता असते.” संदीपच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. तो रिलॅक्स झाला. “हे सगळं नॉर्मल आहे ना?” त्याने विचारलं.
नॉर्मल म्हणजे बरोबर नाही पण सर्वसामान्यपणे आढळून येणारी मनोवृत्ती आहे. नंतर, नंतर म्हणण्याची सवय खूप लोकांना असते. आपण निर्णय घ्यायला घाबरतो, हे बरेच लोक कबूल करत नाहीत, इतकंच.
“बरं, ही सवय बदलण्यासाठी काही उपाय आहेत का? की ते नंतर?” तो एकदम हसला.
उपाय आहे, नक्कीच आहे. उपाय समजायला वेळ लागत नाही. त्या सवयीमागची मानसिकता कळते, पण वळते असं नाही. त्यामुळे सवय घालवण्याचं मार्गदर्शन करता येईल, पण खाचखळग्याच्या रस्त्यावरून तुला पुढे चालायचं आहे. आणि ती वेळ आली की नंतर... नंतर म्हणण्याचा स्वभाव उसळी मारून वर येतो.
संदीप विचारात पडला पण त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.
* तू, आता पहिलं पाऊल त्या दिशेनं उचललं आहेस. म्हणजे आपली चेंगटपणा, वेळकाढूपणा, लांबण लावण्याची सवय तू स्वीकारली आहे.
* ही सवय हा काही वेडेपणाचा प्रकार नाही, तर स्वभावदोष आहे. तोही सर्वसामान्यत: आढून येणारा आहे, हे समजल्यावर तुझं स्वत:विषयीचं नकारात्मक मत बदललं आहे.
* हीच वेळ आता महत्त्वाचा निर्णय घेण्याची आहे.
* या स्वभावदोषाचं मूळ आपल्या चुकीच्या विचारधारेत आहे. ती विचारधारा अशी-(अ) आपलं काही चुकताच कामा नये! (ब) आपण चुकीचा निर्णय घेता कामा नये  असा दुराग्रह. (क) प्रत्येक निर्णयातून सगळं काही ठीकच होण्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच असते, असे ठाम आणि अवास्तव विचार तुझ्या मनात आहेत.
* हे विचार मनात लुडबुड करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. ते दुर्लक्ष केलं की आपोआप निवळतात. थोडं कठीण आहे, मात्र हळूहळू जमेल.
* आता कोणकोणते निर्णय यापुढे घ्यावे लागतील त्यांची यादी कर. अगदी रोज कोणते कपडे घालू, भात आधी की पोळी, इतके क्षुल्लक निर्णय घ्यायलाही तू घाबरतोस. यातले रोजच्या व्यवहारातले क्षुल्लक निर्णय तू सुटीच्या दिवशी आधीच घेऊन ठेव आणि त्यांचं पालन कर.
मोठ्या निर्णयापासून सुरू करू नकोस. लहानसहान निर्णय घेण्यासाठी नंतर, नंतर म्हणण्याची सवय गेली की खूप आत्मविश्वास वाढेल. स्वत:ला कमी छळशील आणि मग महत्त्वाचे निर्णय आपण कधी घेतले, हे तुझ्या लक्षातही येणार नाही! खरंच, मग आताच सुरुवात करतो. बसनं जावं की रिक्षा, असा प्रश्न मनात होता. निर्णय घेतला, रिक्षा! तो मनापासून हसला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link